Tuesday, December 24, 2019

लढता लढता शहीद करती

लढता लढता शहीद करती
( पाकिस्तानात जाऊन हल्ला करून आलेल्या भारतीय सैनिक पथकातील एका सैनिकाने टीव्हीवर सांगितले होते की आम्ही शत्रूच्या सैनिकावर उपकार केले आणि त्यांना शहीद व्हायची संधी दिली. या एका वाक्यावरून सुचलेली कविता. )

सैनिक अमुचे संस्काराने परोपकारी
इष्ट चिंतिती त्यांचेही ज्यांच्याशी लढती
मौत मरावी कुत्र्याची ही जरी लायकी
त्या शत्रूंना लढता लढता शहीद करती

जिहाद खाती कशासवे ना कळले ज्यांना
तेच सांगती धर्मांधांना करा तबाही
म्हणे तयांना हजार मिळतिल व्हर्जिन पोरी
मेल्या नंतर जन्नत, देतो खुदा बधाई
भ्रष्ट करोनी मुले धाडती मरण्यासाठी
चिथावणारे जीवन अपुले मजेत जगती

पूर्वज ज्यांचे प्रताप राणा, शिवबा, झाशी
ब्रीद शत्रुला सळो की पळो करावयाचे
मनी नांदते तिव्र भावना एकदा तरी
तळहातावर शीर घेउनी निघावयाचे
त्सुनामीस शत्रूच्या थोपवण्याला सैनिक
अभेद्य कातळ आपुल्याच छातीस बनवती

सहनशीलता नसते लक्षण दौर्बल्याचे
प्रसंग येता रणांगणी आम्हीही लढतो
नापाकांनो ध्यान असू द्या अशी लढाई
अंतिम असते, लढताना इतिहास घडवतो
लपवायाला तोंड, नसावी कुणास जागा
अशी वेळ आणूत निश्चये शत्रूवरती

दुष्ट इरादे पूर्ण करायाला कोल्ह्यांनो
डाग लावले जिहादास कोणी रक्ताचे
गुन्ह्यास नाही क्षमा जगी, वाटते असे की
झूटीस्ताना! घडे तुझे भरले पापाचे
कायनात संपवणे तुमची, कार्य आमुचे
ओझे तुमचे असह्य झाले, कण्हते धरती


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३





Sunday, September 1, 2019

माझा श्रीगणेशा


माझा श्रीगणेशा | पाठीशी हमेशा |
वसे दाही दिशा | माझा देव || १ ||

ओंकाराचे रूप | ब्रह्मांड स्वरूप |
ह्रदयी आप्रूप | दर्शनाची || २ ||

गणेशाची स्वारी | आली माझ्या दारी |
आता नको वारी | पंढरीची || ३ ||

उजेड फाकला | अंधार झाकला |
हाच रे दाखला | देवा तुझा || ४ ||

बुद्धीचा सागर | दयेचे आगार |
संसारी माघार | नको आता || ५ ||

ब्रह्मानंदी टाळी | तुझ्या पायतळी |
गेली रात्र काळी | तुझियामुळे || ६ ||

मनातला भाव | जाणी तूच राव |
त्वरे मज पाव | लंबोदरा || ७ ||

विनंती माऊली | देई बा साऊली |
परत पाऊली | नको धाडू || ८ ||

म्हणे "निशिकांत" | होतो मी अशांत |
येता एकदंत | समाधान || ९ ||

निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Thursday, August 1, 2019

नजर टाळण्या सदैव लपते

नजर टाळण्या सदैव लपते

रक्षणार्थ काट्यात जन्मली
कळी तरी का भीत नांदते?
भेदरून ती पानांमागे
नजर टाळण्या सदैव लपते

लोभसवाणे रूप कोवळे
मुक्त कराने निसर्ग देतो
तेच ठरावे शाप असा का?
प्रश्न तिलाही सदैव छळतो
लाख  बंधने तिचियावरती
तिची चूक कुठलीही नसते
भेदरून ती पानांमागे
नजर टाळण्या सदैव लपते

नाव जरी ठेवले निर्भया
भ्रमरांशी हारली लढाई
अवघड जागी केल्या जखमा
लुटून झाल्यावरी मलाई
जनक्षोभाची रस्तोरस्ती
लाट पसरते क्षणात विरते
भेदरून ती पानांमागे
नजर टाळण्या सदैव लपते

जीवन जगणे कसरत आहे
कधी त्सुनामी येते वादळ
सज्ज रहा तू तोंड द्यावया
धीर धरोनी व्हावे कातळ
जिंकत असतो तोच सिकंदर
इतिहासाचे पान सुचवते
भेदरून ती पानांमागे
नजर टाळण्या सदैव लपते

मुग्ध कळ्यांनो कराच निश्चय
खड्ग घेउनी जन्मायाचा
बनून चंडी शस्त्र चालवा
त्रास टाळण्या हिंस्त्र पशूंचा
क्रूर जगी दुर्बलास कोणी
संरक्षण का प्रदान करते?
भेदरून ती पानांमागे
नजर टाळण्या सदैव लपते


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Tuesday, March 19, 2019

होली


रास रचाते नही कन्हैया
नही है राधा भोली
कोई बताओ मेरे यारों
कैसे खेले होली?

होली क त्यौहार है लेकिन
अपनापन खो गया कहाँ?
धर्माधारित झगडे होते
सब मरते है यहाँ वहाँ
क्यों मानव होगया अमानव?
बस्ती अब गुंडों की टोली
कोई बताओ मेरे यारों
कैसे खेले होली?

केसरियाँ को छोड दिया
मिट्टी का है तेल छिडकते
मेहंदी सूखने के पहलेही
कपडे हरदिन है भडकते
फिरे द्रौपदी भीक माँगती
कहाँ कृष्ण जो भर दे झोली?
कोई बताओ मेरे यारों
कैसे खेले होली?

निसर्ग का जब हुआ प्रकोप
भूकंप मे थे मरे अनेक
भाग दौडके आये बाबू
मदद राशी का काटने केक
गबन हो गये धन और आँसू
कौन सुने पीडित की बोली?
कोई बताओ मेरे यारों
कैसे खेले होली?

पूनम के दिन होली रहते
चाँद गगन मे क्यूं ना आया
काली करतूतोंसे हमारी
शायद होगा वह शरमाया
साक्षीधर इसका ना होने
खायी होगी नींद की गोली
कोई बताओ मेरे यारों
कैसे खेले होली?


निशिकांत देशपांडे. मो.क्र.९८९०७ ९९०२३


Saturday, March 9, 2019

घट्ट ओवतो असंख्य नाती


असोत अमुचे धर्म वेगळे
त्यात पुन्हा जाती उप-जाती
भारतीय असल्याचा धागा
घट्ट ओवतो असंख्य नाती

राम कालचा खेड्यामधला
दिवा अंगणी लावायाचा
उजळायाचे रहीमचे घर
शेजारी जो रहावयाचा
अशी दिवाळी दोघांचीही
तेवत होत्या दिव्यात वाती
भारतीय असल्याचा धागा
घट्ट ओवतो असंख्य नाती

सीमेवरती शहीद होतो
धर्म जात का असते त्याला?
भारतीय तो सर्वार्थाने
सलाम करतो देश जयाला
मातृभूमीच्या कुशीत घेते
गौरवगाथा चिरविश्रांती
भारतीय असल्याचा धागा
घट्ट ओवतो असंख्य नाती

जरी संस्कृती जुनी आमुची
ध्यास नेहमी नव्या नव्यांचा
क्षेपण अस्त्रे तयार केली
वापर लिलया संगणकांचा
पादाक्रांत कराया शिखरे
उर्मी उसळे प्रांतोप्रांती
भारतीय असल्याचा धागा
घट्ट ओवतो असंख्य नाती

मुलांसोबती मीही गेलो
अमेरिकेला रहावयाला
खूप सुबत्ता असून तेथे
कुणीच नव्हते बोलायाला
आठवून भारतीय दरवळ
ओघळायचा मी एकांती
भारतीय असल्याचा धागा
घट्ट ओवतो असंख्य नाती

भूतकाळ अन् भविष्य माझे
असे सांधले भारतासवे!
भारतीय होण्या अभिमानी
दुसते कारण कोणते हवे?
जन्मोजन्मी टिळा लावण्या
वापरीन मी इथली माती
भारतीय असल्याचा धागा
घट्ट ओवतो असंख्य नाती


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Monday, February 4, 2019

मनातून मी उतरत आहे


सभ्यपणाच्या मुखवट्यात मी
मूळ कसा? हे विसरत आहे
तत्वहीन जगण्याने माझ्या
मनातून मी उतरत आहे

टिळा कपाळी, परडी हाती
कवड्यांची मी माळ घातली
रोज जोगवा मागत फिरतो
पोट भराया वाट गावली
सत्त्य हे तरी, जगदंबेचा
भक्त मला मी समजत आहे
तत्वहीन जगण्याने माझ्या
मनातून मी उतरत आहे

उजळ असावी प्रतिमा म्हणुनी
स्त्री अन्यायाविरुध्द मोर्चा
उच्च रवाने करीत आलो
रूढ प्रथांच्या विरुध्द चर्चा
बुरसटल्या संस्कारी "मी'ला
प्राणपणाने लपवत आहे
तत्वहीन जगण्याने माझ्या
मनातून मी उतरत आहे

राष्ट्रामध्ये महाराष्ट्र ही
अदभुत घटना इथेच घडते
राजकारणी देशापेक्षा
मोठा झाल्याचे जाणवते
आमजनांना भूक त्रासते
पण नेत्यांना बरकत आहे
तत्वहीन जगण्याने माझ्या
मनातून मी उतरत आहे

देव दीन दुबळ्यांचा असुनी
पायरीवरी भीक मागतो
फुटेल पान्हा आज ना उद्या
मनी भाबडी आस ठेवतो
धनाढ्य लोकांच्या नवसांना
देव मंदिरी पावत आहे
 तत्वहीन जगण्याने माझ्या
मनातून मी उतरत आहे

ढोंग करावे, ढोंग जगावे
आज जाहली आम संस्कृती
आढळली जर पारदर्शिता
तीच वाटते आज विकृती
शुचित्व जपणार्‍या लोकांच्या
असण्यालाही हरकत आहे
तत्वहीन जगण्याने माझ्या
मनातून मी उतरत आहे


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Sunday, January 13, 2019

अजरामर थोडासा झालो

कलेवराच्या डोळ्यांना  मी
अजून थोडे जगा म्हणालो
अमृत प्यालो नसून सुध्दा
अजरामर थोडासा झालो

नेत्रदान ही रम्य कल्पना
वास्तवात मी उतरवल्याने
दोन जिवांचे जगणे आता
बहरत होते कणाकणाने
वरून बघता हास्य तयांचे
मीही आनंदात बुडालो
अमृत प्यालो नसून सुध्दा
अजरामर थोडासा झालो

एकच किडनी हवी जगाया
दुसरीचा मग मोह कशाला?
गरजू मृत्यू शैय्येवरचा
भीक मागतो जगावयाला
वैचारिक या उत्क्रांतीला
शुभशकुनी सुरुवात म्हणालो
अमृत प्यालो नसून सुध्दा
अजरामर थोडासा झालो

माझे अवयव जर का आले
इतरांच्या कामास कधी तर
स्वर्गसुखाला अनुभवेन मी
कांही मजला नको अवांतर
पुण्यकर्म हे घडल्यावरती
म्हणेन क्षितिजापार उडालो
अमृत प्यालो नसून सुध्दा
अजरामर थोडासा झालो

मला कळाले मरणोत्तरही
नक्की येते पुण्य कमवता
तर्कशुध्द दृष्टी जोपासा
बघून देहाची नश्वरता
कर्मकांड अन् श्राध्द कशाला?
देहदान करण्यास निघालो
अमृत प्यालो नसून सुध्दा
अजरामर थोडासा झालो


निशिकांत देशपांडे. मो.क्र.९८९०८७ ९९०२३