Monday, May 31, 2021

कधी शक्य का होते?

 

जे झाले ते विसरुन जाणे

कधी शक्य का होते?

जळमटासही आठवणींच्या

कुठे काढता येते?


नाव कागदी सोडत होतो

पाउस पडल्यावरती

तिचे हासणे, टाळ्या पिटणे

आनंदाला भरती

बालपणाचा अंक संपला

पुन्हा न जगता येते

जळमटासही आठवणींच्या

कुठे काढता येते?


तारुण्याच्या उंबरठ्यावर

उदंड होता दरवळ

जिकडे तिकडे सभोवताली

ओला श्रावण, हिरवळ

धुंद फुंद जे जगलो ते ते

अजून स्वप्नी दिसते

जळमटासही आठवणींच्या

कुठे काढता येते?


अता लक्तरे दिसू लागली

भावी आयुष्याची

सांजवेळ जगण्यास पाहिजे

कृपाच परमेशाची

जे जगलो ते मस्त! शेवटी

म्हणत जायचे असते

जळमटासही आठवणींच्या

कुठे काढता येते?


आलेल्यांची गेल्यावरती

आठव सोबत करती

हाच दुवा तर सांधायाला

असतो अपुल्या हाती

गोड गोड तर कधी कडूही

जे झाले ते स्मरते

जळमटासही आठवणींच्या

कुठे काढता येते?



निशिकांत देशपांडे, पुणे.

मो. क्र. ९८९०७ ९९०२३

Wednesday, May 12, 2021

विरानीत जावे

 विरानीत जावे


नको तो अबोला, विरानीत जावे
 स्वतःशीच बोलावयाला शिकावे

न देता तिला साद, प्रतिसाद येई
सदा उत्तराचीच ती वाट पाही
अबोलीसही बोलताना बघावे
स्वतःशीच बोलावयाला शिकावे

अचानक वसंतास घेऊन आली
मनी ग्रिष्म! हिरवळ कशी काय झाली?
मनाच्या कपारीत माझ्या रहावे
स्वतःशीच बोलावयाला शिकावे

दुराव्यातही गोडवा अनुभवावा
जसे ऊन दे सावलीचा विसावा
कुठे वाट चुकलो? स्वतःला पुसावे
स्वतःशीच बोलावयाला शिकावे

नको दु:ख आता कुणी सोडल्याचे
जरा तू मना शीक विसरावयाचे
चरे काळजाचे तुझ्या तू भरावे
स्वतःशीच बोलावयाला शिकावे


निशिकांत देशपांडे, पुणे.
मो. क्र. ९८९०७ ९९०२३

अंधार-- ( वीक एंड लिखाण--०२. ०५. २०२१)

 अंधार-- ( वीक एंड लिखाण--०२. ०५. २०२१)

कांही दिवसांपूर्वी करोनाने बाधित झाल्यामुळे यासदराखाली   लिखाण होऊ शकले नाही.  आज मागे वळून विचार करताना माझे मलाच खूप हसू येते.    
सखीला प्रकाशाची कमतरता पडू नये म्हणून मी तिला म्हणतो की मी अंधाराला बांध बांधला आहे किंवा अंधाराशी करेन दोस्ती किंवा सूर्य कटोरी घेउन हाती, अंधाराची भीक मागतो असे अंधाराचे उदात्तिकरण करत स्वत:ला एक अवलिया/कलंदर कवी माणनारा मी, जेंव्हा बाका प्रसंग येऊन उभा राहिला तेंव्हा माझी छबी मला वेगळीच दिसली. मी या नवीन दर्शनाने भांबाऊनच गेलो. जिकडे तिकडे दवाखान्यात दाखल केल्यापासून किर्र अंधारच दिसत होता. नैराश्याने आशावादावर मात केलेली बघत होतो. हा काळ मी कधीही विसरणार नाही. निराशेचे झुंड घोळक्याने येत होते आणि आशेची पणती या वादळात विझेल याची मनात सदैव होती.
तब्बल नऊ दिवस अशा भयानक अवस्थेत दवाखान्यात काढले. मला दवाखान्यात दाखल करतानाच जिवाची घालमेल सुरू झाली. जो काळ तेथे विलाजासाठी रहाणे अवश्यक होते तो एक लांबच लांब अंधाराचा बोगदा वाटू लागला आणि या टनेलच्या शेवटी कुठेही प्रकाश किरण दिसेना.  दवाखान्यात दाखल व्हायच्या आदलेदिवशी मी माझ्या सर्व चाहत्यांना माहितीसठी एक पोस्ट टाकली.
जेंव्हा माझा अज्ञातवास संपला आणि मी घरी आलो त्या दिवशी एकदम हायसे वाटले. आश्चर्य म्हणजे ज्या दिवशी सायंकाळी घरी आलो त्यादिवशीच माझ्या प्रकृतीत अमुलाग्र सुधारणा दिसली आणि माझ्या आनंदास पारावार उरला नाही. चार पाच दिवस आराम करून मी ऑनलाईन गेलो तर माझ्या मित्र मैत्रिणींच्या सदिछ्चांचा धो धो पाऊस पडून गेला होता.आता मला एकदम पालटलेले चित्र दिसत होते. एकीकडे अंधाराचा माझ्यावर होत असलेला  हल्ला तर दुसरीकडे  सदिच्छांची माझ्या बाजूने असलेली त्सुनामी आणि डॉक्टर लोकांचे अथक परिश्रम. या तुंबळ लढाईत विजय शेवटी प्रकाशाचाच झाला आणि मी आपल्यासमोर या सदराखाली लिहिण्यास खडखडीत तंदुरुस्त उभा आहे.
पण ज्या दिवशी अ‍ॅड्मिट व्हायचे होते त्या दिवशीची माझी मनोव्यथा दर्शवणारी एक रचना माझ्याकडून लिहिली गेली जी मी पोस्ट नाही करू शकलो. ती रचना खाली माझ्या चाहत्यांसाठी देत आहे. कविता पूर्ण झाल्यावर टाईप करताना पुन्हा मनात आले की नकारात्मकता हा माझा गुणधर्म नाही. म्हणून शेवटचे कडवे वाढवून पॉझिटिव्ह लँडिंग केले या रचनेचे. शेवटी मला पण माझा डीएनए बदलणे जमूच शकत नाही. ही भूमिका सांगणारी ही कविता.---

कविता आता रचेन म्हणतो

प्रकाश मागे सोडुन पुढती निघेन म्हणतो
अंधारावर कविता आता रचेन म्हणतो
 
प्रतिबिंबाला आरशातल्या वेध लागले
ग्रहण लागण्या वेळ! तरीही चित्त गोठले
राहू केतू संगे दोस्ती करेन म्हणतो
अंधारावर कविता आता रचेन म्हणतो

डोळे मिटुनी बसेन मजला आत बघाया
आत्म परिक्षण केले नाही गेलो वाया
काळोखातच कोठे आहे? बघेन म्हणतो
अंधारावर कविता आता रचेन म्हणतो

जुनी जळमटे आठवणींची मिटवायाला
काळोखाचे रंग लागलो उधळायाला
एक काजवा कुणाचा तरी बनेन म्हणतो
अंधारावर कविता आता रचेन म्हणतो

हृदयाच्या ठोक्यांनाही पण कळून चुकले
हिशोब करतो श्वास संपले, किती राहिले
वजावटी अन्  बेरजातुनी सुटेन म्हणतो
अंधारावर कविता आता रचेन म्हणतो

पिंड असावा बंडखोर हे तत्व पाळले
किती संकटे आली गेली ना जुमानले
झोपडीतही दरबारी आळवेन म्हणतो
अंधारावर कविता आता रचेन म्हणतो

गोंधळलेले मनही हल्ली विचार करते
अस्तित्वाविन अंधाराचे असणे असते
प्रकाश नसण्यालाच जमाना तम का म्हणतो?
अंधारावर कविता आता रचेन म्हणतो



निशिकांत देशपांडे, पुणे.
मो. क्र. ९८९०७ ९९०२३  

Tuesday, May 11, 2021

कुठे हरवल्या माझ्या कविता?

 कुठे हरवल्या माझ्या कविता?---एक ऑनलाईन मैत्रिण. नेहमी तिच्याशी बोलताना म्हणायची की तिला भटाराखान्यात कामाला जायचे आहे. कधी मुदपाकखाना हा शब्द पण ती वापरत असे. तिच्या बोलण्यातून, तिच्या काव्यछंदाचे घरात कौतुक होत नसावे असे वाटले.उलट तिची प्रतारणाच होत असावी. तिचा गुदमर आणि होत असलेली कुचंबणा चित्रित करायचा प्रयत्न केलाय या कवितेतून.


भटारखान्यातली मुग्धिका
बोलत होती आपुल्यासवे
कुठे हरवल्या माझ्या कविता?
शब्द न सुचती चारही नवे

वाचायाची सूर लाउनी
अपुल्या अन् इतरांच्या कविता
रोमांचांना पांघरून ती
खळखळायची बनून सरिता
तल्लिन होवुन रंगुन जाई
कवितेमधल्या भावनांसवे
कुठे हरवल्या माझ्या कविता?
शब्द न सुचती चारही नवे

कामे उरकुन थकल्यावरती
दरवळणार्‍या शांत अंगणी
डोळे मिटुनी आत शोधते
उत्तररात्री एक चांदणी
खुदकन हसते मनात दिसता
शब्द धनांचे कैक काजवे
कुठे हरवल्या माझ्या कविता?
शब्द न सुचती चारही नवे

कविता माझी रचून होता
त्याला मी वाचून दावली
संपण्याआधी मला म्हणाला
जेवण दे ना! भूक लागली
राबराबणे असे निरंतर
जगले नाही कौतुकासवे
कुठे हरवल्या माझ्या कविता?
शब्द न सुचती चारही नवे

बंडखोर मी बनेन आता
सरस्वती मा कृपा असू दे
एकच निश्चय, लिहावयाचा
साथ जगाची असू नसू दे
नभांगणी माझ्या काव्यांचे
जगा दिसू दे लाख  चांदवे
कुठे हरवल्या माझ्या कविता?
शब्द न सुचती चारही नवे


निशिकांत देशपांडे, पुणे.
मो.क्र. ९८९०७ ९९०२३