निसवलेले पीक असता
पाखरे भरपूर आली
अन् सुगी होता पिलावळ
दूर परदेशी उडाली
घेत हिंदोळे, नभाला
घातली होती गवसणी
जीवनाच्या त्या क्षणांना
मानायचो मी पर्वणी
सात सागर पार केले
मिरवावया तेजोमशाली
अन् सुगी होता पिलावळ
दूर परदेशी उडाली
विदेशी गेल्या मुलांनी
सोडला अंधार मागे
त्यात दिसती उसवलेले
रेशमाचे कैक धागे
पोत विरला, लक्तरांची
जळमटे उरली महाली
अन् सुगी होता पिलावळ
दूर परदेशी उडाली
काल महिमा! वयपरत्वे
राज्य आले सुरकुत्यांचे
टाळतो ठरवून आम्ही
तोंड बघणे आरशाचे
आजही जी साथ देते
ती कधी होती रुपाली
अन् सुगी होता पिलावळ
दूर परदेशी उडाली
येत असतो फोन जेंव्हा
क्षेम पुसती काळजीने
थाप आम्ही मारतो की
राहतो, जगतो सुखाने
जी घरी ना नांदते ती
कळवतो त्यांना खुशाली
अन् सुगी होता पिलावळ
दूर परदेशी उडाली
भुरळले परदेशच्या का
लेकरे भौतिक सुखाला?
परतण्याचे नाव नाही
काळजी वाटे मनाला
का तया झाल्या नकोशा
ऊब देणार्या दुशाली?
अन् सुगी होता पिलावळ
दूर परदेशी उडाली
निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com
No comments:
Post a Comment