Wednesday, September 24, 2014

दखल घेतली कुणीच नाही


दखल घेतली कुणीच नाही
कोण कशाला जमले होते?
जीर्ण वाळल्या पाचोळ्याचे
का संमेलन भरले होते ?

उदघाटनपर भाषणातुनी
उदासवाणा सूर गवसला
चर्चा, प्रश्नोत्तर सत्रांचा
इथेच होता माग लागला
उत्तर नसलेल्या प्रश्नांचे
वांझोटेपण दिसले होते
जीर्ण वाळल्या पाचोळ्याचे
का संमेलन भरले होते ?

सुरकुतलेले कैक चेहरे
सार्‍यांची बस एक कहानी
उपेक्षिताचे जगणे भाळी
बंद हुंदके हीच बयानी
चंगळवादी त्सुनामीत का
उन्मळून ते पडले होते
जीर्ण वाळल्या पाचोळ्याचे
का संमेलन भरले होते ?

सुबत्तेतल्या पिलावळीच्या
मातपित्यांची फरपट होती
असून पैसा, संवादाविन
गुदमर, त्रेधा तिरपिट होती
घर मोठे पण छोटेसे मन
सात्त्य शेवटी पटले होते
जीर्ण वाळल्या पाचोळ्याचे
का संमेलन भरले होते ?

दिशा ठरवुनी पाचोळ्याला
हवे तसे का फिरता येते?
वारा नेतो त्याच दिशेने
मजबूरीने पाउल पडते
घरास अडचण वाटे ज्यांची
आश्रमवासी बनले होते
जीर्ण वाळल्या पाचोळ्याचे
का संमेलन भरले होते ?

दात आपुले, ओठ आपुले
उहापोह हा व्यर्थ कशाला?
घरची इज्जत वेशीवर का?
असा वेगळा सूर निघाला
लक्तरांस रेशिम धाग्यांनी
समजूतीच्या शिवले होते
जीर्ण वाळल्या पाचोळ्याचे
का संमेलन भरले होते ?


ठराव झाला पास शेवटी
दु:ख स्वतःचे स्वतः जपावे
हास्य मुखवटे धारण करुनी
कुरवाळाया दु:ख शिकावे
इच्छमरणाच्या चर्चेने
सत्र वादळी सरले होते
जीर्ण वाळल्या पाचोळ्याचे
का संमेलन भरले होते ?


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com



Saturday, September 20, 2014

नवीन कांही बघण्यासाठी


म्हणू नका माझ्या मित्रांनो
साठी बुध्दी झाली नाठी
महागडा मी प्रवास केला
नवीन कांही बघण्यासाठी

उत्सुकता तर शिगेस होती
यान उतरता मंगळावरी
नवीन धरती, नवे नजारे
मनास आली खूप तरतरी
कुमारिका ती धरती होती@@
जशी लाजरी गोडशी परी
परलोकीचे बघून राक्षस
धडधडली ती असावी उरी
टोळधाड ही कशास आली?
भंग शांतता करण्यासाठी
महागडा मी प्रवास केला
नवीन कांही बघण्यासाठी

बर्‍याच सेना तिथे पाहिल्या
जनतेच्या सेवा करणार्‍या
जनसेवेचे ढोंग करोनी
धांगडधिंगा माजवणार्‍या
जात, धर्म अन् आदर्शांचे
झेंडे घेउन वावरणार्‍या
अंदोलन हे निमित्त साधुन
नियमांनाही ठोकरणार्‍या
अडचण त्यांची, तिथे टोलबुथ
बसेस नव्हत्या फुटण्यासाठी
महागडा मी प्रवास केला
नवीन कांही बघण्यासाठी

जिकडे तिकडे पाट्या होत्या
सुजीतदादा, नि वरद पवार
किती प्लॉट्स त्यांचे होते ते!
थकलो वाचुन वारंवार
उत्तरेस तर बड्या घराचा
कुणी जावई दावेदार
डोंगर सारे एकाचे अन्
कैक लव्हासा आवतरणार
जमीन जुमला सारा त्यांचा
स्क्वेअरफुटने विकण्यासाठी
महागडा मी प्रवास केला
नवीन कांही बघण्यासाठी

तेथेही दुष्काळच दिसला
नेतृत्वाची चांदी होती
नेत्यांच्या तोंडाला पाणी
मदतनिधीची संधी होती
राजकारणी सोडुन सार्‍या
धंद्यामध्ये मंदी होती
सुजीतदादा खुदकन हसले
कारण तेथे नव्हती बंदी
दर्‍या कपारी खोल कोरड्या
लघुशंकेने भरण्यासाठी
महागडा मी प्रवास केला
नवीन कांही बघण्यासाठी


अद्भुत यात्रा करावयाची
मनोमनी मी खूप हुरळलो
मंगळ! मंगळ! प्रभात समयी
स्वप्नामध्ये म्हणे बरळलो
मला उठउनी पत्नी करते
सवाल "कोठे कसा हरवलो?"
धरतीवरती पाय टेकले
वास्तवात पटकन गुरफटलो
खडबडून मी उठलो, लोकल
सात तीसची धरण्यासाठी
महागडा मी प्रवास केला
नवीन कांही बघण्यासाठी

@@ virgin land




निशिकांत देशपांडे.मो. क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Friday, September 12, 2014

एकच पणती तेवत होती


धीर धरोनी वादळासवे
जिद्दीने ती झगडत होती
काळोखाच्या गर्तेमध्ये
एकच पणती तेवत होती

झगमग नाही, मंदमंदसा
प्रकाश देणे तिला आवडे
कष्टांचे, खस्ता खाण्याचे
तिला न होते कधी वावडे
तेल संपले, वात जळाली
स्वयंप्रकाशित भासत होती
काळोखाच्या गर्तेमध्ये
एकच पणती तेवत होती

खांद्यावरती ओझे घेणे
तिने पोसला छंद आगळा
गाभार्‍यातिल दिव्याप्रमाणे
मिणमिणता आनंद वेगळा
चंदन होउन झिजावयाची
तिची आपली पध्दत होती
काळोखाच्या गर्तेमध्ये
एकच पणती तेवत होती

ग्रिष्म असोनी सदा द्यायची
थंड सावली, हिरवळ हिरवळ
प्राजक्ताचे झाड जणू ती
सभोवताली दरवळ दरवळ
फुले वाहता ओंजळीत, ती
गंध जरासा ठेवत होती
काळोखाच्या गर्तेमध्ये
एकच पणती तेवत होती

हात फिरवता, स्पर्श मखमली
पडे चांदणे शीतळ शीतळ
रौद्ररूप जर कधी दावले
जणू काय ती होती कातळ
नर्मदेतल्या गोट्याला ती
कठोरतेने घडवत होती
काळोखाच्या गर्तेमध्ये
एकच पणती तेवत होती

गर्भगृहीची ज्योत अचानक
विझून जाता खिन्न वाटले
घरात माझ्या, देवाच्या पण
अंधाराचे राज्य जाहले
ठेच लागली मला कधी तर
स्वर्गी आई विव्हळत होती
काळोखाच्या गर्तेमध्ये
एकच पणती तेवत होती


निशिकांत देशपांडे. मो.के.९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com


Sunday, September 7, 2014

गीत लिहूया एकदुज्यावर


ठराव आता पास करूया
कधी तुझ्यावर तर माझ्यावर
शब्द शोधुनी गोजिरवाणे
गीत लिहूया एकदुज्यावर

आठवणींच्या मळ्यात दोघे
जरा फिरूया हात धरोनी
कळ्या, सुगंधी फुले वेचण्या
पहाटेस ओंजळी भरोनी
जीवन गाणे लिहीन मी अन्
हिंदोळव तू सप्तसुरांवर
शब्द शोधुनी गोजिरवाणे
गीत लिहूया एकदुज्यावर

आले गेले प्रसंग बाका
दु:ख हजेरी लावत गेले
हात तुझा हाती असताना
मनास सारे भावत गेले
सुखावायचो घालुन फुंकर
ह्रदयावरच्या खोल चर्‍यांवर
शब्द शोधुनी गोजिरवाणे
गीत लिहूया एकदुज्यावर

व्यवहारिक दृष्टीने आपण
प्रपंच केला वजावटीचा
परस्पारातिल समर्पणाला
होता पैलू सजावटीचा
जीवन फुलले कधीच नव्हते
मान, मरातब, हार, तुर्‍यावर
शब्द शोधुनी गोजिरवाणे
गीत लिहूया एकदुज्यावर

आप्तेष्टांच्या गर्दीमधला
जो तो होता तुटक वागला
ध्यानी आले सत्त्य शेवटी
मीच तुला अन् तूच तू मला
जीवन केले किती स्वयंभू
विसंबल्याविन ग्रह-तार्‍यांवर
शब्द शोधुनी गोजिरवाणे
गीत लिहूया एकदुज्यावर

मैफिलीतले रंग उतरता
एक विरहिणी लिहावयाची
आर्त स्वरांची चाल लाउनी
तन्मयतेने गुणगुणायची
सुरेल शेवट हवा जीवना !
पुढील आहे भिस्त तुझ्यावर
शब्द शोधुनी गोजिरवाणे
गीत लिहूया एकदुज्यावर


निशिकांत देशपांडे.मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com