Thursday, August 22, 2013

तत्व एवढे पाळत असतो

आयुष्याचे कडू कारले
साखरेत मी घोळत असतो
जे मिळते ते गोड मानणे
तत्व एवढे पाळत असतो

प्रसन्न वदने प्रसन्न होसी
असे ऐकले त्याच क्षणाला
स्वार्थ गुंतला तुझ्यात अंबे
ओढ लागली तुझी मनाला
तुझा उदो अन् रोज जोगवा
पोट जाळण्या मागत असतो
जे मिळते ते गोड मानणे
तत्व एवढे पाळत असतो

वांझोटे मन तरी कशाने
प्रसव वेदना सुरू जाहल्या?
हवे हवे ते घडावयाच्या
मनात उर्मी उठू लागल्या
नकोच मृगजळ, नको निराशा
स्वप्नी रमणे टाळत असतो
जे मिळते ते गोड मानणे
तत्व एवढे पाळत असतो

वयस्क आहे वृक्ष तरी पण
अंतरात तो वठला नाही
शुष्क काळ हा, दूर पाखरे
तरी कधी तो रडला नाही
वसंत येता नटण्यासाठी
पिकली पाने गाळत असतो
जे मिळते ते गोड मानणे
तत्व एवढे पाळत असतो

निर्जन आहे विश्व केवढे !
आसपास ना वस्ती दिसते
खिन्न व्हावया वेळ कुणाला?
मनात सळसळ मस्ती असते
कधी एकटा जगलो नाही
आठवणींशी खेळत असतो
जे मिळते ते गोड मानणे
तत्व एवढे पाळत असतो

देवच जाणे शब्दफुलांचा
सडा अंगणी कोण शिंपितो ?
कविता लिहिण्या, फुले वेचुनी
सांज सकाळी शब्द गुंफितो
वैषम्याचे मेघ दाटता
कविता, गझला चाळत असतो
जे मिळते ते गोड मानणे
तत्व एवढे पाळत असतो


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

No comments:

Post a Comment