आज ज्यांचे वय ४०/४५ वर्षांच्या पुढे असेल त्यंना खालील कविता नाक्कीच माहीत असेल.
चाक फिरवतो गरागरा
मडके करतो भराभरा
ओळखा पाहू मी कोण?
याचे उत्तर "कुंभार" आहे. या कवितेत त्यावेळी जीवनाशी निगडीत सर्व कलाकार (आर्टीजन्स) होते; जसे की लोहार, सुतार वगैरे वगैरे. आता या सर्व गोष्टी काळाच्या पडद्याआड लुप्त झाल्या आहेत. हे जुने संदर्भ हल्लीच्या पिढीतील मुलांना माहीत नाहीत. उदाहरणार्थ, जुन्या काळी लहान मुलांना भोवरा गवातील सुतार बनवून देई. आता प्लॅस्टीकचे भोवरे विकत मिळतात. मुलांना कसे माहीत असणार भोवरे सुतार बनवत होते.
याच कवितेपासून प्रेरणा घेऊन अशीच कोडी असलेली एक रचना तयार आहे. या रचनेत सध्याचे संदर्भ असल्यामुळे कविता थोडी खोचक वाटेल कदाचित. कोणालाही दुखवायचा उद्देश नाही. बघा कशी वाटते ती.
१)
उच्च पदावर असून, साधा
कडक जॅकेट, निळसर पगडी
मूग गिळोनी निमूट बघतो
भ्राष्टाचारी, अनेक लफडी
अर्थतज्ञ मी असून सुध्दा
देश लागलाय देशोधडी
परवानगीविना बोलू कसे?
म्हणून पाळत असतो मौन
ओळखा पाहू मी कोण?
२)
नसताना पद, सत्ता माझी
राजघराण्याचा मी वारस
शहजादा म्हणणार्यासाठी
माझ्या मनात आहे आकस
मंत्री, संत्री खिशात माझ्या
चमचे, चमचे अन् चमचे बस!
सारे माझी ओढतात री SSS
वर्तुळास म्हणता चौकोन
ओळखा पाहू मी कोण?
३)
महाग करतो सालोसाली
कांदे आणि खूप कमवतो
बिल्डर लॉबी, साखार धंदे
शिक्षणक्षेत्री चित्त रमवतो
पंतप्रधानाच्या गादीचे
रात्रंदिन मी स्वप्न पाहतो
माझी कन्या, माझा पुतण्या
बाकी सारे दिसते गौण
ओळखा पाहू मी कोण?
४)
मुलगा माझा पिता म्हणेना
संबोधत असतो "नेताजी"
राज्यामध्ये असून काशी
मजला प्यारे मुल्ला, काझी
दिल्लीश्वरचे अपेंंडिक्स मी
सदैव त्यांची करतो "हां जी!"
मते मिळवण्या करेन अनुनय
दहशतवादी माझा झोन
ओळखा पाहू मी कोण?
5)
रुसतो, फुगतो, त्रागा करतो
वय झाले हे विसरुन जातो
अहंभाव उत्तुंग एवढा!
पक्ष कसपटासमान दिसतो
चुचकाराया नेते येती
कमळालाही तुच्छ लेखतो
सुतासारखा सरळ वागतो
नागपूरहून येता फोन
ओळखा पाहू मी कोण?
निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com