Thursday, March 29, 2018

असताना बयको सोबत---

( बदल म्हणून एक विनोदी कविता. माझ्या कवितांचा हा DNA नसून सुध्दा!" टिकटिक वाजते डोक्यात" या सोनेगीताच्या चालीवर गुणगुणता येईल ही रचना.)

झिणझिणते वाळवी डोक्यात
असताना बायको सोबत
खळखळणे कालचे संपले
अपुल्याच राहते तोर्‍यात

माझ्या अन् तुझ्याही मैत्रिणी
सुंदर वाटती बघता क्षणी
त्यांना मी शिकवून ठेवले
बोलावे सोज्वळ वरकरणी
काका म्हणती ललना तरी
दुखते का तुझिया पोटात?
झिणझिणते वाळवी डोक्यात
असताना बायको सोबत

धाकटी तुझी ती बहीण
केवढी दिसते तरुण
पार्लरमधुनी आल्यावर वाटे
ग्रिष्मातला ती श्रावण
लावला डाय असूदे केसांना
बट सावरते झोकात
झिणझिणते वाळवी डोक्यात
असताना बायको सोबत

मोबाईल वाजता माझा कधी
तू का घ्यायाला पळतेस?
कोणाचे आले? कोणाला केले?
लॉग का नेहमी बघतेस?
लँड लाईन मी वापरतो
बोलाया पोरींशी ऑफिसात
झिणझिणते वाळवी डोक्यात
असताना बायको सोबत

वृध्दत्वाने अंग थरथरते
पण तरी नजर का भिरभिरते?
न आवडे अस्तित्व आजचे
भूतकाळी मन मोहरते
ठीक आहे तू आहेस म्हणुनी
ठेवाया आजही धाकात
झिणझिणते वाळवी डोक्यात
असताना बायको सोबत


निशिकांत देशपांडे. मो क्र ९८९०७ ९९०२३



Wednesday, March 21, 2018

फुलून आले जीवन


कधी न गोंजारले तयाला, तरी बरसला सावन
वेळोवेळी ठोकरले पण फुलून आले जीवन

दु:ख, वेदना कडून शिकलो तंत्र मंत्र जगण्याचे
उन्हानेच तर स्वप्न पाडले सावलीत बसण्याचे
सहवासाच्या सुखास असते विरह नेहमी कारण
वेळोवेळी ठोकरले पण फुलून आले जीवन

मनी मनसुबे कधीच नव्हते, भव्य दिव्य जगण्याचे
मीच शिकविले मला संकटी धडे मस्त हसण्याचे
नाही केले मी दु:खांच्या गाथेचे पारायण
वेळोवेळी ठोकरले पण फुलून आले जीवन

एकलव्य मी मला घडविले, दोष कुणाला द्यावा?
मी नावाडी, बोट बुडाली, करू कुणाचा धावा?
करता मी अन् मीच कराविता, नको शोधणे कारण
वेळोवेळी ठोकरले पण फुलून आले जीवन

अशा स्वयंभू जगण्यासाठी, नको शोक हंबरडे
मरणोत्तर का कधी मोडते आप्तांचे कंबरडे?
पिंडदान मी करीन माझे, अन् माझे मी तर्पण
वेळोवेळी ठोकरले पण फुलून आले जीवन

सामान्याचे जीवन जगता मौज आगळी असते
बिनध्येयाच्या भणंगासही हवे हवे ते मिळते
नराप्रमाणे जगलो, नव्हते बनायचे नारायण
वेळोवेळी ठोकरले पण फुलून आले जीवन


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Saturday, March 3, 2018

पालखीतल्या अंधाराचा---

( आशातच बँकेतली अनेक लफडी उघडी पडली. मी स्वतः बँकेत नोकरी केलेली असल्यामुळे मला या सार्‍या प्रकरणातली दाहकता प्रकर्षाने जाणवली. उद्विग्न होऊन लिहिलेली कविता. )

हतबल झाला उजेड इतका! प्रभाव सरला रविकिरणांचा
जो तो आहे भोई येथे पालखीतल्या अंधाराचा

काळोखाची मशाल घेउन प्रकाश शोधायास निघालो
जरी निराशा पदरी पडली, देवाला विणवून म्हणालो
धुलीकणाने युक्त तरीही, हवा कवडसा एक उन्हाचा
जो तो आहे भोई येथे पालखीतल्या अंधाराचा

वस्त्रहरण त्या पांचाळीचे, जसे जाहले भरदरबारी
अंधाराच्या आधिपत्त्याची, प्रथम वाजली तिथे तुतारी
कलियूगी वाढला केवढा! प्रतिध्वनी त्या किंचाळ्यांचा
जो तो आहे भोई येथे पालखीतल्या अंधाराचा

काळे धंदे, काळी करणी, काळा पैसा, उजळ मुखवटा
शुचित्व मेले, खोल गाडले, कोण पाळतो आज दुखवटा?
पिंडालाही काक शिवेना, धनी जाहलो पराजयाचा
जो तो आहे भोई येथे पालखीतल्या अंधाराचा

हिरा असो वा सोने, चांदी ध्येय आमुचे एकच असते
स्फटिकांच्याही आत शोधता, अमाप काळे धन सापडते
नेते, बाबू, आम्ही मिळुनी, खेळ खेळतो लुटावयाचा
जो तो आहे भोई येथे पालखीतल्या अंधाराचा

मदार सारी या देशाची, तरुणांनो! तुमच्यावर आहे
पाठलाग जा करा जिथे मोठ्या चोरांचा वावर आहे
मनी असू द्या निश्चय, त्यांना वेशीवरती टांगायाचा
जो तो आहे भोई येथे पालखीतल्या अंधाराचा


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३