Sunday, October 9, 2016

सुसह्य वाटत आहे---

( आज माझा ७२रावा वाढदिवस. मित्र मैत्रिणिंकडून येणार्‍या सदिच्छांच्या श्रावणात भिजत भाव व्यक्त करण्यासाठी लिहिलेली कविता. )

जगता जगता उपकाराचे ओझे पेलत आहे
यारों तुमच्यामुळेच जीवन सुसह्य वाटत आहे

मेत्र-मैत्रिणी हीच संपदा कमावली मी लिलया
काटेरी आयुष्य बहरले, तुमची सारी किमया
इंद्रधनूचे रंग सातही मजेत उधळत आहे
यारों तुमच्यामुळेच जीवन सुसह्य वाटत आहे

आशिर्वचने जशी बरसली धोधो होउन श्रावण
चिंबचिंबलो, क्षणात झाला ग्रिष्म किती मनभावन
मरगळ गेली, कात टाकली असेच भासत आहे
 यारों तुमच्यामुळेच जीवन सुसह्य वाटत आहे

कविता लिहितो, गझला लिहितो बाळबोध वळणांच्या
चुचकारुन प्रोत्साहित करता, जणू खास ढंगांच्या
तुम्हीच धक्का दिला चालण्या पुढती, जाणत आहे
यारों तुमच्यामुळेच जीवन सुसह्य वाटत आहे

पहिल्या, शेवटच्या श्वासातिल अंतर जीवन असते
भेटत गेले वळणांवरती दोस्त चालता रस्ते
स्वर्ग नको, दे असे मित्र, देवाला विनवत आहे
यारों तुमच्यामुळेच जीवन सुसह्य वाटत आहे


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

No comments:

Post a Comment