Sunday, April 30, 2017

ओसरी कोणी सारवत नाही


दिवस उगवतो पूर्वीसारखा
कोंबडं कधी आरवत नाही
रसायनाने फरशी साफ
ओसरी कोणी सारवत नाही

भोळी अनपढ बहिणाबाई
चार वेद सांगून गेली
सोप्या चार ओळीची भीक
सरस्वती घेऊन गेली
बाबा ब्लॅकशिपची गुटी देतोय
ओव्या अभंग भरवत नाही
रसायनाने फरशी साफ
ओसरी कोणी सारवत नाही

आईला माझ्या वेळ नाही
महिला मंडळ, सखी मंच
स्त्री अन्यायाविरुध्द मोर्चा
कधी डिनर कधी लंच
पेप्सी, चॉकलेट सारे देते
मायेनं हात फिरवत नाही
रसायनाने फरशी साफ
ओसरी कोणी सारवत नाही

बघून स्त्रीचं मंगल रूप
देवी मानून करतो पूजा
शक्ती जाणून तिला कल्पिले
चतुर्भुजा अन् अष्टभुजा
स्त्री भ्रुण हत्येसम पापाचा
जगात दुसरा पर्वत नाही
रसायनाने फरशी साफ
ओसरी कोणी सारवत नाही

चाणाक्याच्या या देशात
राजनिती नासून गेली
देशाच्या उजळ चेहर्‍याला
काळिमा फासून गेली
सारे एका माळेचे मणी
मतदान आज करवत नाही
रसायनाने फरशी साफ
ओसरी कोणी सारवत नाही

सगळच जग बदललय कसं
चांगलं जुनं दिसत नाही
कृष्ण कन्हैया शिट्टी मारतोय
गालात गोड हसत नाही
सूर्य बसलाय ढोलीत दडून
भ्याड प्रकाश मिरवत नही
रसायनाने फरशी साफ
ओसरी कोणी सारवत नाही

आरशामध्ये बघून सांगतोय
चांगल्या कविता लिहीत नाही
जशी मागणी तसा पुरवठा
हे काय मला माहीत नाही?
नवकाव्याची मुजोर मस्ती
कोणीच कशी जिरवत नाही
रसायनाने फरशी साफ
ओसरी कोणी सारवत नाही


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Friday, April 28, 2017

स्वप्न रंगवित असतो


आयुष्या! लोभसवाणे
मी तुला चितारित असतो
मृगजळी चिंब भिजण्याच्या
स्वप्नांस रंगवित असतो

खाचा, खळगे रस्त्यांचे
ही तुझी देणगी देवा
चाखली मजा आनंदे
समजून संकटे  मेवा
वेदनेस कुरवाळावे
मी मलाच शिकवित असतो
मृगजळी चिंब भिजण्याच्या
स्वप्नांस रंगवित असतो

मी अपार दु:खे माझी
ना कोणाला सांगितली
अन् भीक दयेची देवा
का कधी तुला मागितली?
देवास कोसणार्‍यांना
मी सदैव हिणवित असतो
मृगजळी चिंब भिजण्याच्या
स्वप्नांस रंगवित असतो

एकदा कळाल्यावरती
नाते ऋणानुबंधाचे
आहे जे व्यथेसवे ते
प्रेमाने जपावयाचे
मी निवडुंगाला सुध्दा
अंगणात फुलवित असतो
मृगजळी चिंब भिजण्याच्या
स्वप्नांस रंगवित असतो

सुखदु:खांचे असणे अन्
नसणेही मीच ठरवतो
व्याख्यांना जुन्या पुराण्या
मी पदोपदी ठोकरतो
माझ्या मी कलंदरीला
खतपाणी घालत असतो
मृगजळी चिंब भिजण्याच्या
स्वप्नांस रंगवित असतो

संपल्या वेदना सार्‍या
स्वरस्य अता ना उरले
ऐलतीर सोडायाला
मन किती तरी आतुरले!
पैलतीर हल्ली मजला
सारखा खुणवित असतो
मृगजळी चिंब भिजण्याच्या
स्वप्नांस रंगवित असतो

निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Wednesday, April 12, 2017

सुखात जगलो


हात धरोनी हाती, दोघेही मोहरलो
सहवासाची अनेक वर्षे सुखात जगलो

ग्रिष्म असोनी मल्हाराचे सूर छेडले
वादी अन् संवादी स्वरही चिंबचिंबले
राग असोनी अनवट दोघेही गुणगुणलो
सहवासाची अनेक वर्षे सुखात जगलो

रंगपंचमी जीवन सारे रंग उधळले
रंग टाकले जे अंगवर, मनात रुजले
कधी वेगळे आपण दोघे कुणा न दिसलो
सहवासाची अनेक वर्षे सुखात जगलो

अल्पायुष्यी बहार असते अनुभवायला
वसंत अमुचा नकार देतो मावळायला
रोमांचांना पांघरुन दोघे शिरशिरलो
सहवासाची अनेक वर्षे सुखात जगलो

येत नसोनी जरा व्याकरण, शब्द वेचले
आठवणींच्या मोत्यांना धाग्यात ओवले
आत्मकहाणी वाचत दोघे धुक्यात रमलो
सहवासाची अनेक वर्षे सुखात जगलो

आयुष्याची जरी सांगता दु:खी असते
पुनर्जन्म ही खळखळणारी उर्मी बनते
पहाट दिसता नवजन्माची, खुशीत हसलो
सहवासाची अनेक वर्षे सुखात जगलो


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३





Wednesday, April 5, 2017

झुगारून मी जगतो आहे


हार असोनी निश्चित माझी
जिद्दीने धडपडतो आहे
तुझे जीवना जोखड आता
झुगारून मी जगतो आहे

भावविश्व हा बालेकिल्ला
भक्कम आहे आयुष्याचा
जिथे पाहतो वावर माझ्या
अंधराचा, जाज्वल्याचा
जे घडले ते मीच घडवले
खुशीत हसतो, रडतो आहे
तुझे जीवना जोखड आता
झुगारून मी जगतो आहे

गेले वृंदावन तुळशीचे
अंगण कोठे लुप्त जाहले?
खुराड्यास सदनिका म्हणोनी
जीवन आहे बरे चालले
टोच सोसण्या अधोगतीची
बधीर काळिज करतो आहे
तुझे जीवना जोखड आता
झुगारून मी जगतो आहे

वळणावळणावरती लाखो
लोक भेटले, निघून गेले
मोजकेच, पण भेटल्यातले
जीव लाउनी छळून गेले
झाकत जखमा भळभळणार्‍या
केविलवाणे हसतो आहे
तुझे जीवना जोखड आता
झुगारून मी जगतो आहे

लिहावयाला जरी घेतले
आत्मवृत्त मी मृत्यूनंतर
पानोपानी एल्गाराचे
वाचकास येइल प्रत्त्यंतर
दिल्यास तू ज्या व्यथा प्राक्तना
समासात मी लिहितो आहे
तुझे जीवना जोखड आता
झुगारून मी जगतो आहे

बांधलेस प्रश्नांचे तोरण
तूच जीवना दारावरती
जगतो आहे रुबाबात मी
श्वास थांबुनी मेल्यावरती
थाटाने मी चारजणांच्या
खांद्यावरती निघतो आहे
तुझे जीवना जोखड आता
झुगारून मी जगतो आहे


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३