Wednesday, June 29, 2016

मनात दडली होती


हातामध्ये हात घेउनी
उडान भरली होती
पंख मिळाले स्वप्नांना,जी
मनात दडली होती

रंगरूप ना आयुष्याला
जगणे, जगणे नव्हते
परीघ सोडुन अंधाराचा
कुठे नांदणे नव्हते
तू आल्यावर पहाट पहिली
सखे उगवली होती
पंख मिळाले स्वप्नांना,जी
मनात दडली होती

श्वास अधूरे, आस अधूरी
धूसर धूसर सारे
मळभ धुक्याचे चित्र दावते
अर्धे, दुरावणारे
तुझ्या सोबती पूर्णत्वाने
प्रीत बहरली होती
पंख मिळाले स्वप्नांना,जी
मनात दडली होती

ग्रिष्म संपता संपत नव्हता
वसंत होता रुसला
पानगळीचा पत्ता माझा
धीर मनीचा खचला
तुझ्या संगती चैत्रपालावी
नवाळ फुटली होती
पंख मिळाले स्वप्नांना,जी
मनात दडली होती

विस्कटलेल्या आयुष्याची
घातलीस तू घडी
भणंगास या सूट दिली पण
फक्त हवी तेवढी
दोघांनीही सुखदु:खाशी
पैज जिंकली होती
पंख मिळाले स्वप्नांना,जी
मनात दडली होती

मनात माझ्या भीती होती
तेच नेमके घडले
पिंड ठेवता तुझा, कावळे
मागे होते सरले
पुढील जन्मी भेटू म्हणता
झडप मारली होती
पंख मिळाले स्वप्नांना,जी
मनात दडली होती


निशिकांत डेशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Thursday, June 16, 2016

तसा उधाणत गेलो


छंद म्हणोनी गतकाळाला
रोज खुणावत गेलो
आठवणींची झुळूक आली
तसा उधाणत गेलो

गवाक्षातुनी तुला भविष्या!
कधी न बघता आले
तरी निघालो योग्य दिशेने
अंधारी चाचपले
ध्येय दूर पण तरी चालता
मनी सुखावत गेलो
आठवणींची झुळूक आली
तसा उधाणत गेलो

कमी आत्मबल म्हणून देवा
हात पसरले होते
चालायाची मनात भीती
पाय घसरले होते
दुबळा म्हणुनी माझ्यापासुन
मीच दुरावत गेलो
आठवणींची झुळूक आली
तसा उधाणत गेलो

वळून बघता मागे दिसले
धागे विसकटलेले
अपुले ज्यांना समजत होतो
हवेत ते विरलेले
दोष न कोणा, "चुकलो मी हे"
मला बजावत गेलो
आठवणींची झुळूक आली
तसा उधाणत गेलो

भाग्य वाटणे चालू असता
मीच नेमका नव्हतो
भविष्य माझे घडवायाचे
काम अता मी करतो
घामाच्या लोंढ्यात नेहमी
मस्त प्रवाहत गेलो
आठवणींची झुळूक आली
तसा उधाणत गेलो

वर्तमान का दिवाळखोरी
पदोपदी दाखवतो
वैभवशाली पण वांझोटा
भूतकाळ आठवतो
गूढ भविष्याकडे उडाया
पंख बळावत गेलो
आठवणींची झुळूक आली
तसा उधाणत गेलो


निशिकांत डेशपांडे . मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Wednesday, June 8, 2016

मनी शुन्य मोठे मला भासलो मी ( वृत्त--भुजंग प्रयात )


माझ्या पत्नीची परवाच एक शस्त्रक्रिया झाली. तिला शस्त्रक्रिया गृहात नेले आणि मी बाहेर एकटाच-सर्वार्थाने- विमनस्कपणे बसलो. त्यावेळी मनात आलेल्या विचारांच्या वादळातून जन्म घेतलेली रचना:-

वजावट तिची एक क्षणही रुचेना
किती एकटा या क्षणी जाहलो मी!
करू मुल्यमापन स्वतःचे ठरवता
मनी शुन्य मोठे मला भासलो मी

चलत् चित्रपट लागला का दिसाया
अचानक असा मस्त जगल्या क्षणांचा?
सदा गंध धुंदीत गंधाळल्याने
कधी त्रास झाला न कुठल्या व्रणांचा
तरी आज का वाटते या मनाला?
कपारीत ओल्या जणू वाळलो मी
करू मुल्यमापन स्वतःचे ठरवता
मनी शुन्य मोठे मला भासलो मी

तुझ्या गैरहजरीत का एकदम हे
थवे आज येती जुन्या आठवांचे?
असे रात्र काळी जरी संकटांची
तरी रिमझमे चांदणे पौर्णिमेचे
असो ग्रिष्म, पतझड, तुझ्या संगतीने
नभी श्रावणाच्या किती चिंबलो मी!
करू मुल्यमापन स्वतःचे ठरवता
मनी शुन्य मोठे मला भासलो मी

जगायास उर्मी सखीने दिली पण
क्षणाचीच मरगळ किती ही भयानक?
जिथे नांदली प्रीत बहरून तेथे
उदासीस थारा मिळाला अचानक
उसास्यांस माझ्या कसे थांबवावे?
समस्येत गुंतून भांबावलो मी
करू मुल्यमापन स्वतःचे ठरवता
मनी शुन्य मोठे मला भासलो मी

कसा एकटे एक क्षण राहण्याच्या
परिक्षेत सपशेल नापास झालो?
जरी अपयशाशी अशी भेट झाली
तरी हास्य ओठी, यशालाच भ्यालो
सखे, ऑपरेशन यशस्वी उरकले
तसा जीव भांड्यात, आनंदलो मी
करू मुल्यमापन स्वतःचे ठरवता
मनी शुन्य मोठे मला भासलो मी

चला सुरकत्यांनो तुम्हाला हसाया
किती छान कारण, हवेसे मिळाले!
बघोनी सदा काळजी चेहर्‍यावर
तुझे दर्पणा! त्राण होते गळाले
पुन्हा रंग भरण्या नव्या कुंचल्याने
तुझी साथ मिळताच सरसावलो मी
करू मुल्यमापन स्वतःचे ठरवता
मनी शुन्य मोठे मला भासलो मी


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३