Thursday, January 10, 2013

जगून घे जरा जरा


लगेच श्वास तू भ्रुणा
भरून घे जरा जरा
लिंग निदाना अधी
जगून घे जरा जरा

जगास तू नकोस का?
विकृती बळावली
स्त्रीच माय देवता
संस्कृतीच हरवली
जन्मण्या अधीच नेत्र
मिटून घे जरा जरा
लिंग निदाना अधी
जगून घे जरा जरा

जन्मुनी रडायची
आज शाश्वती कुठे?
जन्मल्या चुकून ज्या
सदगती तयां कुठे?
अताच दु:ख भोगण्या
शिकून घे जरा जरा
लिंग निदाना अधी
जगून घे जरा जरा

सभ्य खूप चेहरे
आहेत येथे बेगडी
विषयलंपट भोवती
असतील तुझिया सौंगडी
कवायती लढायच्या
करून घे जरा जरा
लिंग निदाना अधी
जगून घे जरा जरा

रक्षणार्थ आपुल्या
खड्ग घे हातात तू
नकोस द्रौपदी बनू
कृष्ण धावा गात तू
भाग्य भाळी आपुल्या
लिहून घे जरा जरा
लिंग निदाना अधी
जगून घे जरा जरा


निशिकांत देशपांडे मो.क्र.९८९०७ ९९०२३
E Mail-- nishides1944@yahoo.com

No comments:

Post a Comment