Monday, January 5, 2015

त्यात रस्ता भुयाराचा


किती ही रात्र काळोखी?
त्यात रस्ता भुयाराचा
कसा अंधार रे केला!
जीवना तू उजेडाचा

कवडसाही न आठवतो
कधी मी पाहिला आहे
ज्योत अंधारते ज्याची
दिवा तो लाविला आहे
जिथे स्फुल्लिंगही नाही
प्रश्न नसतो उठावाचा
कसा अंधार रे केला!
जीवना तू उजेडाचा

मान्य मी ही निवडलेली
वाट आहे जगायाची
असो खाचा नि खळग्यांची
जिद्द पायी कमालीची
जाहलो सांजवेळेला
प्रवासी मी उताराचा
कसा अंधार रे केला!
जीवना तू उजेडाचा

बँक आहे उघडलेली
वेगळी गांजल्यांसाठी
शुन्य रकमेतही खाते
उघडते रंजल्यांसाठी
काल वठवून आलो मी
चेक माझ्या उसास्यांचा
कसा अंधार रे केला!
जीवना तू उजेडाचा

तसा निर्ढावलो आहे
सदा काट्यात जगल्याने
स्वप्न माझे पुरे होते
फक्त क्षण एक फुलल्याने
काच का आज सोसावा?
उद्या निर्माल्य होण्याचा
कसा अंधार रे केला!
जीवना तू उजेडाचा

मोजली ना कधी दु:खे
गाळले ना कधी अश्रू
मंदिरी अंत समयी का
हात मागावया पसरू?
घेतलेला वसा खडतर
बंडखोरी करायाचा
कसा अंधार रे केला!
जीवना तू उजेडाचा


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail---nishides1944@yahoo.com

No comments:

Post a Comment