खोल कपारीमधील काळिज
कधी चोरले? कळले नाही
शिकार झाल्या क्षणापासुनी
मी माझी रे! उरले नाही
विरहदाह मी शांत कराया
शीतल चांदण फुले माळली
स्वप्न बघू तर कसे बघू मी?
डोळ्यामध्ये प्रीत जागली
चंद्र भाळला! तुला सोडुनी
चित्त कुठेही रमले नाही
शिकार झाल्या क्षणापासुनी
मी माझी रे! उरले नाही
मेघ सावळा गेला भिजवुन
शहारलेले अंग मखमली
तरी पेटली यौवन काया
भाव मनी दाटले मलमली
बांध नको! मी नदी असोनी
अधी कधी खळखळले नाही
शिकार झाल्या क्षणापासुनी
मी माझी रे! उरले नाही
स्वप्न रुपेरी नेत्री माझ्या
रंगवले अन् हरवलास तू
असे वाटते स्पंदनातुनी
माझ्यासंगे बहरलास तू
वादळातही निरव शांतता
पान एक सळसळले नाही
शिकार झाल्या क्षणापासुनी
मी माझी रे! उरले नाही
काय हवे वेगळे याहुनी?
श्वास मिसळले तुझे नि माझे
मुक्त छंद क्षितिजावर गाऊ
विषय सुखाचे कशास ओझे?
चिरंजीव ही पहाट अपुली
इथे कधी मावळले नाही
शिकार झाल्या क्षणापासुनी
मी माझी रे! उरले नाही
निशिकांत देशपांडे mo. no. 9890799023
E Mail--- nishides1944@yahoo.com
No comments:
Post a Comment