खुशाल चेंडू जगात कोणी
कोणाचेही मानत नाही
चंगळवादी जगी कुणीही
कोणासाठी थांबत नाही
गतकालाचे सोनेरी क्षण
आठवतो अन् गुदमरतो मी
आयुष्याच्या सायंकाळी
इतिहासातच गुरफटतो मी
वर्तमान वांझोटा आहे
विशेष हाती लागत नाही
चंगळवादी जगी कुणीही
कोणासाठी थांबत नाही
टोच नसावी तरी टोचते
काळजास का शल्य एवढे?
कुणी न उरले, उडून गेले
जीवनात जोडले जेवढे
एक कवडसा उजेडही पण
देव अताशा धाडत नाही
चंगळवादी जगी कुणीही
कोणासाठी थांबत नाही
खचून गेलो कष्ट करोनी
रोज कमवण्या दोन भाकरी
धीर द्यावया कुणी म्हणाले
जीवन आहे एक लॉटरी
वाट पाहिली युगेयुगे मी
कधी निघाली सोडत नाही
चंगळवादी जगी कुणीही
कोणासाठी थांबत नाही
स्वैराचारी नव्या पिढीला
उपदेशाचे किती वावडे !
पाश्चांत्त्यांच्या अनुकरणाचे
स्तोम माजले आज केवढे !
"मूग गिळोनी गप्प बसावे"
परंपरा मी तोडत नाही
चंगळवादी जगी कुणीही
कोणासाठी थांबत नाही
आज ठरवले ललकारावे
जीवनास निधड्या छातीने
अंधाराला कशास भ्यावे
मंद तेवणार्या ज्योतीने?
भीक मागण्या देवापुढती
हात अता मी जोडत नाही
चंगळवादी जगी कुणीही
कोणासाठी थांबत नाही
निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३
विषय: काव्यलेखन
No comments:
Post a Comment