Tuesday, April 2, 2013

जीवन

"जीवन" या विषयावर पाच मुक्तके

वृत्त-देवप्रिया:-


१)   आर्जवे केली तुझी अन् लाखदा चुचकारले
      पाहुनी तोरा तुझा मी कैकदा फटकारले
      कुंडली जमलीच नाही जीवना माझी तुझी
      साठवाया वेदना मी काळजा विस्तारले

२)   काढताना कुंचल्याने स्केच माझा हासरा
      सत्त्य दडवत घेतला मी कल्पनांचा आसरा
     ओढले तू त्या दिशेने फरपटाया लागलो
     जीवना होता कधी हातात माझ्या कासरा?

३)   वाद ना संवाद केला जीवनाशी मी कधी
     गुंतलो नाही कधीही मोहपाशी मी कधी
     वास्तवाशी नाळ तोडुन आवडीने पाहतो
     कल्पना विश्वात रमुनी स्वप्नराशी मी कधी

४)   मी तसा आहे कलंदर दु:ख ना शिवते मना
     कोण आहे आज माझे जीवना तू सांग ना !
     का भणंगाशी तरी घेतोस पंगा रे असा?
     जाणसी तू जिंकतो मी एकहाती सामना

वृत्त-व्योमगंगा:-

५)   रंग भरतो वेदनांचे मस्त रांगोळीत माझ्या
     दु:ख ओघळते फुलोनी नेटक्या ओळीत माझ्या
     लोक जगती भीत ज्याला तेच आलो मागण्या मी
     भीक मृत्त्यूची प्रभो तू टाक रे झोळीत माझ्या


निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail-- nishides1944@yahoo.com

No comments:

Post a Comment