Tuesday, November 24, 2015

दस्तक कोणी दिली असावी?


सताड उघडे दार असोनी
दस्तक कोणी दिली असावी?
ओझरती सावली सखीची
रित्या मनी का अशी भरावी?

पुस्तकातले मोरपीस अन्
आठवणी त्या किती मखमली !
शोभायाचे तुला केवढे !
लज्जेचे ते वस्त्र मलमली
उर्मी येते मनी आजही
पुन्हा निरागस छबी बघावी
ओझरती सावली सखीची
रित्या मनी का अशी भरावी?

वेड मनाला जसे लागले
तुला हासरे बघावयाचे
डाव रडीचा खेळत आलो
तुला ठरवुनी जिंकवायचे
दु:खाचा लवलेश नसावा
मनी तुझ्या ना खंत उरावी
ओझरती सावली सखीची
रित्या मनी का अशी भरावी?

जिच्यामुळे ओंजळी भरोनी
हास्य पौर्णिमा मला गवसल्या
श्वास जाहली, ध्यास जाहली
श्रावणातल्या सरी बरसल्या
इथे न जमले क्षितिजापुढती
तिची नि माझी भेट घडावी
ओझरती सावली सखीची
रित्या मनी का अशी भरावी?

ढासळलेल्या मनी नांदते
भकास घरटे उदासवाणे
मैफिल सरली, बेसुर गातो
तुझ्या आठवांचे रडगाणे
अंत जिचा एकांत असावा
असी कुणाची प्रीत नसावी
ओझरती सावली सखीची
रित्या मनी का अशी भरावी?

वास्तव हे की, वास्तवसुध्दा
आज क्षणाचे वास्तव असते
फक्त चिरंजिव याद सखीची
जगावयाचा श्वास रुजवते
रुजवणीतुनी पर्णफुटीची
आस वसंती मनी रुजावी
ओझरती सावली सखीची
रित्या मनी का अशी भरावी?


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishdes1944@yahoo.com

No comments:

Post a Comment