Monday, July 17, 2017

मी माझा उरलो नव्हतो

मी माझा उरलो नव्हतो--(असे म्हणतात की लग्नानंतर स्त्रीच्या जीवनात खूप मोठे बदल येतात. पण माझ्याही जीवनाच्या रंगात विवाहानंतर अमूलाग्र बदल झाले आहेत. आज पत्नीच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कृतार्थ भावनेने हे बदल नोंदवण्यासाठी लिहिलेली कविता).

मी माझे मीपण त्यजुनी
क्षणभरही जगलो नव्हतो
जाहल्या क्षणी ती माझी
मी माझा उरलो नव्हतो

दुनिया माझी काळोखी
अन् रातकिड्यांची संगत
मी करी माझियासंगे
एकांती अंगत पंगत
ती मला भेटण्याआधी
क्षितिजावर फिरलो नव्हतो
जाहल्या क्षणी ती माझी
मी माझा उरलो नव्हतो

शिडकावा दवबिंदूंचा
ही पहाट ओली ओली
अन् गंध फुलांचा ताजा
व्यापतो मनाची खोली
एकटा विहंगम बघण्या
मी धुक्यात विरलो नव्हतो
जाहल्या क्षणी ती माझी
मी माझा उरलो नव्हतो

जीवनात जगण्याजोगे
शोधू या दोघे मिळुनी
घेऊ या ईंद्रधनुंच्या
रंगांना सार्‍या खलुनी
हातात हात आल्याने
मी उदास उरलो नव्हतो
जाहल्या क्षणी ती माझी
मी माझा उरलो नव्हतो

तोडल्या चौकटी सार्‍या
आयुष्य जगायासाठी
उकलून पटापट गेल्या
ज्या काचत होत्या गाठी
एकटा कलंदर इतका!
जीवनास दिसलो नव्हतो
जाहल्या क्षणी ती माझी
मी माझा उरलो नव्हतो

घेतली डायरी लिहिण्या
स्थित्यंतर माझ्या मधले
कालचा आज मी नाही
हे पदोपदी जाणवले
ही किमया सर्व सखीची
लिहिण्यास कचरलो नाही
जाहल्या क्षणी ती माझी
मी माझा उरलो नव्हतो


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

No comments:

Post a Comment