Wednesday, April 4, 2018

चंद्र नभीचा बघू लागला


मला कळेना उत्तररात्री
असा अचानक कसा वागला?
शिरशिरलेली काया माझी
चंद्र नभीचा बघू लागला

कैक अधूरी स्वप्ने होती
खोल अंतरी हिरमुसलेली
मनी नांदते मृगजळ माझ्या
वाट चालते तहानलेली
जीवन गाणे विरुन गेले
तरी कुणी हा सूर लावला?
शिरशिरलेली काया माझी
चंद्र नभीचा बघू लागला

जीवन झाले असह्य ओझे
दिवस कटेना, रात्र सरेना
तरी लोक का म्हणती "थांबत
नसतो केंव्हा काळ" कळेना
चकोर होता आज सख्याची
गुदमर थोडासा सुखावला
शिरशिरलेली काया माझी
चंद्र नभीचा बघू लागला

परिचय नसतो जिचा सुखांशी
दु:ख तिला का जाचत असते?
लाख मिरवते हास्य लेउनी
मनी वेदना सोसत असते
कसे झिरपले आज चांदणे!
ना कळले पण जीव रंगला
शिरशिरलेली काया माझी
चंद्र नभीचा बघू लागला

संस्काराचा असून पगडा
बंडखोर का शरीर झाले?
 स्वप्नीही जे केले नसते
तेच कराया अधीर झाले
मादक नजरेने, ग्रिष्माला
वसंतऋतुचा अर्थ उमगला
शिरशिरलेली काया माझी
चंद्र नभीचा बघू लागला

ज्याच्या हाती हात असावा
करतो जेंव्हा तोच उपेक्षा
तर मग कोणाकडे बघावे?
अन् ठेवाव्या काय अपेक्षा?
"वटपूजा का व्यर्थ करावी?"
एल्गाराचा जन्म जाहला
शिरशिरलेली काया माझी
चंद्र नभीचा बघू लागला


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३




No comments:

Post a Comment