Friday, September 20, 2013

जगून घ्यावे सणाप्रमाणे



नकोस माझी करू काळजी
तुझ्या घडूदे मनाप्रमाणे
सर्व दिवस तू आयुष्याचे
जगून घ्यावे सणाप्रमाणे

जरी लाभली संगत थोडी
पूर्णत्वाचा बहर पाहिला
प्रेम भावना उत्कट इतकी
रोमांचांचा सडा शिंपिला
आठव सारे जपून ठेविन
खोल अंतरी धनाप्रमाणे
सर्व दिवस तू आयुष्याचे
जगून घ्यावे सणाप्रमाणे

सतेज कांती गौरकाय तू
प्रजक्ताची जणू पाकळी
यौवन इतके फुलून आले
ओझ्याने वाकली डहाळी
उन्हात तू सुकशील म्हणोनी
सूर्य झाकतो ढगाप्रमाणे
सर्व दिवस तू आयुष्याचे
जगून घ्यावे सणाप्रमाणे

जरी खेळतो कवड्या घोळुन
जिंकतेस तू सदैव बाजी
विजयी हसणे तुझे बघाया
हार होउदे सदैव माझी
साठवेन तुज पापण्यात मी
सुवर्णाचिया कणाप्रमाणे
सर्व दिवस तू आयुष्याचे
जगून घ्यावे सणाप्रमाणे

तुझीच चर्चा, तुझे नांदणे
झोतामध्य कायम असते
सभोवताली तुझ्या नेहमी
लुडबुड माझी दुय्यम असते
उभ्या पिकाच्या शेतामध्ये
डोलत राहिन तनाप्रमाणे
सर्व दिवस तू आयुष्याचे
जगून घ्यावे सणाप्रमाणे

तुझ्या भोवती हिरवळ, दरवळ
खडकावरती निवास माझा
स्वप्नांमध्ये तू येण्याने
मूड लागतो झकास माझा
झुळूक येता तुझ्या अंगणी
थरथरतो मी तृणाप्रमाणे
सर्व दिवस तू आयुष्याचे
जगून घ्यावे सणाप्रमाणे


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Tuesday, September 17, 2013

पोट


पोट हा दोन अक्षरी आणि तीन मात्रांचा शब्द तिन्ही लोक (भूलोक वगैरे) व्यापून उरला आहे. जसा देव अनादी आहे तसेच पोट पण अनादी काळापासून माणसांची, प्राण्यांची सोबत करत आहे. पोट या विषयावर असंख्य म्हणी.आणि मुहावरे आहेत. १) आधी पोटोबा मग विठोबा, २) कशासाठी पोटासाठी, खंडाळ्याच्या घाटासाठी, ३) हिंदी सिनेलातील दणकेबाज डाय्लॉग "पापी पेट का सवाल है". ४) हातावर पोट घेऊन निघणे वगैरे वगैरे. मला तर बर्‍याच वेळेस वाटते की पोटाचे महत्व लक्षात घेऊनच गणेशाला लंबोदर किंवा मोठ्या पोटाची देवता बनवले गेले असावे.
अशा या आकाराने लहान (कांही अपवाद सोडून) असणार्‍या पोटांनी महाकाय प्रश्न या जगात निर्माण केले आहेत. मी कधी कधी कल्पना करतो की, पोट नसते तर जग किती सरळ, साधे आणि समस्यारहीत झाले असते.
मी तुम्हाला या निमित्ताने पन्नास वर्षापूर्वीच्या माझ्या शाळकरी आयुष्यात घेऊन जाणार आहे.
एकदा आमच्या वर्गाची सहल गेली होती. त्या वेळेस बसेस नव्हत्या. म्हणून आमच्या गावाजवळच अंदाजे दोन किलोमिटर अंतरावर एक बारव (विहिरीचा एक प्रकार) होता. त्या बारवात तळापासून दोन फूट वर एक दगडी गायमूख होतं. त्या गायमुखातून एक छोटीशी पाण्याची धार नेहमी पडत असे. या ठिकाणास नागझरी असे म्हणत. बारवाभोवती दाट झाडी होती. ते एकमेव सहलीचे ठिकाण होते जवळ पास.तेथे सहल नेण्याचे ठरले. आमचे वर्ग-शिक्षक संस्कृत शिकवत असले तरीही मला ते खूप असुसंस्कृत वाटत असत.सर्व मुलांना प्रभातफेरीसारखे दोघादोघांच्या ओळीत उभे करून पायीपायी सहल निघाली. प्रत्येकाने आपापले डबे आणले होते. गुरुजी सहलीला पण छडी घेऊन यायचे विसरले नाहीत. सहलीत पण कडक शिस्त अपेक्षित होती.
आम्ही सारे पोहंचल्यावर गुरुजींच्या करड्या नजरेखाली खेळ सुरू झाले.सर्व मुलामुलींनी कबडी, शिवणापाणी, खो खो असे शारिरीक मैदानी खेळ खेळले आणि कडकडीत भूक लागल्यावर डबे काढून जेवण घेतले.नंतर सर्वांना गोल रिंगण करून बसवले. त्या वेळेसची मलामुलींची नावे देवदेवतावरूनच असायची. मुलीत सुधारणावादी नावे म्हणजे इंदू, ललिता, नंतर नंतर बेबी या नावाची पण टुम निघाली होती.मुलांमधे सुधाकर, प्रभाकर, बंडू, निशिकांत (अस्मादिक) अशी होती. त्या काळात मोना, सोना, चैताली, वृषाली (हे नाव सोपे करून बैलाली का ठेवत नाहीत असा प्रश्न मला नेहमी पडतो) अशी नावे नव्हती.
सर्वांना गोलाकार बसवून आमच्या गुरुजींनी मोठ्या आवाजात विचारले "यज्ञ झाला का?" आम्ही सगळेच आवाक झालो. एका विद्यार्थ्याने चूक केली आणि विचारले की सहलीत यज्ञ कसला गुरुजी? तेथेही गुरुजींनी त्याचा कान पिरगाळला आणिम्हणाले "गधड्या! डबे खायच्या आधी हात जोडून श्लोक म्हणून घेतला नाही का? त्या श्लोकाचा शेवट काय?" तो वेदनेने कळवळत म्हणाला "उदर भरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म" म्हणजे गुरुजींना विचारायचे होते की पोटभर जेवण झाले का?
गुरुजी नंतर अगदी तत्वज्ञान्याचा आव आणत म्हणाले की आज तुम्हा सर्वांना कल्पना शक्तीला ताण देणारा खेळ खेळायचाय. या खेळात सर्वांनी भाग घेतलाच पाहिजे. काय गं पार्वती! ऐकलस ना? आणि तो परकर जरा खाली कर आणि नीट बैस. पयाचे घोटे (ankles) दिसतायत तुझ्या. त्या काळी हे पण चालत नसे. गुरुजींनी विचारलं, मग आहात सारेजण तयार? आम्ही एका सुरात "हॉ' म्हणालो आणि विचारले कोणता खेळ गुरुजी. ते म्हणाले माणसाला जर पोट नसते तर काय झाले असते? कल्पना करून सांगा एकएकजण. सर्वांना विचार करायला पाच मिनिटे देतोय. सगळेजण मनातल्या मनात अकलेचे तारे तोडायला लागला. मुलांनी दिलेली उत्तरे अशी:--
१)   सदाशिव--देवाला नैवेद्य मिळाला नसता कारण "आधी पोटोबा मग विठोबा"
२)   कुसूम---माझी मैत्रीण पार्वती खूप खुश राहिली असती.आता कुणाचे चांगले पाहिले की लागलीच तिच्या "पोटात दुखत" असतं
३)   जगन्नाथ---जगातल्र पाप खूपच कमी झाले असते कारण "कोणाच्या पोटावर पाय देण्याचे" पाप करताच आले नसते.
४)   दिगंबर---पोट नसते तर गुरुजी लहान लहान गुन्ह्यांसाठी लागलीच कडक शिक्षा झाल्या असत्या कारण "अपराध पोटी घालणे" शक्यच झाले नसते.
५)   मंगला--- गुरुजी! गुरुजी! पोट नसते तर मी जन्मलेच नसते. पोटाशिवाय आई "पोटिशी" (गरोदर) राहिलीच नसती. अन् ती दादाला उठता बसता म्हणत असते "मोठा झाल्यावर आमचे पांग फेड. नऊ महिने तुझा भार मी पोटात वाहिला आहे". हे वाक्य तिच्या बोलण्यात आलेच नसते.
६)   सुमन--- आमच्या शजारच्या काकू ढोंगी नसत्या झाल्या. माझी आई नेहमी म्हणते की त्या काकूवर विश्वास ठेऊ नकोस. त्यांचे नेहमी "पोटात एक आणि ओठात एक" असते.
७)   विठ्ठल--- आम्ही परवा जत्रेत टुरींग टाकीज मधे सिनेमा पाहिला. त्यातील मजाच गेली असती. या सिनेमात सोहराब मोदी ८/१० वेळेस म्हणतो "पापी पेटका सवाल है".या वाक्यावर दरवेळेस तो टाळ्या घेऊन जातो.
८)   द्वारका---पोक्त बाईच्या थाटात आम्हा बायकांवरचा एक आरोप कमी झाला असता. आम्हा स्त्रियांना पुरुष नेहमी हिणवतात की "बायकांच्या पोटात कांहीच रहात नाही" म्हणून.
९)मारुती---   गुरुजी! आपल्या गावात सर्व किराणा दुकाने महाराष्ट्रीयन लिकांचीच झाली असती. मारवाडी लोक हातात लोटा घेऊन पोट भरायला राजस्थान सोडून पूर्ण जगात पसरलेच नसते.
१०)  बालाजी--- एक अभंग कमी लिहिला आणि गायला गेला असता. "पोटा पुरतं देई ईट्टला, लई नाही लई नाही मागणं"
११)  लक्षमण--- या जगात लाचखोरी झालीच नसती कारण लाच खायला पोट पण पाहिजे ना!
१२)   कल्याण---गुरुजी, मुंबईचा समुद्र प्रदूषीत झालाच नसता. गुरुजी हे ऐकून वैतागले.तो पुढे म्हणाला की पोट नाही तर खाणं पिणं नाही म्हणजेच मल विसर्ग नाही. म्हणून ड्रेनेजचे पाणी समुद्रात सोडलेच गेले नसते
१३)दिगंबर---   हा एक गंभीर प्रकृतीचा मुलगा. तो म्हणाला आपण लोक गरज असल्याशिवाय कामच करत नाहीत. पोट नसते तर काम न करता एखाद्या दगडाप्रमाणे लोक कोठेही पडून राहिले असते.
१३)   चिंतामण--- पोट नसतं तर गुरुजी लोक साधे सरळ झाले असते. त्यांना अप्पलपोटी होताच आले नसते.

एव्हाना अंधार पडू लागला होता.पुन्हा लाईनमधे उभे करून परतीचा प्रवास झाला. एवढी चर्चा होऊनही घरी पोटपूजा करून झोपी गेलो.जाग आल्यानंतर कळले की लिखाणाच्या निमित्ताने आठवांच्या गल्लीबोळातून छानसा फेरफटका झाला.


निशिकांत देहपांडे. मो.क्र.९८९०७ ९९०२३
E Mail---nishides1944@yahoo.com

 

Wednesday, September 11, 2013

डोळ्यांमधुनी थेंब बरसले


धूळ झटकली नाही कोणी
फोटोचेही श्वास अडकले
श्राध्दादिवशी आत्म्याच्याही
डोळ्यांमधुनी थेंब बरसले

श्राध्द कशाचे? संधी होती
सगे सोयरे भेटायाची
गप्पा, टप्पा कधी मस्करी
असेच कांही करावयाची
मूड पाहुनी, भटजींनीही
विधी दहा मिनिटात उरकले
श्राध्दादिवशी आत्म्याच्याही
डोळ्यांमधुनी थेंब बरसले

मला सदगती नकोच होती
घराभोवती घुटमळतो मी
मेल्यावरही घरात कोणी
बिमार पडता तळमळतो मी
ज्यांच्यासाठी जगलो मेलो
तेच मला का आज विसरले?
श्राध्दादिवशी आत्म्याच्याही
डोळ्यांमधुनी थेंब बरसले

खोली माझी अन् पत्नीची
बंद ठेवल्याने अंधारी
प्रेमामध्ये अंध उभयता
धृतराष्ट्राची ती गांधारी
आठवणींचे लख्ख चांदणे
काळोख्या अंतरी झिरपले
श्राध्दादिवशी आत्म्याच्याही
डोळ्यांमधुनी थेंब बरसले

भिंतीवरच्या खिळ्यासही पण
भार असावा माझा झाला
एकेदिवशी वरून पडलो
जरा हवेचा झोका आला
चित्र फेकले कचर्‍यामध्ये
भिंग फ्रेमचे जसे तडकले
श्राध्दादिवशी आत्म्याच्याही
डोळ्यांमधुनी थेंब बरसले

स्मृतीभ्रंश कर देवा माझा
नकोत आठव नको वेदना
सहन कराया शक्ती नुरली
मको कुणाची मला सांत्वना
हिशोब सारा व्यर्थ वाटतो
काय हरवले? काय गवसले?
श्राध्दादिवशी आत्म्याच्याही
डोळ्यांमधुनी थेंब बरसले


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Friday, September 6, 2013

अपुल्यात नुरला झंकार आता


संवाद गेला हरवून कोठे?
तडजोड करण्या, होकार आता
तुटल्यात तारा अंतरमनीच्या
अपुल्यात नुरला झंकार आता

कित्येक वर्षे आली नि गेली
पण कोपरा हा फुललाच नाही
पानाफुलांचा मोसम कसा हा?
वस्तीत माझ्या आलाच नाही
फुलपाखरांच्या गंधाळणार्‍या
स्वप्नांस कसला आकार आता?
तुटल्यात तारा अंतरमनीच्या
अपुल्यात नुरला झंकार आता

हृदयात नांदे किती ग्रिष्म वेडा !
सुकल्यात सार्‍या ओल्या कपारी
शोधीत छाया निघता मिळाला
वैशाख वणवा, रखरख दुपारी
पीण्यास मृगजळ लाभो जरासे
इतकीच आशा, आधार आता
तुटल्यात तारा अंतरमनीच्या
अपुल्यात नुरला झंकार आता

मतभेद कसले? तूफान होते
समजून घेणे जमलेच नाही
नाण्यास दोन्ही असतात बाजू
का हे मनाला गमलेच नाही?
अपुलेच वादळ, तुटलेय घरटे
कोणी करावी तक्रार आता ?
तुटल्यात तारा अंतरमनीच्या
अपुल्यात नुरला झंकार आता

छोटेच घरटे नांदावयाला
राहून जवळी आहे दुरावा
शरिरास मिळतो प्रतिसाद पण का
वाटे जिव्हाळा थोडा असावा?
गुदमर असोनी जगतोय आपण
प्रेमात असतो व्यवहार आता
तुटल्यात तारा अंतरमनीच्या
अपुल्यात नुरला झंकार आता

आत्ताच ठरवू जन्मात पुढच्या
"मी पण" जरासे सोडून पाहू
चल एकमेकासाठी जरासे
जगायचे चित्र खुलवून पाहू
डोळ्यास दिसते रंगीबिरंगी
स्वप्नातले मज घरदार आता
तुटल्यात तारा अंतरमनीच्या
अपुल्यात नुरला झंकार आता


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com