Friday, August 26, 2016

"उफ"ना करता कशा यातना---(चित्र कविता)


छळावयाचे छळून घे तू
हवे तेवढे मला प्राक्तना
मीच जाणतो सहन कराव्या
"उफ" ना करता कशा यातना

लुळा पांगळा, पाय नसू दे
हौस एवढी जगावयाची!
ढोपर सरकावत जिद्दीने
आहे टेकडी चढावयाची
ध्येय गाठुनी, पूरी आहे
करावयाची मनोकामना
मीच जाणतो सहन कराव्या
"उफ" ना करता कशा यातना

चित्र रेखितो कल्पनेत मी
नसलेल्या पायांचे देवा
आणि हरवतो खुशीत इतका!
सशक्तांसही वाटे हेवा
आपदांसवे असता यारी
तुझी कशाला करू प्रार्थना?
मीच जाणतो सहन कराव्या
"उफ" ना करता कशा यातना

हंस चालतो डौलदार पण
त्याचा रस्ता खास नसावा
कावळ्यासही जमेल तैसे
चालायाचा हक्क असावा
मी माझ्या चालीने जातो
जिथे वसे हासरी वेदना
मीच जाणतो सहन कराव्या
"उफ" ना करता कशा यातना

अंधाराचे पर्व असू दे
माझ्यासाठी हीच दिवाळी
फरपट सारी,पण मी देवा
कधी न केली तुझी टवाळी
दोष न देता कुणा जगावे
प्रखर नांदते मनी भावना
मीच जाणतो सहन कराव्या
"उफ" ना करता कशा यातना

अपर्णातुनी पूर्णत्वाचा
जन्म व्हायचा निश्चित असते
अंधाराचे भोग भोगता
प्रभात किरणे, लाली दिसते
भविष्यातल्या सुखस्वप्नांची
चाहुल बनते आज वेदना
मीच जाणतो सहन कराव्या
"उफ" ना करता कशा यातना


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Tuesday, August 23, 2016

कधीच विझले नाही


अंधाराचे विश्व असोनी
कुठे हरवले नाही
ज्योत जरी मी वादळातली
कधीच विझले नाही

सोशिक आहे, म्हणून म्हणती
मलाच अबला सारे
दुसर्‍यांच्या हातात कासरा
पदोपदी फटकारे
उद्रेकाला मनातल्या मी
कधी व्यक्तले नाही
ज्योत जरी मी वादळातली
कधीच विझले नाही

स्त्रीजन्माच्या आदर्शांचे
ओझे उतरत नाही
पाठीवरती भार पेलणे
साधी कसरत नाही
भोई संसाराची झाले
पण मी थकले नाही
ज्योत जरी मी वादळातली
कधीच विझले नाही

नकोत मजला हार तुरे अन्
नकोय वैभव गाथा
जन्मोजन्मी जगले आहे
झुकउन सदैव माथा
बोच मनाला, शल्य स्त्रियांचे
प्रभूस कळले नाही
ज्योत जरी मी वादळातली
कधीच विझले नाही

येते मरगळ कधी कधी पण
तीही क्षणीक असते
झटकुन देते नैराश्याला
पुढेच पाउल पडते
कर्तव्याची धुरा वाहता
मनात खचले नाही
ज्योत जरी मी वादळातली
कधीच विझले नाही

दहिहंडीला आकाक्षांच्या
चढेन मी फोडाया
युगायुगांच्या घाट्ट शृंखला
निघेन मी तोडाया
उध्दाराचे कांड अहिल्ये!
मनास पटले नाही
ज्योत जरी मी वादळातली
कधीच विझले नाही


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Monday, August 8, 2016

व्यथा---

(औरंगाबादच्या माझ्या घराच्या खिडकीत चिमणीने घरटे केले. पिले झाली; उडून गेली. चिमणी दोन दिवस भिरभिरत्या नजरेने शोध घेऊन ती पण उडून गेली. ते रिकामे घरटे अजून तसेच आहे खिडकीत. या वरून सुचलेली कविता )

गोड धडधड उरी तिच्या लागताच चाहूल
चिमणी लागली नाचायला होणार म्हणून मूल

वाळलं गवत अन् काड्या करत होती जमा
पडणार्‍या कष्टांची नव्हती तिला तमा

घरटं छान मऊ व्हावं एकच ध्यास मनी
काळजी करणं बाळाची सवय होती जुनी

दोन पिलं जन्मली खोप्यात होती घाई
आनंदात नहात होती वेडी त्यांची आई

पिलांना भरवण्यासाठी बाहेर  जाई
शोधून शोधून दाणे घेउन घरी येई

चोंचीत दाणे भरवताना आनंदाची सर
पिले वाढता वढता त्यांना फुटू लगले पर

दाणे घेऊन पुढे चाले हळू हळू चिमणी
पिले मागे येता बघत होई सुखरमणी

एके दिवशी चिमणीला मिळेनात दाणे
कष्ट तिला किती पडले देवच एक जाणे

मिळाले ते घेऊन परत आली घरा
पिले नव्हती कुठे, खोपा मोकळा  पुरा

भिरभिरत्या नजरेस तिच्या दिसत नव्हतं कुणी
पंख फुटता भुर्र उडाली कहानी ही जुनी

मीच तर त्यांच्या दिलंय पंखांना बळ
म्हणूनच तर आज भोगतेय काळजातली कळ

एक चिमणा पुन्हा तिच्या सान्निध्यात आला
अनुनय प्रणयासाठी सुरू होता झाला

अंगचटीला येऊ नकोस! नकोय मला मजा
लेकरं उडून गेली माझी, भोगतेय मी सजा

इतिहास परत घडणे नकोय मला आता
मरेन पण होणार नाही फिरून कधी माता

घरटे विरान अंगणी नुसतीच आहे शोभा
चिमणी गेली पिले गेली, गेलीय त्याची आभा

ओसाड खोपा सांगत आहे अजूनही कथा
प्रेमासाठी सवय हवी भोगण्याची व्यथा


निशिकांत देशपांडे. मो. क्र. ९८९०७ ९९०२३














Wednesday, August 3, 2016

आरशाला मी कधी कळलेच नाही

( एकाच विषयावर आणि एकाच यमकात पाच मुक्तके--वृत्तबध्द चारोळ्या--लिहिल्यामुळे ही एक वैशिष्ट्यपूर्ण कविता बनली आहे; जरा वेगळ्या बाजाची )

बंडखोरी हाच आहे पिंड माझा
चौकटीच्या आत मी जगलेच नाही
रूढवादी रूप स्त्रीचे पाहणार्‍या
आरशाला मी कधी कळलेच नाही

शाप भोगत वाट का बघते अहिल्या?
आत्मसन्मानी मना रुचलेच नाही
राम तो उध्दारकर्ता मानणार्‍या
आरशाला मी कधी कळलेच नाही

लागले माझी मला घडवायला मी
वाट खडतर चालता थकलेच नाही
रूप नवखे पाहुनी चक्रावलेल्या
आरशाला मी कधी कळलेच नाही

शार्दुलाच्या ताकदीने गर्जताना
आत्मविश्वासास मी त्यजिलेच नाही
नेहमी चित्कार स्त्रीचे ऐकणार्‍या
आरशाला मी कधी कळलेच नाही

वेग, प्रगती परवलीचे शब्द माझे
धावता रूढी प्रथांची ठेच नाही
आत्मनिर्भर पाहुनी चवताळणार्‍या
आरशाला मी कधी कळलेच नाही

आजची स्त्री मागते सन्मान आहे
जे कधी आधी असे घडलेच नाही
पाहुनी एल्गार थरथर कापणार्‍या
आरशाला मी कधी कळलेच नाही


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Tuesday, August 2, 2016

कातरवेळी तुझी आठवण

धुंद होउनी अनुभवतो मी
मृदुगंधाची जणू साठवण
जेंव्हा जेंव्हा मनी दाटते
कातरवेळी तुझी आठवण

लाख असूदे सभोवताली
गारठणारा गार हिवाळा
मला काय! अतिरेकी पारा
दावतोय अतिउष्ण उन्हाळा
मजेत मी, आठव कोषाचे
तुझ्या, लाभले मला आवरण
जेंव्हा जेंव्हा मनी दाटते
कातरवेळी तुझी आठवण

युगे लोटली तरी परंतू
प्रीत अधूरी जगी नांदते
चंद्र, चकोराच्या भेटीचा
मुहूर्त आला उगा वाटते
आभासी चाहुलीमुळेही
विरहाची होतसे बोळवण
जेंव्हा जेंव्हा मनी दाटते
कातरवेळी तुझी आठवण

घटे, पळे अन् दिवस चांगला
असा कोणता प्रकार नसतो
वर्षामधले बारा महिने
आठवणींचा मोसम असतो
साद द्यावया कोकिळेस का
मोहरलेले हवे आम्रवन?
जेंव्हा जेंव्हा मनी दाटते
कातरवेळी तुझी आठवण

दोन पाखरे उडता उडता
क्षितिजाच्याही पुढे पोंचली
प्रेम भावना शिगेस असता
धुंद होउनी नाचनाचली
कैफ उतरता यक्ष प्रश्न हा
उकलावी ही कशी गुंतवण?
जेंव्हा जेंव्हा मनी दाटते
कातरवेळी तुझी आठवण

प्रेमाला निर्भेळ आपुल्या
विरहाचा लवलेश नसावा
मनी नेहमी आठवणींचा
झुळझुळता सहवास असावा
प्रीत असावी अशी निरागस!
खळाळणारे जणू बालपण
जेंव्हा जेंव्हा मनी दाटते
कातरवेळी तुझी आठवण


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३







Monday, August 1, 2016

कसे जीवनी हसावयाचे---

( मी आमच्या भागातील एका हास्यक्लबचा शाखा प्रबंधक आहे. तीन वर्षांपासून हे काम करताना सदस्यांमधे झालेले बदल बघून आणि त्यांनी दिलेल्या फीडबॅकवरून सुचलेली ही कविता. )

आनंदाच्या वारीसंगे निघावयाचे
इथे कळाले कसे जीवनी हसावयाचे

दु:ख पेरले आयुष्याच्या मळ्यात आहे
हास्यमण्यांची माळ तरीही गळ्यात आहे
लाख कारणे असून नाही रडावयाचे
इथे कळाले कसे जीवनी हसावयाचे

त्रयस्थ आणि शिष्ट संस्कृतीतही भेटती
मित्र केवढे! प्रसंग येता जीव लावती
श्वास मोकळे कसे घ्यायचे? शिकावयाचे
इथे कळाले कसे जीवनी हसावयाचे

उलटी गिनती इथे पाहिली आयुष्याची
वयास विसरुन मजाक मस्ती रोजरोजची
निर्माल्याच्या मनात येते फुलावयाचे
इथे कळाले कसे जीवनी हसावयाचे

आम्ही सारे जमतो तेंव्हा खुल्या दिलाने
हास्य बहरते, हद्दपार असते रडगाणे
सूर गवसले, नवे तालही धरावयाचे
इथे कळाले कसे जीवनी हसावयाचे

इतिहासाची भाग जाहली आहे मरगळ
भासत असते वाळवंटही आता हिरवळ
आनंदाच्या डोही आता रमावयाचे
इथे कळाले कसे जीवनी हसावयाचे

हास्यक्लबातुन आशावादी उर्जा मिळते
सुरकुत्यातली उदासीनता क्षणात पळते
जगायचे ते आनंदाने जगावयाचे
इथे कळाले कसे जीवनी हसावयाचे


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३