Monday, October 26, 2020

अन् संपला उन्हाळा

 रेतीत नाव माझे

लिहिलेस त्या क्षणाला

हिरवळ मनी पसरली

अन् संपला उन्हाळा


अधिपत्य वदनांचे,

मी मांडलीक होते

भाग्यात दीन जगणे

मी जागरूक होते

घेण्यास मी भरारी

सांगीतले मनाला

हिरवळ मनी पसरली

अन् संपला उन्हाळा


आहे तशीच होते

होते तशीच आहे

पाहून आरसाही

म्हणतो असेच आहे

बदलेन तुजसवे मी

मिळता जरा जिव्हाळा

हिरवळ मनी पसरली

अन् संपला उन्हाळा


अंधार माजलेला

अन् कवडसा बिचारा!

काळोख विझवण्याचा

होता खरा उतारा

मनहूस निराशेला

देऊत ये उजाळा

हिरवळ मनी पसरली

अन् संपला उन्हाळा


हिंदोळण्यास आता

उर्मी मनात आहे

तुझियासवे सख्या मी

पाना फुलात आहे

जादू तुझी अशी की

ग्रिष्मातही हिवाळा

हिरवळ मनी पसरली

अन् संपला उन्हाळा


कोरी लिहावयाला

घेऊत स्वच्छ पाटी

नवखाच श्रीगणेशा

नवखेच गीत ओठी

का व्यर्थ आठवांचा

उडवायचा धुराळा?

हिरवळ मनी पसरली

अन् संपला उन्हाळा



निशिकांत देशपांडे, पुणे.

मो.क्र. ९८९०७ ९९०२३



Saturday, October 17, 2020

हीच कहाणी घरोघरी

 जगून झाले जीवन आता

करीत बसतो हरी हरी

सुरकुतलेल्या नैराश्याची

हीच कहाणी घरोघरी


धरून ठेका तालावरती

नाच नाचलो, नाचविले

टप्पा, ठुमरी गात तराने

आयुष्याला जोजविले

गळ्यात उरली फक्त वेदना

मैफिल आता एकसुरी

सुरकुतलेल्या नैराश्याची

हीच कहाणी घरोघरी


आठवणींचे पाश गळ्याचे

जरा सैलसर करून घ्या

नको नको ते विसरायाला

यत्न करोनी शिकून घ्या

कृतज्ञ सार्‍या अपुल्यांचा पण

भार नसावा कुणावरी

सुरकुतलेल्या नैराश्याची

हीच कहाणी घरोघरी


कशी वागते पिढी आजची?

तुमचा हस्तक्षेप नको

निर्णय घेण्या सक्षम सारे

ज्येष्ठांचा अक्षेप नको

हवा उद्याचा सल्ला त्यांना

नको कालचा खरोखरी

सुरकुतलेल्या नैराश्याची

हीच कहाणी घरोघरी


सुखदु:खाला कुणी पाहिले?

जरी नांदते तुम्हासवे

नसलेल्यांना आहे म्हणुनी

बघावेत का उगा थवे?

मीच मला समजावत असतो

अहोरात्र हे परोपरी

सुरकुतलेल्या नैराश्याची

हीच कहाणी घरोघरी



निशिकांत देशपांडे, पुणे.

मो.क्र. ९८९०७ ९९०२३


Monday, October 5, 2020

सूर लाउनी गुणगुणतो मी

 सूर लाउनी गुणगुणतो मी--( माझ्या ७६ व्या वाढदिवसा निमित्त लिहिलेली कविता )


केशर लाली क्षितिजावरची

सांज सकाळी अनुभवतो मी

गीत जीवना तुझेच ओठी

सूर लाउनी गणगुणतो मी


हजार असुनी एक त्यातली

मीच निवडली वाट चालण्या

यश माझे अपयशही माझे

नको कुणीही दूषण देण्या

खाचा, खळगे नसे काळजी 

पडतो, उठतो, सावरतो मी

गीत जीवना तुझेच ओठी

सूर लाउनी गणगुणतो मी


जे जे आम्हा हवे हवेसे

दिले मुक्त हस्ते देवाने

नसे शिकायत मनात कुठली

जगून झाले आनंदाने

रंगबिरंगी उत्सवास या

इंद्रधनूने चितारतो मी

गीत जीवना तुझेच ओठी

सूर लाउनी गणगुणतो मी


आयुष्याच्या मैफिलीत ती

ज्योत होउनी तेवत असते

सखी सोबती, बघता बघता

जगावयाचे सूत्र गवसते

तिचा राबता गझलेमध्ये

अन् मक्त्यातच** आढळतो मी

गीत जीवना तुझेच ओठी

सूर लाउनी गणगुणतो मी


सार्थ जीवनी खंत कशाची?

जरी लांबल्या सांज सावल्या

गर्वगीत कोलंबसचे का

लिहावयाला ओळी सुचल्या?

भाव दाटले असे अनामिक

कलमेमधुनी निर्झरतो मी

गीत जीवना तुझेच ओठी

सूर लाउनी गणगुणतो मी


वाढदिवस हे पर्व असावे

क्षमा याचना करावयाचे

आदरपूर्वक स्मरण करावे

गणगोतांचे अन् मित्रांचे

अपूर्ण असुनी पूर्णत्वाच्या

रस्त्यावरती वावरतो मी

गीत जीवना तुझेच ओठी

सूर लाउनी गणगुणतो मी


** मक्ता म्हणजे गझलेतील शेवटचा शेर ज्यामधे शायराचे नाव गुंफलेले असते.


निशिकांत देशपांडे, पुणे.

मो. क्र. ९८९०७ ९९०२३