Thursday, October 25, 2012

आज माझ्या वेदनेला

तृप्त मी खाऊन कोंडा
अन् जरी धोंडा निजेला
कोंदले भाळावरी मी
आज माझ्या वेदनेला

मृगजळावरती सुखाच्या
ना कधीही भाळलो मी
वेदनेची साथ शाश्वत
हात धरला नांदलो मी
वेदनेच्या सावलीची
जाण होती जाणिवेला
कोंदले भाळावरी मी
आज माझ्या वेदनेला

उच्चभ्रू वस्तीत आम्ही
कैद केले का सुखाला?
या जगाने जाणले ना
मुक्त त्याच्या वावराला
रोपटे कुंडीत लाउन
का कधी मिळतो तजेला?
कोंदले भाळावरी मी
आज माझ्या वेदनेला

नांदती मोठ्या घरी का
माणसे छोट्या मनांची?
संस्कृती केंव्हा रुजावी
मानवी संवेदनांची?
कोण मोठे? दावण्याच्या
पेटला जो तो इरेला
कोंदले भाळावरी मी
आज माझ्या वेदनेला

झोपड्यांच्या चार रांगा
विश्व माझे आगळे हे
सर्व माझे मी तयांचा
सूत्र इथले वेगळे हे
दु:ख वाटुन घ्यावयाचा
छंद आहे पोसलेला
कोंदले भाळावरी मी
आज माझ्या वेदनेला

लेक निघता सासराला
आसवे आलीच होती
माय बापाची जशी ती
लेक वस्तीचीच होती
एकही घालू न शकला
बांध अपुल्या भावनेला
कोंदले भाळावरी मी
आज माझ्या वेदनेला


निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--nishides1944@yahoo.com

Sunday, October 21, 2012

ओझे झाले जीवन आता

ओझे झाले जीवन आता
अवघड बनले एकल जगणे
तू नसताना कशी सखे मी
पार करावी हजार वळणे

वळणा वळणावर जगताना
आठवणीचे बीज पेरले
रेतीवरती नाव कधी तर
ह्रदयाचेही चित्र कोरले
सुवर्णक्षण जे कधी भावले
भोगतोय त्यांचे भळभळणे
तू नसताना कशी सखे मी
पार करावी हजार वळणे

हात तुझा सुटल्याच क्षणाला
उजेड सारा हरवुन गेला
खाचा, खळगे, सदैव ठेचा
दु:ख पोंचले ऊंच शिगेला
आठवणींनो जरा थांबवा
अंधाराचे रंग उधळणे
तू नसताना कशी सखे मी
पार करावी हजार वळणे

शुष्क वृक्ष अन् विरान घरटे
नसे राबता इथे कुणाचा
उदास गाणे, उदास ताना
उत्सव सरला गोड सुरांचा
क्षितिज असे का काजळलेले?
विसरुन गेले रोज उजळणे
तू नसताना कशी सखे मी
पार करावी हजार वळणे

आठवणींचा अंत जाहला
अग्नी देता चितेस माझ्या
निरव शांतता, कुणी न उरले
मला द्यावया जखमा ताज्या
सर्व निखारे थंड जाहले
अता संपली खदखद, जळणे
तू नसताना कशी सखे मी
पार करावी हजार वळणे

एकेकाळी चाहुल येता
तुझी, होतसे अधीर वेडा
करार माझ्याशी मी केला
बनावयाचा बधीर थोडा
स्थितप्रज्ञ जाहलो नि केले
बंद मला मी आता छळणे
तू नसताना कशी सखे मी
पार करावी हजार वळणे


निशिकांत देशपांडे मो. क्र९८९०७ ९९०२३
E Mail-- nishides1944@yahoo.com

Friday, October 19, 2012

नवरात्राचा उपास आहे

उपासमारी घरात माझ्या
झूठ सांगतो जगास आहे
"घटस्थापना कालच झाली
नवरात्राचा उपास आहे"

परंपरेच्या नावाखाली
रोज जोगवा मागत असतो
भूक भागते, प्रसन्न झाली
देवी मजवर सांगत असतो
रोजरोज पुरणाची पोळी
खातो लाउन तुपास आहे
"घटस्थापना कालच झाली
नवरात्राचा उपास आहे"

देवाचे भक्तांशी नाते
आज केवढे विभिन्न झाले !
देवी नाही ! देवीवरती
धनाढ्य दिसती प्रसन्न झाले
हुंडीच्या काळ्या पैशाने
क्षेत्रोक्षेत्री विकास आहे
"घटस्थापना कालच झाली
नवरात्राचा उपास आहे"

कधी मंदिरी घालत होते
"गोंधळ" सगळीकडे माजला
राजकारणी महिषासुरही
संबळ पिटतो खूप मातला
त्रिशूळ घेउन तुलाच माते
निघावयाचे वधास आहे
"घटस्थापना कालच झाली
नवरात्राचा उपास आहे"

उत्सव सरला, सुगी संपली
स्वार्थी याचक उडून गेले
जगदंबाही स्तंभित झाली
कितीक कोल्हे लवून गेले
सुगी नसूनी जो येतो तो
अंबा म्हणते झकास आहे
"घटस्थापना कालच झाली
नवरात्राचा उपास आहे"

याचक नाही भक्त तुझा मी
मागायाचे मला वावडे
लीन असावे तुझिया चरणी
ध्यास मनाला हाच आवडे
तुझ्या मंदिरी पायरीवरी
सदैव माझा निवास आहे
"घटस्थापना कालच झाली
नवरात्राचा उपास आहे"


निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--nishides1944@yahoo.com