आपल्या देशाच्या मातीचाच गुण असावा की काय कळत नाही पण एक खरे की लहान लहान गावातून वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रतिभावान माणसे अगदी भारक्याने पैदा झाली आहेत. हे विधान करायचे कारण की मी आज अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबा या खेडेवजा गावी २१ जानेवारी, १९१८ साली जन्मलेल्या श्री रामचंद्र नरहरी चितळकर यांच्या विषयी त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने थोडे लिहिणार आहे. हे चितळकर म्हणजेच कालच्या जमान्यातले प्रसिध्द संगीतकार सी. रामचंद्र ज्यांची आज जयंती आहे.
सी. रामचंद्र (ज्यांना मी या लेखात आण्णा असे संबोधेन) यांनी संगीताचे शिक्षण पं. विनायकबुवा पटवर्धन यांच्याकडे गांधर्व महाविद्यालयात घेतले. त्यांचे दुसरे गुरू होते नागपूरचे शंकरराव सप्रे. यांच्याकडे शिक्षण घेताना त्यांच्या बरोबर वसंतराव देशपांडे पण संगीत शिकत होते.
नाव रामचंद्र नरहर चितळकर असूनही या माणसाने संगीत क्षेत्रात वावरताना अनेक नावे धारण केली. आण्णासाहेब या नावाने १) बहादुर प्रताप, २) मतवाले, आणि ३) मददगार या चित्रपटांना संगीत दिले. तर राम चितळकर या नावाने १) सुखी जीवन, २) बदला, ३) मि.झटपट आणि ४)दोस्ती या चित्रपटांना संगीत दिले. सी. रामचंद्र या नावाने तर अनेक चित्रपटांना संगीत दिले. आण्णा हे गाणे गाताना चितळकर असे नाव लावत. याच नावाने अतिसुरेल दोन द्वंद्वगीते लताजी बरोबर गायलेली आठवतात. एक म्हणजे भगवान निर्मित आझाद या चित्रपटातील गाणे "कितना हंसी है मौसम". या गाण्यामुळे ही जोडगोळी मस्त जमली. दुसरे गाणे म्हणजे लताजी बरोबर गायलेले अलबेला या फिल्ममधील "शोला ये भडके दिल मेरा भडके", या गाण्यांनी त्या जमान्यात कहर केला होता लोकप्रियतेचा! आजही माझ्या पिढीचे लोक ही गाणी लागली की थबकून आणि जीव कानात आणून ऐकतात.अगदी सुरुवातीच्या काळात त्यांनी वाय. व्ही. राव यांच्या नागाबंद या सिनेमात नायकाची भूमिका पण केली. म्हणूनच मी आण्णांना अष्टपैलू व्यक्क्तिमत्व मानतो
शोला जो भडके या गाण्यासाठी त्यांनी बाँगो, ओबो, ट्रंपेट, क्लॅरनेट आणि सॅक्स ही वाद्ये वापरली. लताजी बरोबर शिनशिनाकी बुबला बू चे शिर्षक गीत गाताना आण्णांनी रॉक ह्रिदमचा वापर केला.
असे पाश्चात्य वाद्यांचे प्रायोगिक वापर करणारे आण्णा हे म्युझिक देताना शास्त्रीय संगिताचाही वापर कौशल्याने करतील असे त्या काळी कोणालाही वाटले नसते. पण आण्णांनी शस्त्रीय संगीताला आपल्या कारकिर्दीचा आत्मा बनवला आणि एकाहून एक रागावर आधारित सुंदर गाणी बनवली.
आण्णा आपल्या गाण्याच्या ताकदीवर रसिकांच्या मनावर कोरले गेले ते १९५३ मधे अनारकली या चित्रपटातील गाण्यांमुळे. तो त्यांच्या कारकिर्दीचा सुवर्णकाळ होता माझ्या मते. १) ये जिंदगी उसीकी है २) मुहोब्बत ऐसी धडकन है ३) जाग दर्द ईष्क जाग ४) जमाना ए समझाकी हम पीके आये या गाण्यांनी प्रसिध्दीचे सर्व रेकॉर्ड्स तोडले. असं म्हंटलं जाते की एका लंडनच्या सिनेपत्रकाराने अनारकली बघून एका वृत्तपत्रात लिहिले होते की "heroine sang like an angel". इतका तो लताजींच्या आवाजाने आणि आण्णांनी दिलेल्या चालीमुळे प्रभावीत झाला होता.
या नंतर एकाहून एक रागदारीवर अधारीत सरस गाण्यांची मालिकाच सुरू झाली. नवरंग मधील आधा है चंद्रमा, तू छुपी है कहाँ, स्त्री मधील ओ निर्दयी प्रीतम, शारदा मधील लता आशा यांनी गायलेले अप्रतीम गीत ओ चांद जहाँ ओ जाये अशी किती तरी गाणी आमच्यासारख्या रसिकांचे कान तृप्त करण्यासाठी दिली. अशा गाण्यांची यादी भरपूर आहे जी येथे देणे केवळ अशक्य. आण्णांनी तब्बल १०४ चित्रपटांना संगीत दिले.आण्णांनी मराठी, तेलगू, तामिळ आणि भोजपुरी चित्रपटांना संगीत दिले. बर्याचजणांना माहीत नसेल की आण्णांनी चित्रपट निर्मिती पण केली आहे. त्यांनी निर्माण केलेले तीन चित्रपट--- १) झांझर २) लहरें आणि ३) दुनिया गोल है. आण्णांनी दोन मराठी चित्रपटात पण कामे केली ज्यांची नावे धनंजय आणि घरकूल अशी होती
अजून एक खास गोष्ट म्हणजे कवी प्रदीप रचित गीत ऐ मेरे वतन के लोगो याला आर्त चाल आणि संगीत पण आण्णांनीच दिले आहे. हे गाणे १९६२ मधे भारतची चीनकडून युध्दात हार झाली तेंव्हा खचलेल्या भारतियांचे मनोबल उंचावण्यासाठी लिहिले गेले होते. एका कार्यक्रमात लालकिल्ल्यावर हे गाणे लताजीने गायले होते. लताजीचा आवाज, आण्णांचे संगीत, गाण्याचा त्या वेळचा संदर्भ हे सारे इतके परिणाम साधणारे होते की गाणे ऐकता ऐकता पं. नेहरू अक्षरशः रडले होते.
संगीत म्हणजे सरस्वतीचे मंदीर असते . या मंदिरात पुजार्यांचा किंवा नवस बोलणार्या याचकांचा राबता नसतो. फक्त वेडे झालेले भक्त येथे असतात. संगीताला जीवन अर्पण करणारे! आण्णा याच प्रकारात मोडणार्या भक्तातील एक महान विभूती जे संगीतासाठी जगले आपले आयुष्य. संगीत त्यांचा श्वास होता. ते जगता जगता रसिकांसाठी ताल, लय, गोडवा यांनी युक्त गाण्यांची उधळण करत गेले आणि आमच्या सारखे रसिक तृप्ततेचा अनुभव घेत होते. अगदी आकंठ रसपान!
पाश्चात्य संगीत ते रागदारी संगीत, अभिनेता ते चित्रपट निर्माता अशी वाटचाल करणारा हा आवलिया प्रवासी ५.१. १९८२ रोजी मुंबई येथे पंचत्वात विलीन झाला; मागे अवीट गाण्यांचा खजाना सोडून. आण्णांचे फिल्म संगीतातले स्थान वादातीत आणि अमर आहे हे नक्की.
आज १२ जानेवारी ही त्यांची जयंती आहे. हे औचित्य साधून त्यांच्या अनेक सुरेल गाण्यांपैकी माझ्या आवडीचे अनारकली या सिनेमातील एक गाणे ऐकून समारोप करू या. हे गाणे ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
/www.youtube.com/watch?v=Na2VxqcsvQo
निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail---nishides1944@yahoo.com