Monday, October 9, 2017

मनाजोगते जीवन जगतो


जरी जाहले बाहत्तर वय
आयुष्याला मोजत नसतो
बेफिकिरीने कलंदराचे
मनाजोगते जीवन जगतो

अटी लादल्या मला हव्या त्या
आयुष्यावर निर्धाराने
सदा कासरा धरून हाती
मार्ग चाललो सतत्त्याने
हार, जीत माझीच कमाई
प्राक्तनास ना दोषी म्हणतो
बेफिकिरीने कलंदराचे
मनाजोगते जीवन जगतो

पहिल्या, शेवटच्या श्वासातिल
अंतर म्हणजे जीवन असते
रखरखणारे ऊन कधी तर
जीवन ओला श्रावण असते
किती घेतले? किती राहिले?
श्वास कुणी का मोजत असतो?
बेफिकिरीने कलंदराचे
मनाजोगते जीवन जगतो

आत्मवृत्त जर मी लिहिले तर
झरेल जीवन यथार्थतेचे
पानोपानी ऐकू येइल
सुरेल गाणे कृतार्थतेचे
सुर्यास्ताची वेळ असोनी
पहाट गीतांना गुणगुणतो
बेफिकिरीने कलंदराचे
मनाजोगते जीवन जगतो

अजातशत्रू जगून झाले
सारे माझे, मी सार्‍यांचा
मावळतीला विहरत असतो
हात धरोनी मी वार्‍याचा
ऐलतिरावर जगता जगता
पैलतिरावर कविता रचतो
बेफिकिरीने कलंदराचे
मनाजोगते जीवन जगतो

आकाशाला कवेत धरणे
स्वभाव माझा जुना पुराना
संथ चाल पण रियाज केला
द्रुतगतीत गावया तराना
सूर, तान, सम साधत साधत
मैफिलीस मी समाप्त करतो
बेफिकिरीने कलंदराचे
मनाजोगते जीवन जगतो


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

No comments:

Post a Comment