आई हा किती प्रेमळ, सर्वांचा आवडता, जिव्हाळ्याचा विषय! आईने एका अर्थाने संपूर्ण विश्व व्यापून टाकलेलं आहे. हिंदू धर्मात तर पूजनीय व्यक्तीमधे मातृदेवोभव, पितृदेवोभव म्हणत आईला आद्य स्थान दिलेले आहे.
माझा स्वतःचा कांही कविंना बोलल्यानंतरचा अनुभव आहे की बहुतांश कवी आपल्या आयुष्यात पहिली रचना आपल्या आईवरच लिहितात.
प्रेम स्वरूप आई वात्सल्य सिंधू आई ही माधव ज्युलियन यांची कविता आणि आई म्हणून कोणी आईस हाक मारी ही कवी यशवंत यांची कविता या दोन्ही आई या विषयावर असल्यामुळेच अजरामर झाल्या. आई या विषयावर असंख्य कविता आहेत आणि या नवयुगात अजूनही त्या आवडीने वाचल्या/लिहिल्या जातात. सर्वांच्या जडणघडणीत आईचा मोठा वाटा असतो हे निश्चित.
माझ्या मनाला जे विषय जवळ आहेत काव्यलिखाणासाठी, त्यात आईला उच्च स्थान आहे. मी बर्याच कविता, गझला आईवर लिहिलेल्या आहेत. ही आईचीच कृपा असावी की जेंव्हा जेंव्हा मी आईवरील कविता/गझला काव्य संमेलनात वाचतो, श्रोत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळतो. मी एकदा बाबावर कविता लिहायची ठरवले. पण सर्वव्यापी आई या कवितेतही डोकावली, आणि तीही चक्क कवितेच्या ध्रुवपदात! कसे ते खाली पहा.
अनेक वेळा धाकधपटशा
क्वचित प्रसंगी लाडीगोडी
माय दुधाची मऊ साय अन्
बाबांचे बोलणे पहाडी
आई या व्यक्तिमत्वाचे रसायनच वेगळे आहे. आई ही कुणाचीही असो, ती सोशीक आणि मायाळूच असते. वाघ आणि सिंह हे माणसांना भले क्रूर वाटत असोत, आपल्या पिल्लांसाठी वाघीण किंवा सिंहीण ही मायेचा झराच असते. कनवाळू, मायाळू अशीच तुमच्या आमच्या आईसारखीच.
मला मी औरंगाबादला असतानाचे दोन प्रसंग आठवतात. माझ्या घराच्या गॅलरीत बसल्यावर एक रस्ता दिसत होता. तिथे एक दहा फूट खोल नाला होता सांडपाणी वाहून नेण्यासाठी. मी एकदा गॅलरीत बसलो असता पाहिले की एक कुत्रे नाल्यात डोकावून बघत होते. नंतर ते पळत पळत नाल्याच्या कडेकडेने जाई आणि पुन्हा परत येवून नाल्यात एकटक बघत असे. हे जवळ जव्ळ अर्धा तास चालू होते. माझ्यातली उत्सुकता जागी झाली. मी खाली जाऊन पाहिले तेंव्हा ध्यानात आले की,एक पिल्लू नाल्यात पडले होते. तिच्या आईची तगमग चालू होती. दहा फूट खोल आईला उतरता येत नव्हते. तेथे एक कचर्यातील पिशव्या गोळा करणारा मुलगा आला. त्याला कांही पैसे देऊ केले आणि त्याच्याकडून ते पिल्लू वर काढून घेतले. त्या आईच्या चेहर्यावरील केविलवाणे भाव मला कित्येक दिवस डोळ्यासमोर दिसत होते. या घालमेलीतून एका आर्त कवितेचा जन्म झाला.
दुसरा प्रसंग माझ्या घरातीलच. एका खोलीच्या खिडकीत चिमणीने घरटे बांधले आहे हे माझ्या ध्यानात आले. दोन चिमण्या येऊन घरट्यात नवीन वाळलेले गवत आणायच्या. त्यांचे घरटे बांधणीचे काम बहुधा चालू होते. एखाद्या महिण्याने त्या घरट्यात एक अंडे पण दिसले. यथावकाश उबवले गेल्यानंतर पिलाचा जन्म झाला. आम्हा दोघांना येता जाता घरट्याचे निरिक्षण करायचा छंदच लागला होता! मग चिमणी बाहेर जाऊन पिलासाठी चारा आणायची. चिमणी येताच पिल्लू चोंच उघडायचे आणि आई दाणा भरवायची. हे बरेच दिवस चालले. नंतर पिल्लू खिडकीतल्या खिडकीत हळूहळू चालायला लागले. आई दुरून पिलाकडे लक्ष ठेवायची. नंतर पिलाला घरट्यात बसवून बाहेर जायची आणि छकुल्यासाठी चारा घेऊन यायची. सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने आम्ही साक्षीदार होतो , एके दिवशी चिमणी चारा घेऊन आली आणि तिला घरट्यात पिल्लू दिसलेच नाही. ती भिरभिरत्या नजरेने उडत जाऊन शोध घ्यायची आणि परत घरट्याकडे यायची. हे असे चार पाच दिवस चालले. नंतर चिमणी गेली आणि इकडे फिरकलीच नाही. बहुधा तिला कळले असावे की आता शोध घेणे व्यर्थ आहे. कित्येक दिवस ते घरटे तसेच होते खिडकीत. मोकळे, विरान. ती स्मशान शांतता आम्हाला सुध्दा भयाण वाटत होती. या हृदय पिळवटणार्या प्रसंगातून उतरलेली कविता जिच्यात मातेची वात्सल्य भावना चित्रित केरण्याचा प्रयत्न केला आहे, ती खाली पेश करतोय.
झाली संध्याकाळ
चोंच उघडुनी वाट पहाते
पक्षिणिचे ते बाळ
भूक लागली माय न आली
झाली संध्याकाळ
बाळा चारा खाऊ घाली
खूप खूप मायेने
पाठीवरुनी हात मखमली
फिरवी ती प्रेमाने
कुशीत निजता बाळ वाटते
येवू नये सकाळ
भूक लागली माय न आली
झाली संध्याकाळ
बाळाच्या खोड्या दंग्यांनी
घरटे गजबजलेले
तिला आवडे बाळ नेहमी
कानी कुजबुजलेले
कौतुक जेंव्हा बाळ खेळते
सोडुन सारा ताळ
भूक लागली माय न आली
झाली संध्याकाळ
पंख पसरुनी कसे उडावे
तिने शिकविले त्याला
आकाशाचे स्वप्न लागले
अता पडू बाळाला
उरात धडधड प्रश्न भयानक
तुटेल का ही नाळ?
भूक लागली माय न आली
झाली संध्याकाळ
एके दिवशी चारा घेउन
अशीच ती परतता
घरट्यामध्ये तिने पाहिली
खूप निरव शंतता
भिरभिरत्या नजरने शोधी,
मनी रक्तबंबाळ
भूक लागली माय न आली
झाली संध्याकाळ
स्वतंत्र होउन बाळ उडाले
हीच जुनी ती कथा
आईच्या प्राक्तनात असते
कुरतडणारी व्यथा
एकलपणचे शल्य उरी अन्
मावळतीचा काळ
भूक लागली माय न आली
झाली संध्याकाळ
निशिकांत देशपांडे, पुणे.
मो.क्र. ९८९०७ ९९०२३