Thursday, January 12, 2017

हसावयाचे


आनंदाचा लेप लाउनी जगावयाचे
ठराव केला, दु:ख असू दे , हसावयाचे

मंतरलेला काळ आठवे जेंव्हा जेंव्हा
गंध दरवळे मनात माझ्या अमाप तेंव्हा
भूतकाळच्या हेमकणांना टिपावयाचे
ठराव केला, दु:ख असू दे , हसावयाचे

नभास बाहूमधे भरावे, मनी इरादा
चौकटीतला गुदमर सोसुन काय फायदा?
धीर धरोनी श्वास मोकळे भरावयाचे
ठराव केला, दु:ख असू दे , हसावयाचे

जिथे जायचे तिकडे सारे उडून गेले
एकलपणचे सदैव असते रिचवत प्याले
विरान रस्त्यानेच एकटे फिरावयाचे
ठराव केला, दु:ख असू दे , हसावयाचे

कधी न दिसतो त्या देवाला पूजत असते
सुख ना येते कधी अंगणी, उदास नसते
मनी ठरवले बंडखोर मी बनावयाचे
ठराव केला, दु:ख असू दे , हसावयाचे

आत्मवृत्त मी लिहावयाला तयार नाही
लपवायाला एक जीवनी भुयार नाही
जीवन गाणे ध्वनिमुद्रित मज करावयाचे
ठराव केला, दु:ख असू दे , हसावयाचे


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

No comments:

Post a Comment