Sunday, October 11, 2015

साल सरल्याचे कळाले---( ७१ व्या वाढदिवसाचे औचित्त्य साधून लिहिलेली कविता )


वस्त्र कलौघात विरल्याचे कळाले
एक आणखी साल सरल्याचे कळाले

यत्न केला आपुल्यांसाठी जगावे
जन्मदिम माझा असे मी का म्हणावे?
मी अता माझा न उरल्याचे कळाले
एक आणखी साल सरल्याचे कळाले

स्नेह संचय रोज बघतो वाढताना
हीच श्रीमंती कमवली वागताना
धन कुबेराचेच घटल्याचे कळाले
एक आणखी साल सरल्याचे कळाले

पावलांची एक इच्छा खास होती
एकदा बहकावयाची आस होती
वाकडा रस्ताच नसल्याचे कळाले
एक आणखी साल सरल्याचे कळाले

जाहली उलटी जरी गिनती तरीही
वर्णितो हिरवळ कधी श्रावणसरीही
सुरकुत्या, मन भिन्न असल्याचे कळाले
एक आणखी साल सरल्याचे कळाले

शब्द आले काव्य होउन, हात धरला
हिरवळीची वाट दिसली, घोर सरला
केवढे उपकार वरच्याचे! कळाले
एक आणखी साल सरल्याचे कळाले

पान पिकणे, पान गळणे रीत आहे
जीवनाच्या भैरवीचे गीत आहे
कोठे तरी नवपर्ण फुटल्याचे कळाले
एक आणखी साल सरल्याचे कळाले


निशिकांत देशपांडे. मो. क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

No comments:

Post a Comment