Monday, October 30, 2017

चौकटीत का जगावयाचे?


खळखळायचे मनी असोनी
संथ, प्राक्तनी वहावयाचे
मला वाटते काय, विसरुनी
चौकटीत का जगावयाचे?

परीघ माझा कुणी आखला?
कसे हसावे? कसे रहावे?
व्यास व्हायची क्षमता असुनी
त्रिजा बनविले, तरी हसावे
स्त्री शक्तीचा उदो उदो पण
गुदमरात का रहावयाचे?
मला वाटते काय, विसरुनी
चौकटीत का जगावयाचे?

पतीमुळे सौभाग्यवती स्त्री
लग्न लागता, क्षणात बनते
सुंदर पत्नीमुळे वराचे
भाग्य उजळले कुणी न म्हणते
अशा संस्कृतीच्या कवणांना
निमूट का मी लिहावयाचे?
मला वाटते काय, विसरुनी
चौकटीत का जगावयाचे?

अशा दुटप्पी जगी ठरवले
नको लग्न अन् नको बंधने
मनाजोगती घेत भरारी
सुखावेन मी खुल्या हवेने
बंडखोर आवतार बघोनी
हसोत ज्यांना हसावयाचे
मला वाटते काय, विसरुनी
चौकटीत का जगावयाचे?

कैक विषारी नजरांना मी
वळणावळणावरती झेलत
जीवन ओझे नसून सुध्दा
संकटांस मी असेन पेलत
मार्ग निवडला मीच तरी का
प्राक्तनावरी कण्हावयाचे
मला वाटते काय, विसरुनी
चौकटीत का जगावयाचे?

पतीमुळे स्त्री संरक्षित ही
भ्रामक आहे किती कल्पना !
पाचांची द्रौपदी असोनी
केली कृष्णाचीच प्रर्थना
खड्ग घेउनी हाती, रक्षण
मलाच माझे करावयाचे
मला वाटते काय, विसरुनी
चौकटीत का जगावयाचे?

नव रामायण लिहिता लिहिता
वाल्मिकीसही प्रश्न पडावा
उध्दाराया सती आहिल्या
सिता असावी? राम असावा?
छेद देत मज रुढी प्रथांना
अजन्म आहे लढावयाचे
मला वाटते काय, विसरुनी
चौकटीत का जगावयाचे?


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३







Monday, October 9, 2017

मनाजोगते जीवन जगतो


जरी जाहले बाहत्तर वय
आयुष्याला मोजत नसतो
बेफिकिरीने कलंदराचे
मनाजोगते जीवन जगतो

अटी लादल्या मला हव्या त्या
आयुष्यावर निर्धाराने
सदा कासरा धरून हाती
मार्ग चाललो सतत्त्याने
हार, जीत माझीच कमाई
प्राक्तनास ना दोषी म्हणतो
बेफिकिरीने कलंदराचे
मनाजोगते जीवन जगतो

पहिल्या, शेवटच्या श्वासातिल
अंतर म्हणजे जीवन असते
रखरखणारे ऊन कधी तर
जीवन ओला श्रावण असते
किती घेतले? किती राहिले?
श्वास कुणी का मोजत असतो?
बेफिकिरीने कलंदराचे
मनाजोगते जीवन जगतो

आत्मवृत्त जर मी लिहिले तर
झरेल जीवन यथार्थतेचे
पानोपानी ऐकू येइल
सुरेल गाणे कृतार्थतेचे
सुर्यास्ताची वेळ असोनी
पहाट गीतांना गुणगुणतो
बेफिकिरीने कलंदराचे
मनाजोगते जीवन जगतो

अजातशत्रू जगून झाले
सारे माझे, मी सार्‍यांचा
मावळतीला विहरत असतो
हात धरोनी मी वार्‍याचा
ऐलतिरावर जगता जगता
पैलतिरावर कविता रचतो
बेफिकिरीने कलंदराचे
मनाजोगते जीवन जगतो

आकाशाला कवेत धरणे
स्वभाव माझा जुना पुराना
संथ चाल पण रियाज केला
द्रुतगतीत गावया तराना
सूर, तान, सम साधत साधत
मैफिलीस मी समाप्त करतो
बेफिकिरीने कलंदराचे
मनाजोगते जीवन जगतो


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३