Friday, November 27, 2015

लावणी

लावणी---{माझा पहिला प्रयत्न. चूकभूल देणे घेणे. चाल--राजसा जवळी जरा बसा..गायिका: लता मंगेशकर. या लावणीची चाल जाणण्यासाठी क्लिक करा http://gaana.com/song/rajasa-javali-jara-basa. चालीवर गुणगुणत वाचल्यास जास्त मजा येईल.)

पिळदार, अंग कसदार, फेटा जरतार, भाळले राया
मी नार, ज्वानीचा भार, पेटली काया

भेटता नजर नजरेला
खेळ रंगला, पिरतिचा बाई
मी अशी हरवले, चैन जिवाला नाही

हासले, मनी लाजले
भान हरवले, पाहुनी सजणा
पाहिजे काय ते माझं मला बी कळना

आवरु, कसे सावरू?
बंड पाखरू, मनी बेबंद
वय धोक्याचं अन् तुझा लागला छंद

आतली, शिवण घातली
पुन्हा उसवली, तंग चोळीची
मी शिवू कंचुकी, कती सैल मापाची?


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishdes1944@yahoo.com

Tuesday, November 24, 2015

दस्तक कोणी दिली असावी?


सताड उघडे दार असोनी
दस्तक कोणी दिली असावी?
ओझरती सावली सखीची
रित्या मनी का अशी भरावी?

पुस्तकातले मोरपीस अन्
आठवणी त्या किती मखमली !
शोभायाचे तुला केवढे !
लज्जेचे ते वस्त्र मलमली
उर्मी येते मनी आजही
पुन्हा निरागस छबी बघावी
ओझरती सावली सखीची
रित्या मनी का अशी भरावी?

वेड मनाला जसे लागले
तुला हासरे बघावयाचे
डाव रडीचा खेळत आलो
तुला ठरवुनी जिंकवायचे
दु:खाचा लवलेश नसावा
मनी तुझ्या ना खंत उरावी
ओझरती सावली सखीची
रित्या मनी का अशी भरावी?

जिच्यामुळे ओंजळी भरोनी
हास्य पौर्णिमा मला गवसल्या
श्वास जाहली, ध्यास जाहली
श्रावणातल्या सरी बरसल्या
इथे न जमले क्षितिजापुढती
तिची नि माझी भेट घडावी
ओझरती सावली सखीची
रित्या मनी का अशी भरावी?

ढासळलेल्या मनी नांदते
भकास घरटे उदासवाणे
मैफिल सरली, बेसुर गातो
तुझ्या आठवांचे रडगाणे
अंत जिचा एकांत असावा
असी कुणाची प्रीत नसावी
ओझरती सावली सखीची
रित्या मनी का अशी भरावी?

वास्तव हे की, वास्तवसुध्दा
आज क्षणाचे वास्तव असते
फक्त चिरंजिव याद सखीची
जगावयाचा श्वास रुजवते
रुजवणीतुनी पर्णफुटीची
आस वसंती मनी रुजावी
ओझरती सावली सखीची
रित्या मनी का अशी भरावी?


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishdes1944@yahoo.com

Tuesday, November 17, 2015

मनास नाही सवड क्षणाची

घरी संपदा पाणी भरते
उशास आहे चवड सुखांची
जरी लोळतो सुबत्तेत मी
मनास नाही सवड क्षणाची

झगमगणार्‍या सदनिकांतुनी
नांदत असते स्मशानशांती
महाग झुंबर घरोघरी पण
देवा पुढती दिवा न ज्योती
चार वृक्ष अन् लॉन जराशी
प्रचंड हिरवळ सुसंस्कृतांची
जरी लोळतो सुबत्तेत मी
मनास नाही सवड क्षणाची

संस्कृतीत इथल्या ना बसते
कधी बोलणे शेजार्‍यांशी
दार घराचे बंद आणखी
बोलतात पडदे खिडक्यांशी
सदैव गुदमर मनात माझ्या
खरी वेदना आडपडद्यांची
जरी लोळतो सुबत्तेत मी
मनास नाही सवड क्षणाची

कसा पिंजरा सोनेरी हा!
कैद वाटते लोभसवाणी
हनीसींगचा घरात वावर
कुठे हरवली अभंगवाणी?
ढासळत्या मुल्यास बघोनी
बंदी येथे रडावयाची
जरी लोळतो सुबत्तेत मी
मनास नाही सवड क्षणाची

कधी वाटतो कशास आलो?
धडपड करुनी या वळणावर
मनात येते, निरव शांतता
मिळेल निजल्यावर सरणावर
ऐहिक पुढती अन् मी मागे
ससेहोलपट किती जिवाची?
जरी लोळतो सुबत्तेत मी
मनास नाही सवड क्षणाची

घरात छोट्या मोठे मन हे
नांदत असते आनंदाने
तत्व येथले, प्रसंग येता
धावत यावे शेजार्‍याने
सारे माझे, मी सार्‍यांचा
चाळ आठवे बालपणाची
जरी लोळतो सुबत्तेत मी
मनास नाही सवड क्षणाची


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail---nishides1944@yahoo.com

</ul>

Friday, November 13, 2015

टाकली मी कात आहे


सोडुनी सारी उदासी
गीत नवखे गात आहे
खेचुनी काळास मागे
टाकली मी कात आहे

तरतरी, ताजेपणा हे
तत्व माझ्या जीवनाचे
ग्रिष्म सोसाया मनी मी
बांधले घर श्रावणाचे
ही सुखाची लाट कसली!
जात नाही, येत आहे
खेचुनी काळास मागे
टाकली मी कात आहे

सामना करतो उन्हाचा
चांदण्याला पांघरोनी
पीक घेतो पौर्णिमेचे
आवसेला नांगरोनी
ना असे दुष्काळ येथे
ना कशाची भ्रांत आहे
खेचुनी काळास मागे
टाकली मी कात आहे

मार्ग क्रमितो जीवनाचा
चाललो आयुष्य सारे
वाटले सारे मिळाले
भेटता मज चंद्र तारे
जाणले येवून येथे
फक्त ही सुरुवात आहे
खेचुनी काळास मागे
टाकली मी कात आहे

झगमगाटाच्या जगी या
वेगळेसे स्थान माझे
मी कुणालाही न झालो,
ना कधी होईन ओझे
गर्द अंधारात सुध्दा
तेवणारी ज्योत आहे
खेचुनी काळास मागे
टाकली मी कात आहे

धावणार्‍या या जगाला
ना कळे बाजू जमेची
एकटा मागे म्हणोनी
भीक का देता दयेची?
आत्मविश्लेषण कराया
लाभला एकांत आहे
खेचुनी काळास मागे
टाकली मी कात आहे


निशिकांत देश्पांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail---nishides1944@yahoo.com

Monday, November 2, 2015

मी माझी रे! उरले नाही

खोल कपारीमधील काळिज
कधी चोरले? कळले नाही
शिकार झाल्या क्षणापासुनी
मी माझी रे! उरले नाही

विरहदाह मी शांत कराया
शीतल चांदण फुले माळली
स्वप्न बघू तर कसे बघू मी?
डोळ्यामध्ये प्रीत जागली
चंद्र भाळला! तुला सोडुनी
चित्त कुठेही रमले नाही
शिकार झाल्या क्षणापासुनी
मी माझी रे! उरले नाही

मेघ सावळा गेला भिजवुन
शहारलेले अंग मखमली
तरी पेटली यौवन काया
भाव मनी दाटले मलमली
बांध नको! मी नदी असोनी
अधी कधी खळखळले नाही
शिकार झाल्या क्षणापासुनी
मी माझी रे! उरले नाही

स्वप्न रुपेरी नेत्री माझ्या
रंगवले अन् हरवलास तू
असे वाटते स्पंदनातुनी
माझ्यासंगे बहरलास तू
वादळातही निरव शांतता
पान एक सळसळले नाही
शिकार झाल्या क्षणापासुनी
मी माझी रे! उरले नाही

काय हवे वेगळे याहुनी?
श्वास मिसळले तुझे नि माझे
मुक्त छंद क्षितिजावर गाऊ
विषय सुखाचे कशास ओझे?
चिरंजीव ही पहाट अपुली
इथे कधी मावळले नाही
शिकार झाल्या क्षणापासुनी
मी माझी रे! उरले नाही


निशिकांत देशपांडे mo. no. 9890799023
E Mail--- nishides1944@yahoo.com