Saturday, August 31, 2013

रुपिया गीरा रे !

इस रचनकी पहली दो पंक्तियाँ मेरे एक फेसबुक फ्रेंडके वाल पर मिली जिससे प्रेरित होकर यह रचना बनी. इसको गुनगुनानेके लिए हिंदी फिल्म गाना "झुमका गीरा रे बरेली के बाजार मे" की धुन खयाल मे रखे.

रुपिया गीरा रे मंदीके इस बाजार मे
रुपिया गीरा रे मंदीके इस बाजार मे
रुपिया गीरा रुपिया, गीरा रुपिया  गीरा हाय हाय हाय
रुपिया गीरा रे मंदीके इस बाजार मे

दिवालिया खाता है लेकिन अर्थ शास्त्र यह कैसा?
अन्न सुरक्षा कायदा किया जेबमे नही पैसा
दुनिया जाने निर्णय होते है किसके आधिकार मे!
रुपिया गीरा रे मंदीके इस बाजार मे

घूसखोरोंकी टोलीके है मनमोहन अलिबाबा
स्वित्झरलंड है इन लोगोंका मक्का कभी है काबा
अहम फाइलें गायब है की जाती इस सरकार मे
रुपिया गीरा रे मंदीके इस बाजार मे

गद्दीपर बैठे जो भी है प्यादे सब बेचारे
इंतजार होता है कब मिल जाये उन्हे इशारे
हांजीवालोंकी चलती है दिल्ली के दरबार मे
रुपिया गीरा रे मंदीके इस बाजार मे

मनमोहनसींग, चिदंबरम की सोच है कैसी प्यारे
अमीर और गरिबोंके बींच मे बढी हुई है दरारे
ये दोनो भी फेल हुये है अपनेही किरदार मे
रुपिया गीरा रे मंदीके इस बाजार मे

आम आदमी गरीब रहना मकसद उनका कैसा?
जब भी चाहो चुनाव जीतो जरा फेंक कर पैसा
पिढी दरपिढी सत्ता क्यों है गिने चुने परिवार मे?
रुपिया गीरा रे मंदीके इस बाजार मे


निशिकांत देशपांडे. मो.क्र.९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Wednesday, August 28, 2013

तृप्त मनाने जावे म्हणतो


दार किलकिले ठेव जरासे
झुळूक होउन यावे म्हणतो
साठवून तुज पापण्यात मी
तृप्त मनाने जावे म्हणतो

आळस देवू नकोस सखये
रेंगाळाया सूर्य लागला
खट्याळ बघतो खिडकीमधुनी
आशिक त्याच्यातील जागला
प्रभात किरणे होउन मीही
तुला कधी स्पर्शावे म्हणतो
साठवून तुज पापण्यात मी
तृप्त मनाने जावे म्हणतो

काय लोक म्हणतील, काळजी
करणारांनी किती करावी ?
भेट राहिली दूर, यावया
स्वप्नी, धडधड उरी नसावी
लाज कशाची? गाज होउनी
प्रेमगीत मी गावे म्हणतो
साठवून तुज पापण्यात मी
तृप्त मनाने जावे म्हणतो

शमा सखे तू मैफोलीतली
मंद तेवुनी रंग भरावे
मी परवाना, मिठी मारण्या
तुझ्याभोवती धुंद फिरावे
जळण्याआधी कवेत तुझिया
हळूच झंकारावे म्हणतो
साठवून तुज पापण्यात मी
तृप्त मनाने जावे म्हणतो

उधार स्वप्ने सदैव अपुली
नगदीमध्ये विरहवेदना
ये आता बदलूत कायदा
जगावयाचा, जरा ऐक ना!
हातामध्ये हात धरोनी
क्षितिजावर नांदावे म्हणतो
साठवून तुज पापण्यात मी
तृप्त मनाने जावे म्हणतो

नकोस घालू प्रदक्षिणा तू
माझ्यासाठी वडाभोवती
देव कृपेची आस कशाला?
प्रेमबळावर बनू सोबती
तू माझ्या अन् मीही तुझिया
रंगी चल रंगावे म्हणतो
साठवून तुज पापण्यात मी
तृप्त मनाने जावे म्हणतो


निशिकांत देशपांडे. मो.क्र.९८९०७ ९९०२३
E Mail---nishides1944@yahoo.com

Monday, August 26, 2013

लखलख तारा एक निखळला

(डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या निर्घृण हत्त्येनंतर लिहिलेली कविता.)


उजेडावरी वार कराया
अंधाराने हात उचलला
हाय! नभीचा पुन्हा एकदा
लखलख तारा एक निखळला

श्रध्दा अंध नसावी म्हणणे
कशामुळे हा गुन्हा ठरावा?
प्रबोधनाविन समाज भोळा
शोषणातुनी कसा सुटावा?
आग्रह धरला तोच कायदा
मेल्यावरती पास करवला
हाय! नभीचा पुन्हा एकदा
लखलख तारा एक निखळला

तर्काधिष्ठित पारख करुनी
नकारले कित्येक प्रथांना
जागर झाला सुरू जनांचा
छेद देउनी दंतकथांना
स्वार्थ बाधला ज्या भोदूंचा
पोटशूळ भलताच भडकला
हाय! नभीचा पुन्हा एकदा
लखलख तारा एक निखळला

विचार क्रांती कशी घडावी?
परंपरांचे प्रिय इशारे
राखेखाली दबून गेली
कुठे न दिसती सुप्त निखारे
अधीच मुठभर, एक त्यातला
कसा कुणी स्फुल्लिंग विझवला?
हाय! नभीचा पुन्हा एकदा
लखलख तारा एक निखळला

पुरे जाहली स्मशान शांती
अता जरा पेटून उठावे
कुठे हरवली नैतिकतेची
जुनी वादळे कुणास ठावे?
तिमिर दिशेने हजार वाटा
प्रकाश रस्ता कुठे हरवला?
हाय! नभीचा पुन्हा एकदा
लखलख तारा एक निखळला


निशिकांत देशपांडे. मो.क्र.९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com




Thursday, August 22, 2013

तत्व एवढे पाळत असतो

आयुष्याचे कडू कारले
साखरेत मी घोळत असतो
जे मिळते ते गोड मानणे
तत्व एवढे पाळत असतो

प्रसन्न वदने प्रसन्न होसी
असे ऐकले त्याच क्षणाला
स्वार्थ गुंतला तुझ्यात अंबे
ओढ लागली तुझी मनाला
तुझा उदो अन् रोज जोगवा
पोट जाळण्या मागत असतो
जे मिळते ते गोड मानणे
तत्व एवढे पाळत असतो

वांझोटे मन तरी कशाने
प्रसव वेदना सुरू जाहल्या?
हवे हवे ते घडावयाच्या
मनात उर्मी उठू लागल्या
नकोच मृगजळ, नको निराशा
स्वप्नी रमणे टाळत असतो
जे मिळते ते गोड मानणे
तत्व एवढे पाळत असतो

वयस्क आहे वृक्ष तरी पण
अंतरात तो वठला नाही
शुष्क काळ हा, दूर पाखरे
तरी कधी तो रडला नाही
वसंत येता नटण्यासाठी
पिकली पाने गाळत असतो
जे मिळते ते गोड मानणे
तत्व एवढे पाळत असतो

निर्जन आहे विश्व केवढे !
आसपास ना वस्ती दिसते
खिन्न व्हावया वेळ कुणाला?
मनात सळसळ मस्ती असते
कधी एकटा जगलो नाही
आठवणींशी खेळत असतो
जे मिळते ते गोड मानणे
तत्व एवढे पाळत असतो

देवच जाणे शब्दफुलांचा
सडा अंगणी कोण शिंपितो ?
कविता लिहिण्या, फुले वेचुनी
सांज सकाळी शब्द गुंफितो
वैषम्याचे मेघ दाटता
कविता, गझला चाळत असतो
जे मिळते ते गोड मानणे
तत्व एवढे पाळत असतो


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Sunday, August 18, 2013

वीट आला

शल्य होउन टोचणार्‍या
वेदनांचा वीट आला
एक फरपट जाहलेल्या
जीवनाचा वीट आला

नोकरी बहुमुल्य ठरते
दोन वेळा पोट भरण्या
शेतकी पदवीधरांना
लाज वाटे शेत कसण्या
लाट शहरी धाडणार्‍या
शिक्षणाचा वीट आला
एक फरपट जाहलेल्या
जीवनाचा वीट आला

जीवना करतो टवाळी
चेहर्‍यावर थुंकतो मी
चाल हात्तीसारखा तू
ये! तुझ्यावर भुंकतो मी
उन्मत्त आणि माजलेल्या
चालण्याचा वीट आला
एक फरपट जाहलेल्या
जीवनाचा वीट आला

चित्र रेखाटीत असतो
मृगजाळाच्याही तळ्याचे
भोवताली रंग भरतो
केशरांच्या मी मळ्याचे
स्वप्ननगरी गाव माझे
वास्तवाचा वीट आला
एक फरपट जाहलेल्या
जीवनाचा वीट आला

होत असते व्हायचे ते
व्यर्थ त्रागा हा कशाला?
झोपणे तर भाग आहे
साप असताही उशाला
संकटी हसण्यास शिकलो
आसवांचा वीट आला
एक फरपट जाहलेल्या
जीवनाचा वीट आला

का असे वाटून गेले?
जीवनाला अर्थ आहे
अर्थ शोधायास निघणे
हे खरे तर व्यर्थ आहे
अर्थ, व्यर्थातून निर्मित
गोंधळाचा वीट आला
एक फरपट जाहलेल्या
जीवनाचा वीट आला


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०८ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Sunday, August 11, 2013

परंपरा मी पाळत आहे


पडतो मी अन् उठतोही मी
जीव तोडुनी चालत असतो
एकलपणची प्राक्तनातली
पंरपरा मी पाळत असतो

मी रस्त्याचा, रस्ता माझा
वाट कशी ही ना सरणारी
वळणावरती फिरून बघता
दुपार असते रखरखणारी
जीवनातले  स्वगत एकटा
मी माझ्याशी बोलत असतो
एकलपणची प्राक्तनातली
पंरपरा मी पाळत असतो

परसबागच्या प्राजक्ताने
मला पाहिले उर्जितकाळी
वठला तोही माझ्यासोबत
दु:ख उगाळी सांज सकाळी
मनात तो माझ्या, मी त्यांच्या
आस उद्याची रुजवत असतो
एकलपणची प्राक्तनातली
पंरपरा मी पाळत असतो

कितीक आले कितीक गेले
आता उरलो मीच एकटा
विलक्षण अशा कुटुंबातला
वडीलधारा मीच धाकटा
दोष द्यावया कुणीच नाही
माझ्याशी मी भांडत असतो
एकलपणची प्राक्तनातली
पंरपरा मी पाळत असतो

गांडिव पेलुन प्रत्त्यंचा मी
काल ताणली आत्मबलाने
झालो दुर्बल, वयस्क जगतो
नशिबाच्या मी कलाकलाने
व्यर्थ!, तरी मी इतिहासाची
सुवर्ण पाने चाळत असतो
एकलपणची प्राक्तनातली
पंरपरा मी पाळत असतो

थकलेल्या गात्रांनो ऐका
वेदनेतही बघेन दरवळ
जाण असू द्या, मनात माझ्या
नांदत आहे अजून हिरवळ
वसंतातल्या कवितांना मी
शब्दफुलांनी सजवत असतो
एकलपणची प्राक्तनातली
पंरपरा मी पाळत असतो


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Monday, August 5, 2013

वेदनातही दरवळ (मैत्रीदिनाच्या निमित्ताने)


वाळवंटात हिरवळ
वेदनातही दरवळ

आठवांचा पारवा
ग्रिष्मात पण गारवा

कवडसा अंधारात
उजेड घरा दारात

चंदनाचे झिझणे
अहं विसरून जगणे

भोवतालची दलदल
भासते जणू मखमल

पानगळीचे शैशव
पर्णफुटीचे वैभव

मायेतला उबारा
दु:खा नाही थारा

जगण्या देई गरिमा
मैत्रीचा हा महिमा

सर्वांना मैत्रीदिनाच्या शुभेच्छा.

निशिकांत देशपांडे. मो. क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com