Sunday, August 2, 2015

मित्र असावा


गूज मनीचे सांगायाला मित्र असावा
मनास हलके करावयाला मित्र असावा

लाख येवू दे दु:ख, संकटे भय ना त्यांचे
धुंद होउनी सदैव असते जगावयाचे
वादळातही साथ द्यायला मित्र असावा
मनास हलके करावयाला मित्र असावा

परक्यांच्या नगरीत कुणी ना कुणा बोलती
व्यक्त व्हावया कुणीच नाही,  खांद्यावरती
डोके टेकुन रडावयाला मित्र असावा
मनास हलके करावयाला मित्र असावा


भणंग आहे, उनाड आहे, पुन्हा बेवडा !
बदनामीचा डाग कपाळी छळे केवढा !
योग्य दिशेने मला न्यायला मित्र असावा
मनास हलके करावयाला मित्र असावा

मायबाप दोघांचे असते स्थान वेगळे
दरी तरीही, धाकदपटशा, अपेक्षांमुळे
त्यांच्यामध्ये बघावयाला मित्र असावा
मनास हलके करावयाला मित्र असावा

मंदिरातल्या मूर्तींना मी कधी न पुजले
"ब्रह्म सत्त्य अन् मित्या जग" हे मना न पटले
देव नको, मदतीस यायला मित्र असावा
मनास हलके करावयाला मित्र असावा


निशिकांत देशपांडे. मो. क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

No comments:

Post a Comment