आठवणींचा धोधो श्रावण बरसत आहे
हास्य लेउनी जगणे मोठी कसरत आहे
प्रिया बावरी, अधीर प्रियकर श्रावणमासी
भेटीविन का हिरवळीतही दिसे उदासी?
विरहाच्या दाहाला मोठी बरकत आहे
हास्य लेउनी जगणे मोठी कसरत आहे
ठरले होते बाग अंतरी फुलवायाचे
श्वास तुझे अन् माझे होते मिसळायाचे
स्वप्न पूर्ण ना झाले, नेत्री तरळत आहे
हास्य लेउनी जगणे मोठी कसरत आहे
हिम्मत आहे जिद्द बाळगत जगावयाची
ग्रिष्मामध्ये श्रावणासही फुलवायाची
अपुल्यासाठी पहाट पूर्वा उजळत आहे
हास्य लेउनी जगणे मोठी कसरत आहे
श्रावण गेला निघून याचे नकोच दडपण
दुसरा येइल, ओंजळीत चल धरूत आपण
भविष्य उज्वल काय बघाया हरकत आहे?
हास्य लेउनी जगणे मोठी कसरत आहे
निसर्गावरी विसंबायचे कशास आपण?
तू माझा अन् सखे तुझा मी होऊ श्रावण
या आशेवर दु:ख आजचे विसरत आहे
हास्य लेउनी जगणे मोठी कसरत आहे
निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com
No comments:
Post a Comment