Sunday, January 27, 2013

असतोस रुसल्या सारखा


आरशाला मी न दिसलो
केंव्हाच हसल्या सारखा
जीवना माझ्यवरी का
असतोस रुसल्या सारखा?

प्राक्तनी का चकोराच्या
वाट बघणे फक्त असते?
जे हवे ते उंच गगनी
मृगजळासम  दूर दिसते?
चंद्र त्याला या जगी का
असतोय नसल्या सारखा?
जीवना माझ्यवरी का
असतोस रुसल्या सारखा?

सावलीलाही, उन्हाच्या
भोगतो आहे झळांना
आड हसर्‍या चेहर्‍याच्या
लपवितो दुखर्‍या कळांना
खोल जखमा, दावतो मी
खुशहाल असल्या सारखा
जीवना माझ्यावरी का
असतोस रुसल्या सारखा?

प्रेम केले, मी फुलांच्या
भोवती रेंगाळतो
चुंबताना पाकळ्यांना
अंतरी गंधाळतो
मी जगाला का दिसावा
काट्यात फसल्या सारखा?
जीवना माझ्यवरी का
असतोस रुसल्या सारखा?

संकटे घोंघावण्याचा
आज माझा काळ आहे
यत्न करुनी घातलेली
मी यशाची माळ आहे
वाटतो का गौरवाचा
इतिहास पुसल्या सारखा?
जीवना माझ्यवरी का
असतोस रुसल्या सारखा?

बरसल्या गझला नि कविता
धो धो अचानक जीवनी
अन् कशी हाती गवसली!
सौभाग्यवश संजीवनी
ना शिकायत! काव्य जगती
जगतो हरवल्या सारखा
जीवना माझ्यावरी का
असतोस रुसल्या सारखा?


निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३


No comments:

Post a Comment