Tuesday, August 21, 2018

उमलावे की नाही?


जन्मायाच्या अधीच संभ्रम, जन्मावे की नाही?
कळीस पडतो प्रश्न नेहमी, उमलावे की नाही?

लाख लपवुनी तिव्र वेदना, इतरांसाठी हसते
परवान्यांच्या मैफिलीत ती रंग भराया असते
ज्योत कधी का ठरवू शकते, तेवावे की नाही?
कळीस पडतो प्रश्न नेहमी, उमलावे की नाही?

अधीच काट्यांमधे लगडली, अन् भ्रमरांचा वावर
एकच पडतो प्रश्न तिला, ना ज्याला आहे उत्तर
कोषामधले गंध भोवती उधळावे की नाही?
कळीस पडतो प्रश्न नेहमी, उमलावे की नाही?

माळ्यालाही बागेच्या का इतकी असते घाई?
फुलण्या आधी कुस्करल्यावर होते लाही लाही
कधी कळीने कुणास अपुले मानावे की नाही?
 कळीस पडतो प्रश्न नेहमी, उमलावे की नाही?

व्यासांच्या द्रौपदीस नाही कृष्णही अता वाली
कौरवासवे अजरामर ती दुर्दैवाने झाली
अल्पायुष्यी पांडवास मग वाचावे की नाही?
कळीस पडतो प्रश्न नेहमी, उमलावे की नाही?

संपत नाही पिढी-दर-पिढी काळोखाची रजनी
देवही अता पावत नाही रोज रंगता भजनी
न्याय मिळवण्या स्फुल्लिंगाने पेटावे की नाही?
कळीस पडतो प्रश्न नेहमी, उमलावे की नाही?


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Thursday, August 2, 2018

जा पुढे शुन्यातुनी


मुक्त हो मुक्ता जराशी, कालच्या शल्यातुनी
स्वप्न विरले तर विरू दे, जा पुढे शुन्यातुनी

थेंब अश्रूंचे जुने, व्हावेत मोती आजचे
यत्न कर तू याचसाठी, टाक पुरुनी कालचे
जीवना आकार दे तू, आपुल्या मुल्यातुनी
स्वप्न विरले तर विरू दे, जा पुढे शुन्यातुनी

वागती दुसरे कसे? या वर खुशी मोजू नये
तू स्वयंभू कर सुखांना, वेदना जिंकू नये
उत्तरे मिळतील तुजला, आपुल्या प्रश्नांतुनी
स्वप्न विरले तर विरू दे, जा पुढे शुन्यातुनी

आज नजरेआड तारे दोन लपलेले तरी
धीर धर ते भेटतिल; पण एवढे कर तोवरी
बघ चिमुरड्यांना नभीच्या रोज नक्षत्रातुनी
स्वप्न विरले तर विरू दे, जा पुढे शुन्यातुनी

तू तळागाळातल्यांचा भार घे खांद्यावरी
आपुले कर पीडितांना, आपुले नसले तरी
माय होण्या वंचितांची, ऊठ ये! कोषातुनी
स्वप्न विरले तर विरू दे, जा पुढे शुन्यातुनी

पेरले जे ते उगवते, हे खरे असले तरी
माजते तण संकटांचे, पेरले नाही तरी
पण सुगी होणार नाक्की, उभर तू क्लेशातुनी
 स्वप्न विरले तर विरू दे, जा पुढे शुन्यातुनी

कुंचला घे रंग देण्या, तू उद्याच्या जीवना
चित्र रेखाटून हिरवे, साद दे तू श्रावणा
घे भरारी ऊंच गगनी, नीघ नैराश्यातुनी
स्वप्न विरले तर विरू दे, जा पुढे शुन्यातुनी


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३