Thursday, April 18, 2013

गीत आणि संगीत--सौंदर्य स्थळे-- भाग-३


या मालिकेत लिहिलेल्या दोन भागांचे रसिक वाचकांनी भरभरून स्वागत केले. त्यातून प्रेरणा घेऊन आज तिसरा भाग सादर करत आहे.
माझे बालपण एक अगदी लहान खेड्यात गेलेले आहे. गावात जेमतेल ७०/८० घरे असावीत. आमचे एकटेच ब्राह्मणाचे घर. गावात सोवळ्या ओवळ्याचा त्रास होतो म्हणून आम्ही आमच्या शेतातच एका कुडाच्या घरात रहात होतो. मला अनेक गोष्टीपैकी एक गोष्ट प्रकर्षाने आठवते म्हणजे एके दिवशी पहाटे मला जाग आली. बाहेर स्वच्छ चांदणं पडलेलं होतं. सर्वत्र निरव शांतता. हवा पण नव्हती. झाडे एखाद्या ध्यानस्थ ऋषीप्रमाणे शांत उभी होती. माझं वय तेंव्हा जेमतेम १०/११ वर्षाचं असावं. दुरून कोठून तरी अगदी हळूच कांहीतरी आवज आल्याचा भास होत होता. आवाज अतिशय मंजूळ होता. श्वास घेण्याच्या आवाजाने पण तो गायब होत होता. श्वास रोखला की तो अस्पष्टसा ऐकू येई. तो आवाज हळू हळू मोठा होऊ लागला आणि जवळ जवळ येतोय असे वाटू लागले. नंतर लक्षात आले की एक बैलगाडी जवळ जवळ येत आहे आणि तो आवाज बैलांच्या गळ्यात बांधलेल्या घुंगुरांचा होता. घराशेजारच्या रस्त्यावरून बैलगाडी गेली. ती जशी जशी दूर गेली तसा आवाज मंद मंद होत गेला आणि शेवटी ऐकू येणे बंद झाले. हे इथे सांगायचे प्रयोजन म्हणजे त्या आवाजात मी उच्चप्रतीचे माधुर्य अनुभवले जे ६० वर्षानंतरही माझ्या स्मरणात आहे. मला त्या दिवशी संगीताची अनुभूती झाली. एक साधी घटना ह्रदयवर कायमची कोरली गेली. या लेखमालेच्या निमित्ताने मी माझ्या आठवांच्या जुन्या गावी पोंचलो आणि जरा वेळ हरवून गेलो.
संगीत हा प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य घटक असतो. मग ते संगीत कोणत्याही प्रकारचे असू देत. एका मोठया शास्त्रीय गायकाला प्रश्न विचरला होता तो असा. "पंडीतजी, पाश्चात्य और हिंदुस्तानी संगीत मे क्या फर्क है?" पंडीतजीने फार समर्पक उत्तर दिले होते. ते म्हणाले "दोनों संगीत शैलियों मे सर से पाँव तक का फरक है." अधिक स्पष्टीकरण देताना ते म्हणाले "हिंदुस्तानी संगीत सुनते समय श्रोता सम के उपर सर हिलाकर दाद देते है. पाश्चात्य संगीत सुनते समय श्रोता ताल पर पैर हिलाते है." किती समर्पक उत्तर अहे ना? जिथे ताल आला तेथे संगीन आलेच.
हिंदी सिनेमात १९४९ साली एक शुभ शकून झाला. बरसात नावाचा एक पिक्चर रिलीज झाला. बरसात चे वैशिष्ट्य म्हणजे राज कपूरच्या आर.के. प्रॉडक्शन चा हा पहिलाच पिक्चर. शंकर-जय किशन यां जोडीने संगीतबध्द केलेला पहिलाच सिनेमा. शैलेंद्र या गीतकाराने प्रथमच  सिनेमा साठी गाणी लिहिली होती. यातील गाणी तुफान गाजली. लोक अक्षरशः वेडे झाले होते या गाण्यांवर. या सिनेमाने श्रोत्यांना संगिताच्या बरसातीत चिंब चिंब केले होते. नंतरच्या काळात आर.के., शंकर जयकिशन आणि शैलेंद्र या त्रिमूर्तीच्या संगिताचा महापूर कित्येक वर्षे चालू होता. संगिताची लयलूट चालू होती.
आज जे गाणे आपणापर्यंत पोहंचवायचे ठरवले आहे त्याचे गीतकार शैलेंद्रच आहेत आणि संगीतकार शंकर जयकिशन. शंकर-जयकिशन  या जोड्गोळीने एकाहून एक सरस गाणी दिली आहेत. लोक म्हणतात की या दोघांपैकी जयकिशन हे सरस होते. जयकिशन यांना इंग्रजी पिक्चर्स पहायचा खूप नाद होता. ते नेहमी मॉर्निग शोला जात असत. त्यातील एखादा म्युझिकचा तुकडा आवडला की लागलीच त्या वरून गाणे तयार होत असे. नंतर नंतर या दोघात बिनसले. कारण शंकर यांची मेहुणी "शारदा" या गायिकेवरून. तिचा आवाज सुमार होता म्हणून जयकेशन यांना ती नकोशी होती. वाचकांनी सूरज या सिनेमातील "तितली उडी" हे गाणे आठवावे म्हणजे तिच्या आवाजाचा पोत लक्षात येईल.
मी जुन्या संगिताचे गुणगाण गातो याचा अर्थ असा नव्हे की त्या काळी सर्व कांही अलबेलच होते. अपप्रवृत्तीही होत्याच होत्या.एक मजेशीर किस्सा सांगतो. त्या काळी फिल्मफेअर अवार्ड्स देण्याची वेगळी पध्दत होती. बेस्ट म्युझिकचे आवार्ड देताना रेकॉर्ड्स कोणत्या सिनेमाच्या जास्त विकल्या गेल्या हा निकष होता. रेकॉर्ड्स बनवणार्‍या दोनच कंपन्या होत्या. एक एच. एम.व्ही. आणि थोड्या प्रमाणात पॉलिडॉर. एकदा मुंबईत चौपाटीवर गणपती विसर्जन करताना कांही लोकांच्या पायाला विचित्र स्पर्ष जाणवला. खाली हात घालून पाहिले तेंव्हा एका हिंदी सिनेमाच्या गाण्याची एल.पी. होती. कुतुहल म्हणून शोध घेतला असता जवळ जवळ २००० एल.पीज. त्याच सिनेमाच्या सापडल्या. म्हणजे आवार्ड साठी कोणीतरी त्या रेकॉर्ड्स खरेदी करून खप जास्त आहे असे दाखवायचा प्रयत्न केलेला होता.असो.
आज निवडलेले गाणे "सीमा" या चित्रपटातले आहे. गायक मनाडे, संगीतकार शंकर जयकिशन आणि गीतकार शैलेंद्र. चित्र्पटात काम केले आहे बलराज सहानी आणि नूतन यांनी. या लोकांबद्दल काय बोलावे? मन्नाडे यांनी रागदारी फिल्मी गाण्यात स्व्तःचे स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. एका सिनेमात, बहुधा "बैजु बावरा" असावा, त्यांनी प्रत्यक्ष भीम्सेन जोशींबरोबर एक जुगलबंदी अगदी समर्थपणे गायली आहे, शंकर जयकिशन यांनी १९४९ च्या पहिल्याच बरसात चित्रपटापासून जवळ जवळ २५ वर्षे रसिकांच्या मनावर राज्य केले आहे. बलराज साहनी यांचा चेहरा अतिशय बोलका होता अभिनयाच्या क्षेत्रात त्यांचा दबदबा होता. पदव्युत्तर शिक्षण घेतलेले ते एकमेव नट त्या काळात होते. खूप लोकांना माहित नाही, ते विचारसरणीने कम्युनिस्ट होते. दो बिघा जमीन हा चित्रपट अल्पभूधारकाच्या जीवनावर होता. त्यात त्यांनी जीव ओतून काम केले होते. लोकांना अजूनही हकीकत हा चित्रपट आठवतो.
आता पुन्हा एकदा शंकर जयकिशन बद्दल थोडे. या दोघांनी भरपूर रागावर अधारीत गाणी कंपोज केली आहेत. त्यांनी दरबारी आणि भैरवी रगात बरीच गाणी दिली आहेत. आजचे गाणे दरबारी रागातले आहे. याच रागातील त्यांची दुसरी गाणी म्हणजे "झनक झनक तेरी बाजे पायलिया" आणि "राधिके तुने बन्सरि चुराई" ही होत. शंकर आणि जयकिशन यांच्यात कोण चांगली गाणी देतो यासाठी स्पर्धा असायची. या सिनेमात शंकरने "सुनो छोटिशी गुडिया की लंबी कहानी" हे अजरामर गीत बनवले तर जयकिशनने प्रत्युत्तर म्हणून "तू प्यारका सागर है" हे बनवले जे मी तुम्हाला आज ऐकवणार आहे.
या गाण्याच्या व्हिडियो मधे लक्ष देवून बलराज सहनी च्या चेहर्‍यावरील भाव बघा. अगदी स्थीर दत्तात्रयांच्या
 मूर्तीसमोर बसून हे भजन गायलेले आहे. देवावर नजर स्थीर असली तरी किती भाव व्यक्त होतात हे तुम्हीच अनुभवा. छोट्या मुलीच्या केसात हात फिरवणे, नंतर ती मुलगी बलराज सहानीच्या पायावर हात फिरवते सारे कांही इतके नैसर्गिक आणि मनाला स्पर्षणारे वाटते की आपण पण तल्लीन होऊन जातो. या गाण्याचे बोल आहेतः--

तू प्यार का सागर है
तेरी इक बूँद के प्यासे हम
लौटा जो दिया तुमने
चले जायेंगे जहां से हम
तू प्यार...

घायल मन का पागल पंछी उड़ने को बेक़रार
पंख हैं कोमल, आँख है धुँधली, जाना है सागर पार
अब तू ही इसे समझा, राह भूले थे कहाँ से हम
तू प्यार...

इधर झूम के गाये ज़िंदगी, उधर है मौत खड़ी
कोई क्या जाने कहाँ है सीमा, उलझन आन पड़ी
कानों में ज़रा कह दे, कि आएँ कौन दिशा से हम
तू प्यार...

चला मग. या गाण्याचा आनंद घेण्यासाठी क्लिक करा
http://www.youtube.com/watch?v=e2D-kjOMNF0
YouTube - Videos from this email




No comments:

Post a Comment