Wednesday, July 3, 2013

रुसतेस अशी का?


दिले स्थान ह्रदयात तुला मी
तरी खिन्न बसतेस अशी का?
तूच श्वास अन् ध्यास मनीचा
कविते तू रुसतेस अशी का?

आयुष्याच्या लक्तरास मी
शब्दांमधुनी मांडत असतो
लेखणीतुनी घळघळणार्‍या
आसवास मी सांडत असतो
कसे चांगले रम्य लिहू मी?
उदास तू दिसतेस अशी का?
तूच श्वास अन् ध्यास मनीचा
कविते तू रुसतेस अशी का?

इतिहासाच्या पानावरती
लिहिली होती प्रेमळ गाणी
सुवर्ण क्षण ते कधीच सरले
वर्तमान बस एक विरानी
स्वप्न वसंताचे कविते तू
व्यर्थ मनी बघतेस अशी का?
तूच श्वास अन् ध्यास मनीचा
कविते तू रुसतेस अशी का?

चंद्र, चांदणे, रोमांचाने
तुझा चेहरा मीच सजवला
एक जमाना होता जेंव्हा
तरुणाई गुणगुणली तुजला
वादळ येता जीवनात तू
ज्योतीसम विझतेस अशी का?
तूच श्वास अन् ध्यास मनीचा
कविते तू रुसतेस अशी का?

कधी गझल तर कधी रुबाई
अभंग होउन सोबतीस तू
जणू प्रेयसी शतजन्मीची
अशीच कविते वागलीस तू
श्वास अता थोडेसे उरले
जावयास निघतेस अशी का?
तूच श्वास अन् ध्यास मनीचा
कविते तू रुसतेस अशी का?

मी नश्वर पण चिरंजीव तू
तरी आपुले नाते जमले
तुझ्यामुळे तर जीवनास हे
इंद्रधनूचे रंग लाभले
हसून दे मज निरोप कविते
अंतक्षणी रडतेस अशी का?
तूच श्वास अन् ध्यास मनीचा
कविते तू रुसतेस अशी का?


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

No comments:

Post a Comment