मी नवीन कविता लिहिण्यास सुरूवात केली तेंव्हा खूप कविता माझ्या आप्तजनावरच केल्या; जसे मुलगी, नाती, आई, पत्नी, भाऊ वगैरे. नंतर आशा कविता लिहिण्यासाठी मागणी होऊ लागली तेंव्हा मनाशी ठरवले की आता हे पुरे केले पाहिजे. मी या कविता लिहून झाल्यानंतर माझ्यावृध्द आईला वाचून दाखवत असे आणि ती माझे तोंडभर कौतुक करायची. एकदा अशीच एक कविता वाचून दाखवल्यानंतर तिने मला सहजच प्रश्न केला. "तू इतक्या कविता नातेवाईकांवर लिहिल्यास; तुझ्यावर कुणी लिहील का?" या एका प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी जसजसा विचार करू लागलो तसतसे नवीन प्रश्न निर्माण होऊ लागले. पहिला प्रश्न म्हणजे खरेच माझ्यात कोणी कविता लिहावी असे कांही आहे का? मग जीवनाचा आढावा. या विचार मंथनातून तयार झालेली ही वैयक्तिक स्वरूपाची ही रचना.
सर्वांवरती कविता रचल्या
मजवर कोणी रचेल का?
धोपट मार्गी जीवन जगलो
कुणास कांही सुचेल का?
आषाढी कार्तिकीस क्षेत्री
पूर पाहुनी भक्त जनांचा
येथूनच मी पूजा केली
संचय केला पुण्यकणांचा
इथे वाहिल्या भावफुलांनी
विठ्ठल मूर्ती सजेल का?
धोपट मार्गी जीवन जगलो
कुणास कांही सुचेल का?
ग्रिष्म ऋतूचा सूर्य तापला
वसुंधराही करपुन गेली
उपासना सूर्याची करता
शुध्द मनाची हरपुन गेली
माध्यान्हीच्या आर्घ्य जलाने
सूर्य नभीचा भिजेल का?
धोपट मार्गी जीवन जगलो
कुणास कांही सुचेल का?
कर्ज न घेता परत फेडणे
जीवनातले सार असे
देत राहिलो दोन्ही हाते
अजून बाकी फार असे
जीवन सरले देणे उरले
काळ जरासा थिजेल का?
धोपट मार्गी जीवन जगलो
कुणास कांही सुचेल का?
विणत राहिलॉ गोफ जीवनी
बिन गाठींचा हौसेने
मुल्यांकन मी कधी न केले
नात्यांचे धन पैशाने
हीच भावना मनात माझ्या
पुढील जन्मी रुजेल का?
धोपट मार्गी जीवन जगलो
कुणास कांही सुचेल का?
पडो न खांद्यावरी कुणाच्या
ओझे यत्किंचितही माझे
दुबळ्या पायावरती चालत
गाठीन ध्येयाचे दरवाजे
चढाव चढता उतार समयी
देहयष्टी ही झिजेल का?
धोपट मार्गी जीवन जगलो
कुणास कांही सुचेल का?
तिरडी बांधुन आपल्यासाठी
तिरडीवरती मीच झोपलो
मरण येइना लवकर म्हणुनी
माझ्यावरती मीच कोपलो
श्राध्द न करण्या सांगितले तर
पुढील पिढीला रुचेल क?
धोपट मार्गी जीवन जगलो
कुणास कांही सुचेल का?
निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com