"सर्वे सर्वा मीच" समजुनी
प्रपंच चालवताना
शुन्य अपेक्षित उत्तर नव्हते
तुला वजा करताना
फक्त सुरांनी वा तालांनी
मैफिल रंगत नसते
एक दुज्याला पूरक असणे
जास्त प्रभावी असते
बळ एकाचे, पंख दुज्याचे
हवे उंच उडताना
शुन्य अपेक्षित उत्तर नव्हते
तुला वजा करताना
दु:ख सांगता गझलेमधुनी
श्रोते टाळ्या पिटती
हाच विरोधाभास दावते
आपुल्यातली प्रीती
ओठांवरचे हास्य, पाहती
डोळे ओघळताना
शुन्य अपेक्षित उत्तर नव्हते
तुला वजा करताना
स्वप्नांच्याही पुढे जगावे
जिद्द मनी धगधगती
क्षितिजालाही टाकुन मागे
धावत होतो पुढती
उसंत नव्हती एक क्षणाची
झपाटून जगताना
शुन्य अपेक्षित उत्तर नव्हते
तुला वजा करताना
फोल्डर अपुल्या सुखदु:खाचे
एकच आपण बनवू
आयुष्याच्या हार्डडिस्कवर
सेव्ह करोनी ठेवू
पासवर्ड का हवा मनाला?
आठव साठवताना
शुन्य अपेक्षित उत्तर नव्हते
तुला वजा करताना
प्रभातकिरणे, संध्याछाया
स्वागत ग्रिष्माचेही
जे जे वाढुन समोर आले
अपुल्या दोघांचेही
ओठांवरचे हास्य जपावे
पडताना, उठताना
शुन्य अपेक्षित उत्तर नव्हते
तुला वजा करताना
निशिकांत देशपांडे. मो. क्र.९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com