Wednesday, September 30, 2020

मला छेडले कोणी

 

शांत मनाच्या डोही येउन

खडे टाकले कोणी?

आठवणींचे तरंग उठले

मला छेडले कोणी?


छंद पोसला डायरीतली

पाने चाळायाचा

प्रयत्न केला वर्तमान मी

खडतर विसरायाचा

गतकालीच्या स्वप्नी रमता

मला उठवले कोणी?

आठवणींचे तरंग उठले

मला छेडले कोणी?


ओठांवरती शब्द न आले

पण नजरेची भाषा

कळेल केंव्हा तुला मनी ही

होती वेडी आशा

विसरायाचे एकदुज्याला

वचन मोडले कोणी?

आठवणींचे तरंग उठले

मला छेडले कोणी?


पर्णफुटीची आस सोबती

ग्रिष्म घेउनी आला

तुझ्या संगती बनेल जीवन

धुंदधुंदसा प्याला

या स्वप्नाला सांग प्राक्तना

तडे पाडले कोणी?

आठवणींचे तरंग उठले

मला छेडले कोणी?


ठसठसणारी विरह भावना

सांगायाची होती

आर्त भैरवीने मज मैफिल

संपवायची होती

असे अचानक सुरात माझ्या

सूर मिळवले कोणी?

आठवणींचे तरंग उठले

मला छेडले कोणी?



निशिकांत देशपांडे, पुणे.

मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Friday, September 11, 2020

ठराव आता पास करू या


(परवाच आपल्या समूहवर श्री सतीश भोसले यांनी स्वरचित चार ओळी पोस्ट केल्या होत्या. आपल्या गुरुजींनी "ठराव आता पास करू या"या ओळीवर सर्वांनी एक एक कडवे लिहावे अशी इच्छा व्यक्त केली होती. ही टॅग वापरून मी केलेली कविता पेश करतोय. गोड मानून घ्या. कवितेत जरी कांही सदस्यांच्या नावाचा उल्लेख असला तरीही माझा इशारा सर्वच गुणी सदस्यांकडे आहे. सतीश, आभार आपले या ओळीसाठी.)

लाख असूदे ग्रिष्म भोवती
ओला श्रावण मनी भरू या
वेदनेतही हसावयाचा
ठराव आता पास करू या

अल्लड अवखळ अन् मनमौजी
समूह आहे कलंदरांचा
सर्वांना आपुला वाटतो
वास्तवात हा गुणे सरांचा
आनंदाच्या नगरीसाठी
होऊ सारे वाटसरू या
वेदनेतही हसावयाचा
ठराव आता पास करू या

ताल सुरांची उधळण करण्या
अनुराधा अन् सुषमा ताई
रियाज करुनी गाणे गाण्या
नवीन आल्या जयश्री बाई
ऐकत गायन, आपण सारे
पायावरती ताल धरू या
वेदनेतही हसावयाचा
ठराव आता पास करू या

साहेबरावांच्या कवितांतुन
सदैव दिसते ग्रामिण हिरवळ
फुलात असतो त्या पेक्षाही
धुंदधुंदसा येतो दरवळ
मोहरलेले गळे, लेखण्या
कुरणामध्ये मुक्त चरू या
वेदनेतही हसावयाचा
ठराव आता पास करू या

भींत बांधताना दगडांची
दोन चिर्‍यांच्या मधली पाचर
समुहावरती असाच असतो
अधुनी मधुनी माझा वावर
श्रेष्ठासंगे ज्येष्ठाचेही
चित्र काढण्या रंग भरू या
वेदनेतही हसावयाचा
ठराव आता पास करू या



निशिकांत देशपांडे. पुणे.
मो.क्र. ९८९०७ ९९०२३