Saturday, October 8, 2016

कांहीच होत नाही


आयुष्य फरपटीचे, नशिबी सुखांत नाही
माझ्या मनाप्रमाणे कांहीच होत नाही

सारे मला मिळाले, पण केवढे उशीरा !
दु:खात राहण्याची जडली सवय शरीरा
सुख भेटले कधी तर, मी गीत गात नाही
माझ्या मनाप्रमाणे कांहीच होत नाही

ना पहिला कधीही मी धूर सोनियाचा
बस एक प्रश्न होता खळगीस भाकरीचा
पावेल देव इतका दम आसवात नाही
माझ्या मनाप्रमाणे कांहीच होत नाही

आव्हेरले तिने मज, मी भाळलो जिच्यावर
स्वप्नात ती न चुकता डोकावते बरोबर
गेली निघून संधी, परतून येत नाही
माझ्या मनाप्रमाणे कांहीच होत नाही

मार्गात जीवनाच्या, अपुले कुठे मिळाले?
ज्यांच्यात गुंतलो मी, तेही पसार झाले
धाग्यात रेशमाच्या, कुठलेच गोत नाही
माझ्या मनाप्रमाणे कांहीच होत नाही

अंधार, तेज जेथे लढतात ताकदीने
पाहून तेज हरले, अंधारलीत किरणे
उजळावयास पूर्वा, कुठलाच स्त्रोत नाही
माझ्या मनाप्रमाणे कांहीच होत नाही

मरणोपरांत कौतुक, श्रध्दांजलीत दिसले
तिरडीवरील शवही होते मनात हसले
ऐकून मस्त वाटे जे ऐकिवात नाही
माझ्या मनाप्रमाणे कांहीच होत नाही


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

No comments:

Post a Comment