Friday, February 25, 2022

भास्कर--एक परिपूर्ण आणि बहुआयामी व्यक्तिमत्व

 अशा प्रकारचा लेख लिहायची वेळ माझ्यावर इतक्या लवकर येईल असे जर मला कोणी एक वर्षापूर्वी म्हणाले असते तर मला खरेही वाटले नसते. म्हणून सुरुवात कशी करावी हा मोठा प्रश्न माझ्यासमोर या क्षणाला आहे. काय काय अन् किती लिहावे? अगदी बालपणापासून एकत्र घालवलेले आयुष्य! आठवणींचा भला मोठा पेटारा आहे. 

भास्करबद्दल सांगायचे झाल्यास तो अतिशय मनमिळाऊ, सालस होता. समोरच्याला लिलया जिंकण्याची कला त्याला अवगत होती. खळखळणारे प्रवाही जीवन म्हणजे काय हे सांगणारे उदाहरण होता तो. आमची आर्थिक परिस्थिती खूप बेताची असे म्हणणे सुध्दा अतिशयोक्ती ठारावी इतकी गरिबी होती आमच्या घरी. त्यात तीन बहिणी आणि चार भाऊ असा आमचा जंबो परिवार. तरीही जे आले, आहे ते स्विकारत बालपण गेले. आज ते सारे आठवले की अभिमान वाटतो या फाटक्या आयुष्याचा. 

संस्काराचा परिणाम असेल कदाचित पण कडकीच्या काळातही आम्ही भावंडे कधी भांडल्याचे आठवत नाही. भास्करशी माझे नेहमीच सूत जुळत असे. मतभेद अगदी नगण्य असत लहानपणापासूनच. हाच एकोपा शेवटपर्यंत कायम होता.

भास्करने वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी केली. जेथे जेथे तो कार्यरत होता तेथे तेथे आम्ही उभयता जात असू एखाद्यावेळा तरी. प्रत्येकवेळेस हे प्रकर्षाने जाणवायचे की त्याचा मित्र संचय जबरदस्त असे आणि सर्वांशी तो खेळीमेळीचे संबंध ठेवत असे. मग ते आगदी लहान गाव मंठा असो की कर्नाटकातील खेडे निरना असो. असे संबंध ठेवायला मनाचा मोकळेपणा लागतो जो त्याच्याकडे भरपूर होता. 

त्याच्या व्यक्तिमत्वाचा अजून एक महत्वपूर्ण पैलू म्हणजे जिद्द. चांगल्या अर्थाने तो एक जिद्दी स्वभावाचा माणूस होता. त्याने आयुष्यात काय नाही केले? विशेषतः कला क्षेत्रात! आमच्या घराण्यात संगिताचा वावर नव्हताच म्हंटले तरीही चालेल. संगीत फक्त भुलईची गाणी, काकड आरतीची गाणी, परंपरागत भजने येथेपर्यंतच मर्यादित होता. पण माझी पत्नी जयश्री आली आणि खर्‍या अर्थाने संगिताचा शिरकाव झाला आमच्या घरात. यात अजून भर घातली ती भास्करने. कुठलीही पार्श्वभूमी नसताना तो संवादिनी, तबला, बासरी वाजवत असे. गायन कला पण त्याने बर्‍यापैकी आत्मसात केली होती. मी या पूर्वी भास्करच्या जिद्दीविषयी बोललो आहेच. त्याच्या आणि माझ्या घरात एकच कंपाउंड वाल होती. मी त्याचा बासरीचा, तबल्याचा, आणि संवादिनीचा रियाज तास न तास ऐकलेला आहे. बासरी एका विशिष्ट पोजिशनमधे मान ठेवून वाजवताना त्याची मान दुखत असे. पण पठ्ठ्याने रियाज कधी सोडला नाही.

नंतरच्या जीवनात त्याचा कल अध्यात्माकडे वळला तिथेही जिद्द पावलोपावली दिसत होती. किर्तन करणे, अभंगांचे निरुपण, ज्ञानेश्वरी वाचून समजावणे यात पण त्याचा हातखंडा होता. एकदा आमचे दहा बारा मित्र युरोप टूरवर जाणार होते. या समूहात मी भास्कर आणि त्याची पत्नी आशा यांना येण्यासाठी अग्रह केला. ते तयार झाले. टूरवर जायची तारीख जवळ आली आणि मला मेडिकल इमर्जन्सी आल्याने आम्हा दोघांचे जाणे स्थगित करावे लागले. समूहात सर्व माझे ज्येष्ठ नागरिक संघाचे मित्र होते. भास्कर फक्त नवीन होता. टूर संपल्यानंतर  सर्व मित्र मला भेटले. ते म्हणाले की तुमचा भाऊ फारच हुशार आहे हो सर! रोज सायंकाळी टूरवर असताना ते एका अभंगाचे निरुपण करायचे. ही तारीफ ऐकून मला मूठभर मास चढले!

एक शेवटची आठवण सांगून हे लिखाण संपवतो. भास्कर बँकेत जॉईन व्हायच्या आधी सॉईल काँझर्वेशन खात्यात नोकरीला होता. त्यावेळी एक सहा महिन्याची ट्रेनिंग असे. ती त्याने केली. तो आणि त्याचे पाच मित्र या खात्यात नोकरीला लागले. मी त्याच्यासाठी माझ्या बँकेत नोकरी लावण्याचा प्रयत्न करत होतो. सुदैवाने त्याला यश आले. त्याची ऑर्डर निघाली आणि रुजू होण्याचे आदेश निघाले. तो त्यावेळी जालन्याजवळ सेवली या खेड्यात तो कार्यरत होता. त्याला बँकेत जॉईन होण्यासाठी निरोप पाठवले पण तो कांही प्रतिसाद देत नव्हता. त्या काळात फोन पण नव्हते. शेवटी मी रजा घेऊन औरंगाबादहून जालना आणि जालन्याहून सेवली असा प्रवास सुरू केला. जालन्याहून एक मित्र घेतला सेवलीला जायला. अंतर सात किलोमिटर होते. बस नाही. पायी डोंगर चढून हे अंतर पार करायचे होते. जालन्याहून सकाळी ११ वाजता निघून सायंकाळी सात वाजता पोहंचलो. आमचे बंधूमहाशय एका बाजेवर निजले होते. दोन साईटवरील कामगार त्याच्या अंगाला तेल लाऊन मॉलिश करत होते. अजून एक कामगार स्वयंपाक करत होता. त्याचा हा थाट बघून आवाकच झालो. नोकरीला लागून दोनच महिने झाले होते पण त्याने एक अ‍ॅट्लास सायकल पण घेतली होती जी तेंव्हा एकशे सहा रुपायाला मिळायची. त्याला गोड बोलून, समजाऊन, थोडे दटाऊन बँकेची नोकरी जॉइन करायला मजबूर केले. आणि शेवटी तो बँकेत वैजापूर या शाखेत रुजू झाला. हे सर्व सांगायचे प्रयोजन म्हणजे सॉईल काँझर्वेशन हे खाते लाच खाण्यासाठी तेंव्हा बदनाम होते. भास्करसोबत त्या खात्यात लागलेले सर्व मित्र एका वर्षाच्या कालावधीत लाच प्रकरणी नोकरीतून बरखास्त झाले. हे आठवले की मनात येवून जाते की मी नोकरी बँकेत धरायचा भास्करला केलेला आग्रह त्याच्या पुढील जीवन घडवण्यासाठी एखाद्या समिधेप्रमाणे कारणीभूत झाला.

किती लिहू? साश्रू नयनाने विराम देतो.



निशिकांत देशपांडे, पुणे.

 

 

Saturday, February 12, 2022

अमरत्वाला श्रध्दांजली --(वीक एंड लिखाण)--13.02.22

माणसाचा मेंदू म्हणजे एक विचित्र रसायन आहे. विशेषतः आठवणींच्या बाबत. केंव्हा कोणत्या आठवणी का याव्यात हे एक कोडेच आहे. कधी कालचे आठवत नाही तर कधी बाल्यावस्थेतील घटना स्पष्ट आठवतात. परवा असेच झाले. रात्रीच्या  निरव शांततेत जुनी हिंदी गाणि ऐकत असता एक लता मंगेशकरने गायलेले १९५३ मधे बनलेल्या पतिता नावाच्या सिनेमातील एक गाणे लागले. त्या गाण्याचे बोल होते:

किसीने अपना   बनाके ,  मुझको मस्कुराना सिखा दिया 

अंधेरे घरमे किसीने हसके चिराग जैसे जला दिया

शैलेंद्रने किती सुंदर बोल लिहिले आहेत या गीताचे! तेच शंकर जयकिशन यांनी दिलेल्या संगिताबाबत म्हणता येईल. आणि गायले आहे सदाबहार गायिका लताजींनी

 माझी समाधीच लागली. आणि हे गाणे ऐकत असताना मी माझ्या आयुष्यात जवळ जवळ पन्नास वर्षे मागे गेलो. मला स्पष्ट आठवतय की ज्या दिवशी बंगला देशात १९७१ मधे बंगला मुक्ति बाहिनी आणि भरतीय सैन्यासमोर पाकिस्तानने शरणागती पत्करली त्याच दिवशी मी त्या काळी फिलिप्स कंपनीचा रेकॉर्ड प्लेयर विकत घेतला होता. या कंपनीचे हे एकमेव मॉडेल बाजारात होते. मग जसे आर्थिक दृष्ट्या जमेल तसे दर महिन्यात रेकॉर्ड्स घेणे सुरू झाले. आम्ही पहिली घेतलेली रेकॉर्ड पतिता सिनेमातली होती ज्यात वरचे गाणे होते. हे गाणे आम्ही दिवसातून पाच सहा वेळा तरी ऐकत असू. कधी बोअर झाले नाही. लताचा तलम आवाज, गाण्याची अवीट गोडी खूप खूप लुटली. हा रेकॉर्ड प्लेयर घेतल्यानंतर आमच्या घरात संगीत महोत्सवच सुरू झाला.

आज लतादीदी बद्दल लिहायची तिव्र इच्छा झाली. पण एवढ्या मोठया कलाकाराबद्दल म्या पामराने लिहावे ते काय! आणि गेल्या दोन तीन दिवसात बर्‍याच दिग्गजांनी पुष्कळ लिहिले पण आहे. असंख्य कविता पण लिहिल्या गेल्या आहेत. मी माझ्या वयक्तिक दृष्टीकोनातून आठवायचा  प्रयत्न करणार आहे. प्रचंड सूर्याला ओंजळभर पाण्याने अर्घ्य दिल्यागत.

लताजीने माझ्यासारख्या अनेकांचा , नव्हे तर पूर्ण देशाचा कान बनवला. त्यात लहान, मोठे, सुशिक्षीत, अडाणी सारेच आले. मी लहानपणी, अगदी गुराखी मुले पण जनावरे चारताना शेतात  मन डोले मेरा तन डोले हे गाणे म्हणताना/गाताना ऐकले आहे. अशी वदंता आहे की औरंगजेब हा संगिताचा द्वेष्टा होता. मला खात्री आहे की जर त्या काळी लताजी असत्या तर त्यांना ऐकून तो पण संगिताचा भोक्ता झाला असता. आजही रेडियो लावला तर पहिल्या दहा मिनिटातच लताजींचे गाणे लागले नाही असे होतच नाही. असंख्य मूड्स, असंख्य हरकती, असंख्य खास जागा, काय नाही त्यांच्या गाण्यात. आवड असेल तर आयुष्यभर पुरेल इतका मोठा खजिना आहे संगिताचा! 

बॉलिवुड क्षेत्रातल्या बजबजपुरीच्या अंगणातील पवित्र तुळस म्हणून ज्यांचा आदराने उल्लेख केला जातो त्यात नटी नूतन आणि लतादिदी आहेत. अर्थात हे माझे मत नाही तर साठ पासष्टच्या दरम्यान मी रसरंग नावाचे फिल्म मॅगझीन वाचत असे त्यात मी हे वाचलेले आहे. माझे स्वतःचे मत असे आहे की आमची पिढी खरेच भाग्यवान की आम्ही लताजी, सचिन तेंडूलकर, दिग्गज फिल्म संगितकार, गायक अशा मातब्बर मंडळीस पाहिले, ऐकले आणि जीवनाचे एका अर्थाने सोने झाले. अजून शंभर वर्षाने जर कुणी लताजी बद्दल सांगितले तर असे कोणी होऊन गेले हे खरे पण वाटणार नाही पुढच्या पिढ्यांना. त्यांना ही दंतकथा वाटेल.

मी आणि माझी पत्नी दोघेही दिवसभर टीव्हीला चिकटून बसलो होतो. दिवसभर लताजीच्या प्रेत यात्रेचे कव्हरेज बघत. प्रेतयात्रेत एक ग्रेस होता. आफाट गर्दी पण शांतपणे जमाव धीरगंभीरपणे पुढे सरकत होता. निरव शांतता. कुठेही फालतू घोषणाबाजी नव्हती. नेहमीच्या घोषणा जशा की जबतक सूरज चाँद रहेगा तबतक --------तेरा नाम रहेगा. मराठी चॅनल्सने कलाकारांच्या छान छान आठवणींना उजाळा देणार्‍या मुलाखाती घेतल्या ज्या लहान आणि समयोचित अशा होत्या. त्यात एक मुलाखात पद्मजा फेणानी यांची होती. थोडक्यात त्यांनी लताजींच्या हृद्य आठवणी सागून लताजीने गायलेले फिल्म हकीकत मधील एका गाण्याचा मुखडा गाऊन दाखवला. गीत होते"जरासी आहट होती है दिल सोचता है, कंही ये ओ  तो नही". अप्रतीम गाणे. हे ऐकताना मला अक्षरशः भरून आले. आवंढा कसा बसा गिळत पत्नी तर बघत नाही ना या शंकेने तिच्याकडे बघितले तर तिलाही भरून आलेले होते.

अजून एक किस्सा येथे अवर्जून सांगावासा वाटतो. एकदा उस्ताद बडे गुलाम अली खाँ साहेबाच्या गायनाची मैफिल चालू होती. कार्यक्रम एका शाळेच्या पटांगणावर होता. भव्य पटांगण आणि त्याच्या बाजूला घरे. कार्यक्रम अगदी रंगात आला होता. ख्वाँ साहेब   गायनात तल्लीन झालेले होते. सर्व श्रोते पण मंत्रमुग्ध झालेले होते. खॉसाहेबांनी मधेच गाणे थांबवले आणि डोळे मिटून समाधी लागल्यागत बसले. तब्बल दोन मिनिटांनी त्यांनी डोळे उघडले. श्रोत्यांना कळेना काय झाले ते. नंतर त्यांनीच खुलासा केला. शेजारच्या एका घरात रेडियोवर लताचे गाणे लागले होते. भाई भाई चित्रपटातील "कदर जाने ना मोरा बालम, बेदर्दी मोरा बालम." डोळे उघडून ते स्वतःशीच बोलल्याप्रमाणे म्हणाले जे माईकमुळे सर्वांना ऐकू आले. ते म्हणाले की "ये कंबख्त कभी बेसुरी होतीही नही" किती मोठी ही पावती होती एका दिग्गज कलाकाराकडून लताजींना!

अजून एक आश्चर्यजनक किस्सा सांगतो. एके दिवशी माझा मोबाईल वाजला. पलिकडून एका महिलेचा आवाज. त्यांनी सांगितले की आपले कांही काव्यसंग्रह असतील तर लताजींना हवे आहेत. मी त्यांच्या कार्यालयातून बोलते. त्यांच्या वाचनात कांही आपल्या कविता आल्या आहेत ज्या त्यांना आवडल्या आहेत. मी स्वतःला चिमटाच काढला. अघटित घटना होती ही! मी तरंगायलाच लागलो. मी दुसरेच दिवशी माझे गझल आणि काव्यसंग्रह पाठवून दिले. जवळ जवळ एक महिन्याने मला एक त्यांचे पत्र प्राप्त झाले ज्यात कांही रचनांची नावासकट नोंद घेऊन कविता आवडल्याचे लिहिले होते. माझे नशीब की मला हा ओझरता परीस स्पर्श झाला आणि मी धन्य झालो.

मी पटियाला येथे बँकेत कार्यरत असताना हिंदी कविता लिहीत असे. त्यावेळी लताजींच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्यावर एक कविता (हिंदी) रचली होती. या कवितेची पण त्यांनी नोंद घेतली होती.

जेंहा मोहंम्द रफीचा मृत्यू झाला तेंव्हा अमीन सायानीने एक खास कार्यक्रम पेश केला होता रेडियोवर. या कार्यक्रमाचे नावच होते "जमाने ने देखे जवाँ कैसे कैसे" किती चपखल नाव होते नाही! कित्येक विभूती काळाच्या पडद्याआड दडून गेल्या. हेच लताजींबद्दल पण म्हणता येईल.

कधी कधी एक अशक्य गोष्ट मनात येते. जर आपले आयुष्य  दुसर्‍या माणसाला स्वेच्छेने देता आले असते तर? माझे स्पष्ट मत आहे की लताजी अजरामरच झाल्या असत्या एकार्थाने. कोण नाही देणार आपले थोडेसे आयुष्य या हिरकणीला? मी तर सर्वच देऊन टाकले असते. लतादिदींना श्रध्दांजली एक प्रकारे अमरत्वाला श्रध्दांजली आहे.

वरती ज्या हिंदी कवितचा उल्लेख केला आहे ती खाली पेश करतोय. जड अंतःकरणाने अलविदा, शब्बाखैर.


सदा रहा है उसपर नाज़


सूर देवता कई सालसे

सजी है पहने जिसका साज

सरस्वती और आम जनोंको

सदा रहा है उसपर नाज़


लगे चाँदनी बरस रही है

जबजब तेरे स्वर निकले

सुनकर तेरी धुन कोयलको

तरन्नुम के है पर निकले

अश्वमेध मे स्वर नगरीके

हार गये सब अपने ताज़

सरस्वती और आम जनोंको

सदा रहा है उसपर नाज़


मयुरपंख के मृदुल स्पर्ष सम

भाती है हर तेरी तान

जबभी तुमने गीत है गाये

बढी है उन गीतोंकी शान

दुखियारा एक पल दुख भूले

सुनकर तेरी मधुर आवाज़

सरस्वती और आम जनोंको

सदा रहा है उसपर नाज़


मायूसी चलते लगती है

तेरी धुन सावनकी फुहार

गर्म रेतसा जीवन फिरभी

नग़मे लायें नयी बहार

स्वरसरिता मे डूब गया हूं

मझे न कलकी फिक़्र है आज

सरस्वती और आम जनोंको

सदा रहा है उसपर नाज़


किर्तितेज हिरोंसे बढकर

आसमानमें गया है फैल

जन्मदिनके शुभ अवसर पर

अर्पण तुझपर फूल और बेल

चंदा सूरज रहने तक तुम

करोगी सब के दिलपर राज

सरस्वती और आम जनोंको

सदा रहा है उसपर नाज़



निशिकांत देशपांडे, पुणे.  

मो.क्र. ९८९०७ ९९०२३