ग्रिष्मालाही फुटू लागले
कसे अचानक नवे धुमारे!
मनी नांदतो श्रावण पण का
ओठावरती नको नको रे?
स्पर्श मुलायम मोरपिसांचा
मनास वाटे हवाहवासा
शहारले अन् मोहरले मी
कशी? न होई आज खुलासा
अधीर असुनी अगम्य भिती
मनी प्रश्न हा कसे लपावे?
भाव मनीचे आत दाबुनी
जगणार्याने कसे जगावे?
आणतोस तू वसंतास का
वसंत घेउन तुला येतसे?
कोडे हे सोडवण्यासाठी
मना लागते वेड अन् पिसे
डोळ्यांनाही अता वाटते
स्वप्न तुझे नेहमी पडावे
हातामध्ये हात घेउनी
क्षितिजाच्याही पुढे उडावे
प्रिया कुणाची झाल्यावरती
गोड अनुभुती उरात असते
भावनीक गुंत्यात कळेना
कोण कुणासाठी का झुरते?
निशिकांत देशपांडे. पुणे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
No comments:
Post a Comment