Friday, July 30, 2021

आनंदण्याची कारणे---( वीक एंड लिखाण )

 मी बँकेत कार्यरत असताना ट्रेनिंग सेंटरमधे गेस्ट फॅकल्टी म्हणून जात असे. एकदा मला असेच एका ट्रेनिंग बॅचला पाचारण करण्यात आले. विषय होता निवृत्तीनंतरचे जीवन कसे व्यतीत कराल. येत्या एक वर्षात निवृत्त होणारे अ‍ॅसिस्टंट जनरल मॅनेजर्स ट्रेनिंगसाठी बोलावले होते. अजून एक विशेष म्हणजे घरात नवरा किंवा बायको कसे आनंदी जीवन जगायचे हे ठरवू शकत नाही. दोघांनी मिळून हे महाकठीण काम करावे लागते. हे ध्यानात घेऊन बँकेने नोकरी करणारे ऑफिसर्स आणि त्यांची पत्नी किंवा पती यांना ही बोलावले होते. अशी एकूण २५ जोडपी होती. मला सकाळी नऊ ते दीड पर्यंतचा वेळ देण्यात आला होता. या सर्वांशी संवाद साधताना मला खूप मजेशीर अनुभव आले जे मी येथे आपणांशी शेअर करणार आहे. या ट्रेनिंगमधे जास्त लोक आंध्र प्रदेशातील होते. मी जोडप्यांना अनेक प्रश्न विचारले त्यातील कांही असे--

१)तुम्ही दोघे मिळून घरी( दिलखुलास गप्पा मारता का?--प्रतिसाद्; नुसतेच एकमेकाकडे ओशाळून बघणे

२) तुम्ही कधी एकमेकांना विनोद सांगून मनमोकळे हसता का?--प्रतिसाद-- जो वर आहे तोच.

२) तुम्ही कधी नदी/सागर किनार्‍यावर किंवा तळ्याकाठी निवांत एकमेकांच्या हातात हात घालून वेळ घालवलाय का?--प्रतिसाद पुन्हा तोच. एकमेकाकडे बघणे. 

मग लोकांना थोडे बोलते करण्यासाठी मी जरा विषय बदलला. सर्वांना एक प्रश्न केला की तुम्हाला जीवनात खुशी मिळावी यासाठी कुटुंबात तुम्हाला काय हवे आहे. या प्रश्नाला मात्र भरभरून प्रतिसाद मिळाला. जसे जसे प्रतिसाद मिळत गेले, मी ब्लॅकबोर्डावर लिहीत गेलो. आलेली कांही उत्तरे नमुन्यादाखल खाली देत आहे.

१) माझ्या सुनेने आमच्या दोघांशीही चांगले वागावे.

२) माझी नातवंडे चांगल्या मार्कांनी पास व्हावेत.

३) आम्ही मुलांसाठी ज्या खस्ता खाल्ल्या त्यांचे मुलांनी ध्यान ठेवावे.

४) आमची मुलांनी सर्व परीने काळजी घ्यावी जशी आम्ही आमच्या आई बाबांची घेतली.

५) बायकोने नवर्‍याशी किंवा नवर्‍याने बायकोशी हिडिस फिडिस करू नेये. आदराने वागावे.

असे एकूण पन्नास प्रकार बोर्डावर लिहिले गेले.

समारोप करताना मी सर्वांना सहनुभूती दाखवली. या गोष्टी सर्वच कुटुंबात घडतात. आणि माझा मुख्य प्रतिप्रश्न केला. तुम्हाला आनंद मिळण्यासाठी मुलांनी, सुनेने, नातवंडांनी, शेजार्‍यांनी काय काय करायला पाहिजे हे सविस्तर सांगितलेत आपण. मला एक सांगा की तुम्हा लोकांचा आनंद एवढा परावलंबी आहे का? तुम्ही कोणीही सांगितले नाही की तुमच्या आनंदासाठी तुम्ही स्वतः काय करणार ते! तुम्ही गणपती बाप्पा नाहीत की सर्व लोकांनी तुम्हाला आनंदाचा नैवेद्य दाखवून  नमस्कार करावा. आणि वर्गात पिनड्रॉप शांतता पसरली. मग त्यांना कौन्सेलिंग केले आणि वर्ग संपला. लंच घेतांना बरेच लोक मोकळेपणाने बोलले. ते काय काय म्हणाले हा लिखाणाचा स्वतंत्र विषय होईल.

माझ्या मनात नेहमी येते की आनंद लुटणे लोकांना का एवढे अवघड जाते? आनंद चोहिकडे विखुरलेला आहे. आपण कसा लुटायचा हे आपणच ठरवायचे असते.  अर्थात मी सात्विक आनंदाबद्दल हे विधान केले. दुसर्‍यांना त्रास देवून मिळवलेला आनंद हा असुरी असतो. तुमची प्रवृत्ती कशी आहे यावर आनंद अवलंबून असतो. मी एके ठिकाणी वाचलय की ज्यांचा स्वभाव मोकळा आणि प्रवाही असतो ते लोकच आनंद लुटू शकतात. साधी विनोदाचीच बाब घ्या. ज्यांचा ओघवता स्वभाव आहे तेच विनोद प्रभावीपणे सांगू शकतात  आणि दुसर्‍यांनी सांगितलेल्या विनोदावर खळखळून हसूही शकतात.

असा हा पसरलेला आनंद आपणच लुटायचा असतो. कुणी देण्याची वाट बघायची नसते. आनंदाची जगात कोठेही बाजारपेठ नाही. एकदा आनंद लुटायचे तंत्र आले की आनंदाचे डोही आनंद तरंग ही अवस्था सहज प्राप्त होते. या आनंदाविषयी लिखाणाचा शेवट मी एका विनोदी गझलेने करतोय. अशा विनोदी गझलेला हझल म्हणतात, बघा थोडा आनंद मिळतो का ते वाचून!


कारणे (हझल)


सांग माहेरी सदा तू राहण्याची कारणे

तीच माझ्या वेदना आनंदण्याची कारणे


तीच शेजारीण आहे बोलतो मी, लाघवी

ऐकता चोरून मिळती भांडण्याची कारणे


मेहुणी माझी तुझीही लागते भगिनी तरी

सांग तू दुस्वास मग आरंभण्याची कारणे


वाढता तव घेर बघुनी हर्ष मम्मीला तुझ्या

माय पुसते आज माझ्या वाळण्याची कारणे


मी तरी होहोच म्हणतो खानदानी रीत ही

तुज तरी मिळती कुठूनी वसकण्याची कारणे


धूर्त शेजा-यास कळले आज ती नाही घरी

जाणती ते शांततेच्या नांदण्याची कारणे


ती तुझ्या प्रेमात आहे कैद तुज केले तरी

दूर कर "निशिकांत" मुसक्या बांधण्याची कारणे



शेवटी मी एक चित्र देत आहे. हे बघून माझी खात्री झाली की कारण नसताना सुध्दा आनंद लुटता येतो. चित्रातील मुलांचे माय बाप बांधकामावर काम करत आहेत आणि मुले बघा कसा आनंद लुटत आहेत ते!  याला जीवन ऐसे नाव! हे चित्र फेसबुकवरील वाचकांना दिसेल. व्हाट्सॅपवर अवघड वाटते हे चित्र पोस्ट करणे. पण प्रयत्न प्रयत्न करेन. असो.



निशिकांत देशपांडे, पुणे.

मो.नं. ९८९०७ ९९०२३


  

 

Friday, July 23, 2021

आनंदाने पुढील अंतर--( वीक एंड लिखाण )

१) अहो तुम्हाला एवढं कसं-----२) तरीही मी म्हणत होते---३) ) आमचे हे न---४) गप्प बसा मी बोलते--- ५) अहो ऐकलत का? ही सारे वाक्ये पूर्ण करून बघा परिचयाची आहेत का ते. सर्व पुरुषांच्या नक्कीच परिचयाची आणि दैनंदिन जीवनात ऐकलेली पण असतील. या सर्व वाक्यातच संसाराची मजा आहे. घरोघर मातीच्या चूली आजकाल राहिल्या नाहीत पण ही वाक्ये घरोघर यावत्चंद्रदिवाकरो बोलली अन् ऐकली जातील. माझं आजचं लिखाण पत्नीबद्दल आहे आणि तेही माझ्याच; इतर कुणाच्या नाही.

गेल्या आठवड्यात माझ्या पत्नीचा वाढदिवस झाला. त्या निमित्ताने हा प्रपंच! आम्हा दोघांचे लग्न हा आयुष्यातील मैलाचा दगड ठरला सर्वार्थाने. एक वेगळी दिशा, एक अनुपम अनुभव हे सारे मी अनुभवले. तिने काय काय केले याचा गोषवारा येथे देत नाही कारण ते सारेच अनुभवतात. ज्यामुळे ती मला ए कट अबोव्ह वाटते त्या मुद्यांचा जरा परामर्श घेणार आहे

 कांही महत्वांच्या बाबी अशा.

मी बँकेत पुढील बढत्या मिळवण्यासाठी, जे माझे ध्येय होते, खूप कामात आणि आभ्यासात व्यस्त असायचा. त्या वेळी ती सर्व घर सांभाळायची. मुलाचे आणि मुलीचे संगोपन तिने एकटीने केले. मी फक्त पगाराचे पैसे आणण्याशिवाय कांहीही केले नाही. मुलांचा आभ्यास घेणे, त्यांना प्रोत्साहीत करणे, चरित्र बनवणे हे सारे तिचेच काम होते. म्हणतात ना स्त्रीही घरातील सर्वव्यापी व्यक्तिमत्व असते. माझ्या घरात आजही असा एकही कोपरा किंवा क्षेत्र नाही जिथे तिचा वावर नसेल. 

तिचे शिक्षण हैद्राबाद आणि औरंगाबाद येथे झाले होते. मी मराठवाड्यातील अंबाजोगाई येथील रहिवासी आणि शिक्षण पण तिथेच. या शहरी ग्रामीण पार्श्वभूमीचा पण अडसर आला नाही. ती अ‍ॅडजस्ट करत गेली. माझे कुटुंब तसे मागासलेले. घरात गाणे असे नव्हतेच. असलेच तर देवाची भजने, आरत्या, पंचमीला भुलईची गाणी, मंगलआष्टके येथेपर्यंतच मर्यादित संगीत होते. पण माझ्या पत्नीमुळे आमच्या घरात संगीत आले. तिला संगिताचे अंग आणि छंद भरपूर आहे. ती आताही पुण्यात रागदारी संगीत आणि सुगम संगिताचे वर्ग घेते. आमच्या घरी सतत संगिताचा अभिषेक चालू असतो. फिल्मी, मराठी, हिंदी आणि शास्त्रीय. यामुळे माझ्यासारखा औरंगजेबही तानसेन नाही पण कानसेन नक्कीच झालाय. मला आठवतय की १९७१ मधे मी फिलिप्स कंपनीच रेकॉर्ड प्लेयर घेतला होता. दरमहा एकदोन रेकॉर्ड्स आम्ही घेत असू. आम्ही लता मंगेशकर यांनी रॉयल अल्बर्ट हॉल मधे लंडन येथे लाईव्ह कार्यक्रमात गायलेल्या गाण्याची आणि चोरी चोरी सिनेमाच्या गाण्याच्या रेकॉर्ड्स आणल्या. रागदारीच्या पण एक दोन रेकॉर्ड्स होत्या ज्या आम्ही सतत लावत होतो. माझी पत्नी जयश्री इतकी खुश होती की एकदा ती मला म्हणाली की इतकी  छान गाणी ऐकायला मिळाली तर मी न जेवताही राहीन. असे तिला संगिताचे वेड आहे. या मुळेच की काय संसारात आमचे लय, ताल, सूर सारेच झकास जुळून आले आणि लग्नानंतरचा पन्नासपेक्षा जास्त वर्षाचा काळ भुर्रकन उडुन गेला. जीवनात आनंदी आनंद आहे. आनंदाचे डोही आनंद तरंग ही अवस्था आम्ही दोघेही अनुभवत आहोत.

या वाढदिवसाचे औचित्य साधून तिच्यासाठी रचलेली एक कविता पेश करतोय.


  आनंदाने पुढील अंतर


काय गवसले, काय हरवले?

करूत चर्चा निवांत नंतर

हात धरोनी चालत राहू

आनंदाने पुढील अंतर


तिच्या रुपाने घरात आले

राग, ताल अन् कैक तराने

नूर घराचा बदलत गेला

गळ्यातल्या परिपक्व स्वराने

मैफिल आयुष्याची सजली

अमूल्य झाले हे स्थित्यंतर

हात धरोनी चालत राहू

आनंदाने पुढील अंतर


क्षितिजाच्याही पल्याड आम्ही

दोघे सोबत नांदत होतो

जरी हिमालय जमला नाही

पर्वतीवरी सुखात होतो

काबिज केलेल्या स्वप्नांचा

अश्वमेध चालतो निरंतर

हात धरोनी चालत राहू

आनंदाने पुढील अंतर


गरज वाटली कधीच नाही

हास्य लेउनी मिरवायाची

मनी नांदले, तेच गोंदले

आवड नव्हती प्रदर्शनाची

हवे आमुच्या जगास आम्ही

क्षणोक्षणी आले प्रत्त्यंतर

हात धरोनी चालत राहू

आनंदाने पुढील अंतर


उधारीतल्या सुखास आम्ही

नगदीच्या दु:खात तोलले

संतुष्टीच्या सुपीक रानी

आनंदाचे बीज पेरले

प्रश्न न केला देवांनाही

परावलंबी नव्हते उत्तर

हात धरोनी चालत राहू

आनंदाने पुढील अंतर


वटपूजा ना करताही पण

दृढप्रेमाचा प्रत्त्यय येतो

झूळझुळणार्‍या प्रेम प्रवाही

रुढी प्रथांचा व्यत्त्यय येतो

जगावयाचे खूप अजूनी

म्हणूत झाले हे मध्यंतर

हात धरोनी चालत राहू

आनंदाने पुढील अंतर



निशिकांत देशपांडे, पुणे. 

मो.क्र. ९८९०७ ९९०२३

 

 

Saturday, July 3, 2021

मनाप्रमाणे घडेल का?

 हवे हवेसे मनास, त्याची 

वाट पहाणे सरेल का?

हे भाग्या! सांगून टाक ना!

मनाप्रमाणे घडेल का?


खाचा खळगे अवघड वाटा

अंधाराचे राज्य इथे

नैराश्यच का भेटत असते?

धावत हातो जिथे, तिथे

जास्त मागणे माझे नाही

एक कवडसा मिळेल का?

हे भाग्या! सांगून टाक ना!

मनाप्रमाणे घडेल का?


तुझ्या भोवती वसंत असतो

तुला कळावा ग्रिष्म कसा?

होरपळीतच जगावयाचा

जणू घेतला मीच वसा

हयात असता तुला विसरणे

या वेड्याला जमेल का?

हे भाग्या! सांगून टाक ना!

मनाप्रमाणे घडेल का?


आठवणींनी किती लगडली! 

स्वप्ने सारी तुझ्यामुळे

खंत एवढी एकच आहे

स्वप्नांशी ना सत्त्य जुळे

मृगजळ तू झालीस अशी का?

उत्तर याचे कळेल का?

हे भाग्या! सांगून टाक ना!

मनाप्रमाणे घडेल का?


लाख तारका असोत गगनी

कौतुक त्यांचे मला नसे

कशास जत्रा बघावयाची

जणू लागले वेड पिसे

मला हवी जी तीच चांदणी

कधी नेमकी दिसेल का?

हे भाग्या! सांगून टाक ना!

मनाप्रमाणे घडेल का?


क्षितिजाच्याही पुढती जाऊ

बसवायाला विश्व नवे

दोघे आपण फक्त असू या

कशास तिसरे कुणी हवे?

तार मनाची तुझ्या नि माझ्या

नकोच शंका जुडेल का?

हे भाग्या! सांगून टाक ना!

मनाप्रमाणे घडेल का?



निशिकांत देशपांडे, पुणे.

मो. क्र. ९८९०७ ९९०२३