गूज मनीचे सांगायाला
आरशासवे बोलत असते
खूप माणसे सभोवताली
तरी एकटी नांदत असते
नसे बालपण आठवायला
तारुण्याची तीच कहाणी
वसंत आला, निघून गेला
ग्रिष्माची नेहमी विरानी
वेदनेतही जीवन गाणे
आळवीत ती सुरात असते
खूप माणसे सभोवताली
तरी एकटी नांदत असते
विद्याविभुषित झाली होती
मोठी आशा मनी ठेउनी
स्वप्न केवढे साधे होते
जगावयाचे माणुस म्हणुनी
वशिला नाही तिला कुणाचा
तरी नोकरी शोधत असते
खूप माणसे सभोवताली
तरी एकटी नांदत असते
सराव असुनी अंधाराचा
म्लान म्लानसे दिसे पाखरू
गौतम बुध्दा जरा लक्ष दे
खचते आहे तुझे लेकरू
हास्य लेउनी ओठावरती
अंतरात ती खितपत आहे
खूप माणसे सभोवताली
तरी एकटी नांदत असते
हिरे, माणिके अन् रत्नांचे
स्वप्नही तिला कधी न पडले
काल संपला, आज जगाया
जिद्दीने लढते, धडपडते
नैराश्याला दूर ढकलुनी
पुढे पुढे ती चालत अस्ते
खूप माणसे सभोवताली
तरी एकटी नांदत असते
तिला मिळाली गार सावली
अनामिकाची जशी अचानक
हास्य उमलले ओठांवरती
भूतकाळ विसरुनी भयानक
आनंदाच्या डोही हल्ली
सूर मारुनी पोहत असते
खूप माणसे सभोवताली
तरी एकटी नांदत असते
निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
No comments:
Post a Comment