Monday, December 29, 2014

मोती मी सावडते


तुझा चेहरा बालपणीचा अनूनही आठवते
शाळेमधल्या रम्य क्षणांचे मोती मी सावडते

एकावरती नाव तुझे अन् दुसर्‍यावरती माझे
नावा पाण्यामधे सोडल्या, आठव अजून ताजे
तरल्या, गेल्या भिन्न दिशेने, खंत मना जाणवते
शाळेमधल्या रम्य क्षणांचे मोती मी सावडते

समज यायच्या अधीच वाटा वेगवेगळ्या झाल्या
आज वाटते वळून बघता, तारा होत्या जुळल्या
आठवणींची पाने चाळत, आत खोल ओघळते
शाळेमधल्या रम्य क्षणांचे मोती मी सावडते

रंगलास तू तुझ्या प्रपंची, मीही नांदत आहे
आज भेटता नजर तुझी का अशक्य सांगत आहे?
शंका येते तुला कदाचित अजून मी आवडते
शाळेमधल्या रम्य क्षणांचे मोती मी सावडते

बालपणीचे प्रेम मखमली मोर पिसासम असते
गंध वासनांचा नसतो पण मनात ते दरवळते
एक अनामिक ओढ जिवाला हळूवार जोजवते
शाळेमधल्या रम्य क्षणांचे मोती मी सावडते

सांगत असता प्रेम कहाणी गाज पाळते संयम
युगे लोटली पण उत्कटता अजून आहे कायम
चंद्र, सागरामधील अंतर प्रेमाला वाढवते
शाळेमधल्या रम्य क्षणांचे मोती मी सावडते


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com






Friday, December 19, 2014

मनास भरकटलेल्या


घट्ट असोनी पोत मनाचा
कडा कशा विरलेल्या ?
आठवणींचे काच नेहमी
मनास भरकटलेल्या

युगे लोटली एकलपणच्या
कुशीत निजतो आहे
व्यक्त व्हावया शब्द नेमके
मनी जुळवतो आहे
प्रतिक्षेतल्या वाटा सार्‍या
काट्यांनी भरलेल्या
आठवणींचे काच नेहमी
मनास भरकटलेल्या

स्वप्नांच्या समिधांना जाळत
अंधारास उजळतो
जरी गोठले जीवन सारे
कधी कधी ओघळतो
बंद पापण्यांमधे गवसती
शोक कथा लपलेल्या
आठवणींचे काच नेहमी
मनास भरकटलेल्या

हरेक वळणावरी जीवना !
विरक्तीच आढळली
जगावयाची आस मनीची
हळूहळू मरगळली
बाजी हरलो अस्तित्वाची
वाटाही चुकलेल्या
आठवणींचे काच नेहमी
मनास भरकटलेल्या

सदा होरपळ एकाकीची,
हिरवळ दिसली नाही
आयुष्याच्या सायंकाळी
सकाळ हसली नाही
कशी पालवी पुन्हा फुटावी ?
वृक्षाला वठलेल्या
आठवणींचे काच नेहमी
मनास भरकटलेल्या

आठवणींच्या सुतास धरुनी
स्वर्ग कसा गाठावा ?
जगतो आहे मेल्यागत अन्
त्रास किती सोसावा
नकोच फुंकर ह्रदयावरती
जुन्या बंद पडलेल्या
आठवणींचे काच नेहमी
मनास भरकटलेल्या


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Tuesday, December 9, 2014

शाई सरली


तरुण्याच्या उन्मादाने
इतिहासाची पाने भरली
उत्तरार्ध कण्हता लिहिताना
कशी नेमकी शाई सरली?

जसा जन्मलो, नाळ कापली
तरी घट्ट ती मजशी जुळली
गोधडीतही मिळे उबारा
नात्याची त्या तर्‍हा वेगळी
ओघळण्या आधीच आसवे
मायेने आईने पुसली
उत्तरार्ध कण्हता लिहिताना
कशी नेमकी शाई सरली?

जीवनातले सुवर्णयुग मी
म्हणेन माझ्या बालपणाला
गतआयुष्यी हरवुन जातो
आठव येता क्षणाक्षणाला
असे न होते आठवणींनी
मनोवेदना नाही हसली
उत्तरार्ध कण्हता लिहिताना
कशी नेमकी शाई सरली?

तारुण्याचा गंध लुटाया
संसाराची बाग फुलवली
कुंचल्याविना रंग उधळले
चहूदिशेने, प्रीत रंगली
स्वर्गसुखाची अनेक स्वप्ने
इथेच पडली अन् अनुभवली
उत्तरार्ध कण्हता लिहिताना
कशी नेमकी शाई सरली?

कमान चढती, टोकावरती
वरच्या सारे नांदत होतो
कैफ केवढा! झोका नसुनी
मस्तीने हिंदोळत होतो
सुरू जाहली उतरण पण ती
वेळेवर ना कुणास दिसली
उत्तरार्ध कण्हता लिहिताना
कशी नेमकी शाई सरली?

पटकन गेल्या पुन्हा न आल्या
तरुणाई अन् बाल्यावस्था
आली, जाता जातच नाही
अशी कशी ही वृध्दावस्था?
मावळतीची तिव्र वेदना
सरणावरही पुरून उरली
उत्तरार्ध कण्हता लिहिताना
कशी नेमकी शाई सरली?


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail---nishides1944@yahoo.com

Saturday, December 6, 2014

अजून ठरले नाही


तिलांजली आठवांस देणे
जमता जमले नाही
जगायचे की मरायचे हे
अजून ठरले नाही

आम्रतरूच्या तळी एकदा
हात पकडला होता
तो पहिला अन् शेवटचा क्षण
मनी कोरला होता
मोहरलेल्या रोमांचांचे
चीज जाहले नाही
जगायचे की मरायचे हे
अजून ठरले नाही

शमेविना का उत्तररात्री
मैफिल रंगत असते?
एकच विरही सूर छेडता
दु:ख मनी पाझरते
ओलेपण त्या जखमांमधले
अजून सुकले नाही
जगायचे की मरायचे हे
अजून ठरले नाही

तुझ्यामुळे जाहली जीवनी
पखरण अंधाराची
सुप्त आस का तरी तेवते
अशक्य होकाराची
तहानलेला, तरी ओंजळी
मृगजळ भरले नाही
जगायचे की मरायचे हे
अजून ठरले नाही

काजळलेल्या सायंकाळी
सकाळ का आठवते?
रंग केशरी अता न उरले
मनी खूप कालवते
कशी सावली निघून गेली ?
कोडे सुटले नाही
जगायचे की मरायचे हे
अजून ठरले नाही

शब्दांमधुनी व्यक्त व्हावया
कविता गझला लिहितो
अलगद माझे भाव गुंफता
आशय खुलून उठतो
जिला कळावे गूज मनीचे
तिलाच कळले नाही
जगायचे की मरायचे हे
अजून ठरले नाही


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com