Friday, August 29, 2014

तसेच जपले होते


भळभळणार्‍या आठवणींना
तुझ्या रुजवले होते
तळहातीचा फोड जपावा
तसेच जपले होते

ना बुजणार्‍या जखमांचे का
दाह अचानक सरले?
एक घाव तू दिल्या क्षणाला
दु:ख जुनेरे विरले
वेदनेतही जगण्यासाठी
हास्य फुलवले होते
तळहातीचा फोड जपावा
तसेच जपले होते

क्ष किरणाने घे तू फोटो
माझ्या ह्रदय, मनाचा
तुला न दुसरे दिसेल कोणी
तुझाच वावर साचा
बंद मनाचे दार फक्त मी
तुला उघडले होते
तळहातीचा फोड जपावा
तसेच जपले होते

वसंत गेला दूर जाउदे
मला न कौतुक त्याचे
ग्रिष्म असोनी सदाफुलीने
असते फुलावयाचे
विणून स्वप्ने मनाप्रमाणे
विश्व सजवले होते
तळहातीचा फोड जपावा
तसेच जपले होते

मावळतीला आज एकटा
तरी उदासी नसते
वस्त्र जुने पण आठवणींची
किनार शोभुन दिसते
उगवतीस, मध्यान्ही अगणित
रंग उधळले होते
तळहातीचा फोड जपावा
तसेच जपले होते

प्रवास माझ्या कवितांचाही
तुझ्या भोवती फिरला
परीघ तुझिया अस्तित्वाचा
मला पुरोनी उरला
कुंचल्यातुनी इंद्रधनूचे
रंग उतरले होते
तळहातीचा फोड जपावा
तसेच जपले होते


निशिकांत देशपांडे. मो. क्र.९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Thursday, August 21, 2014

निरव शांतता कुठे मिळेना


यत्न करोनी गावाकडची नाळ तुटेना
शहरीकरणी निरव शांतता कुठे मिळेना

भल्या पहाटे उठण्यासाठी गजर लावतो
सेकंदाच्या काट्यावरती उठतो, बसतो
जात्यावरची ओवी कानी कधी पडेना
शहरीकरणी निरव शांतता कुठे मिळेना

नकोच शेती, कनिष्ठ असुनी बरी नोकरी
ध्येय दरिद्री, जगावयाला पुरे भाकरी
गावी राहुन शेत कसाया कुणी धजेना
शहरीकरणी निरव शांतता कुठे मिळेना

रानपाखरे, ओढे खळखळ, हिरवी धरती
भागवायला भूक बघावे टीव्हीवरती
कर्टुन शोच्या शिवाय दुसरे मुला रुचेना
शहरीकरणी निरव शांतता कुठे मिळेना

धृव नि त्याच्या अढळपदाची गोष्ट हरवली
मिकिमाउस अन् विनी मनावर कुणी रुजवली
ग्रहण लागले संस्कृतीस का असे कळेना
शहरीकरणी निरव शांतता कुठे मिळेना

असेच लोंढे येत राहिले खेड्यामधुनी
ओस गाव अन् शहरे जातिल तुडुंब भरुनी
मुंग्यांच्या गर्दीत आपुले कुणी दिसेना
शहरीकरणी निरव शांतता कुठे मिळेना

बदलाच्या वादळी बदलणे जरी जरूरी
दु:ख वाटते जुन्या पिढीला, ही मजबूरी
सुंभ आमुचा जरी जळाला, पीळ जळेना
शहरीकरणी निरव शांतता कुठे मिळेना


निशिकांत देशपांडे. मो.क्र ९८९०७ ९९०२३
EMail--- nishides1944@yahoo.com

Tuesday, August 12, 2014

एवढे प्रेम का सुकले?


भंगल्या माझ्या मनाची
पांगली चौफेर शकले
रुजायाच्या अधी माझे
एवढे  प्रेम का सुकले?

सुगंधाची जिथे ये जा
तिथे गेलो कधी आपण?
जरी फुलपाखरासम मी
फुलांचे ना कधी दर्शन
कुंडल्या आपुल्या जुळल्या
तरी सौख्यास का मुकले?
रुजायाच्या अधी माझे
एवढे  प्रेम का सुकले?

तुला जर जायचे होते
तसे सांगून जावे ना!
किती प्रस्ताव केले मी
तुला तडजोड भावेना
प्रश्न हा गौण तर होता
कोण कोणापुढे झुकले
रुजायाच्या अधी माझे
एवढे प्रेम का  सुकले?

मनाच्या हिरवळीचा का
असा इतिहास पुसलेला?
नि पाचोळा विरानीचा
मना व्यापून उरलेला
दु:ख नगदीत घेण्याला
सुखांना स्वस्त मी विकले
रुजायाच्या अधी माझे
एवढे प्रेम का  सुकले?

वाकता कबरीवरी तो
सोबती ती बया असते
कोण म्हणते कि पुरल्यावर
जाळणेही शक्य नसते
वेदनांचे दाह विरही
भार मी पेलुनी थकले
रुजायाच्या अधी माझे
एवढे प्रेम का  सुकले?

कशी ही लक्तरे झाली?
जिवाची, जीवनाचीही
नसे कांही बघायाला
जरा मागे न पुढतीही
अधांतर वर्तमानी मी
जगाया प्रेतवत शिकले
रुजायाच्या अधी माझे
एवढे प्रेम का  सुकले?


निशिकांत देशपांडे. मो. क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com


Sunday, August 3, 2014

आयुष्याची सरते मरगळ


खाचा खळग्यांच्या वाटेवर
कशी अचानक हिरवळ हिरवळ?
तुझ्या चाहुलीनेही माझ्या
आयुष्याची सरते मरगळ

वसंत, श्रावण, कळ्या, फुलांचे
दिवस केवढे धुंद फुंद ते !
असून संगत चार दिसाची
उधळलेस तू किती गंध ते
सर्व पाकळ्यांच्या गालावर
अनुभवली हास्याची खळखळ
तुझ्या चाहुलीनेही माझ्या
आयुष्याची सरते मरगळ

असा गुंततो भूतकाळच्या
जाळ्यामध्ये, तगमग भारी
वर्तमान रुचतो न मनाला
जरी भोवती झगमग सारी
आठवणीचा एक कवडसा
निशिगंधाचा पसरे दरवळ
तुझ्या चाहुलीनेही माझ्या
आयुष्याची सरते मरगळ

तू नसल्याने जीवनात या
किती अजबसे घडू लागले!
रोजच सखये स्वप्नांनाही
स्वप्न तुझे का पडू लागले?
दिलास तू अंधार, शुक्रिया
लपवायाला माझी घळघळ
तुझ्या चाहुलीनेही माझ्या
आयुष्याची सरते मरगळ

वळून मागे बघावयाचे
प्राक्तनात लिहिले असताना
भविष्यातली नको काळजी
जिवास, गतकाळी जगताना
विरहाच्या जखमांना आता
वहावयाचे आहे भळभळ
तुझ्या चाहुलीनेही माझ्या
आयुष्याची सरते मरगळ

भीक मला दे एकच देवा
कधी तिच्यावर वेळ न येवो
पसरायाची पदर मागण्या
स्वयंभू तिचे जीवन होवो
नवी पालवी तिला मिळावी
म्हणून मजला हवी पानगळ
तुझ्या चाहुलीनेही माझ्या
आयुष्याची सरते मरगळ


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com