दार किलकिले ठेव जरासे
झुळूक होउन यावे म्हणतो
साठवून तुज पापण्यात मी
तृप्त मनाने जावे म्हणतो
आळस देवू नकोस सखये
रेंगाळाया सूर्य लागला
खट्याळ बघतो खिडकीमधुनी
आशिक त्याच्यातील जागला
प्रभात किरणे होउन मीही
तुला कधी स्पर्शावे म्हणतो
साठवून तुज पापण्यात मी
तृप्त मनाने जावे म्हणतो
काय लोक म्हणतील, काळजी
करणारांनी किती करावी ?
भेट राहिली दूर, यावया
स्वप्नी, धडधड उरी नसावी
लाज कशाची? गाज होउनी
प्रेमगीत मी गावे म्हणतो
साठवून तुज पापण्यात मी
तृप्त मनाने जावे म्हणतो
शमा सखे तू मैफोलीतली
मंद तेवुनी रंग भरावे
मी परवाना, मिठी मारण्या
तुझ्याभोवती धुंद फिरावे
जळण्याआधी कवेत तुझिया
हळूच झंकारावे म्हणतो
साठवून तुज पापण्यात मी
तृप्त मनाने जावे म्हणतो
उधार स्वप्ने सदैव अपुली
नगदीमध्ये विरहवेदना
ये आता बदलूत कायदा
जगावयाचा, जरा ऐक ना!
हातामध्ये हात धरोनी
क्षितिजावर नांदावे म्हणतो
साठवून तुज पापण्यात मी
तृप्त मनाने जावे म्हणतो
नकोस घालू प्रदक्षिणा तू
माझ्यासाठी वडाभोवती
देव कृपेची आस कशाला?
प्रेमबळावर बनू सोबती
तू माझ्या अन् मीही तुझिया
रंगी चल रंगावे म्हणतो
साठवून तुज पापण्यात मी
तृप्त मनाने जावे म्हणतो
निशिकांत देशपांडे. मो.क्र.९८९०७ ९९०२३
E Mail---nishides1944@yahoo.com
No comments:
Post a Comment