Sunday, May 24, 2020

नव्या युगाच्या उंबरठ्यावर

वागत आलो कसे तेच ते
पिढी दर पिढी आठवल्यावर
मुक्त व्हायची आस जागते
नव्या युगाच्या उंबरठ्यावर

जरी आज ती बरोबरीने
जिम्मेदार्‍या पाळत असते
नेव्ही, सेना अंतराळही
वावरताना ती आढळते
तरी "पराया धन " हे लेबल
तिच्या चिकटते का माथ्यावर?
मुक्त व्हायची आस जागते
नव्या युगाच्या उंबरठ्यावर

स्पर्धात्मक या जमान्यामधे
जिद्द वाढवायाची असते
आटपाट नगराच्या गोष्टी
नांदी संस्काराची नसते
वेळच नसतो विसावयाला
कुणास कुठल्याही थांब्यावर
मुक्त व्हायची आस जागते
नव्या युगाच्या उंबरठ्यावर

जोश यावया लढण्यासाठी
शंख कुणी अन् का फुंकावा?
जिंकायाचा मार्ग आपुला
युध्द तुझे अन् तू ठरवावा
आनंदोत्सव करू साजरा
विजय जीवनी नोंदवल्यावर
मुक्त व्हायची आस जागते
नव्या युगाच्या उंबरठ्यावर

जुने जाहले विचार आता
पोट भराया जगावयाचे
ध्येय असावे उंच एवढे
पुढे सर्वदा चालायाचे
केशवसूता तुझी तुतारी
फुंकायाची ओढ अनावर
मुक्त व्हायची आस जागते
नव्या युगाच्या उंबरठ्यावर

विचार आता एकच आहे
पुढे पुढे अन् पुढे जायचे
नवे पान इतिहासामध्ये
धवल यशाचे लिहावयाचे
छोट्या मोठ्या नको टेकड्या
पाउल टाकू हिमालयावर
मुक्त व्हायची आस जागते
नव्या युगाच्या उंबरठ्यावर


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

No comments:

Post a Comment