Sunday, January 13, 2019

अजरामर थोडासा झालो

कलेवराच्या डोळ्यांना  मी
अजून थोडे जगा म्हणालो
अमृत प्यालो नसून सुध्दा
अजरामर थोडासा झालो

नेत्रदान ही रम्य कल्पना
वास्तवात मी उतरवल्याने
दोन जिवांचे जगणे आता
बहरत होते कणाकणाने
वरून बघता हास्य तयांचे
मीही आनंदात बुडालो
अमृत प्यालो नसून सुध्दा
अजरामर थोडासा झालो

एकच किडनी हवी जगाया
दुसरीचा मग मोह कशाला?
गरजू मृत्यू शैय्येवरचा
भीक मागतो जगावयाला
वैचारिक या उत्क्रांतीला
शुभशकुनी सुरुवात म्हणालो
अमृत प्यालो नसून सुध्दा
अजरामर थोडासा झालो

माझे अवयव जर का आले
इतरांच्या कामास कधी तर
स्वर्गसुखाला अनुभवेन मी
कांही मजला नको अवांतर
पुण्यकर्म हे घडल्यावरती
म्हणेन क्षितिजापार उडालो
अमृत प्यालो नसून सुध्दा
अजरामर थोडासा झालो

मला कळाले मरणोत्तरही
नक्की येते पुण्य कमवता
तर्कशुध्द दृष्टी जोपासा
बघून देहाची नश्वरता
कर्मकांड अन् श्राध्द कशाला?
देहदान करण्यास निघालो
अमृत प्यालो नसून सुध्दा
अजरामर थोडासा झालो


निशिकांत देशपांडे. मो.क्र.९८९०८७ ९९०२३

No comments:

Post a Comment