Saturday, February 15, 2020

घाई झाली फुलावयाची


बेमोसम का वसंतासही
घाई झाली फुलावयाची?
तू आल्याने वार्‍यालाही
दिशा मिळाली वहावयाची

जसे हवे तुज तसे नेमके
विश्व नांदते तुझ्या भोवती
असो पौर्णिमा अथवा आवस
चंद्र, तारका तुझ्या सोबती
संगमरमरी रुपास तुझिया
हौस केवढी मिरवायाची!
तू आल्याने वार्‍यालाही
दिशा मिळाली वहावयाची

सूर्य कोवळा प्रभात समयी
अधीरतेने तुला शोधतो
ना दिसता तू ,माध्यान्हीला
डोक्यावरती खूप कोपतो
इच्छा असते मावळताना
तुला सकाळी शोधायाची
तू आल्याने वार्‍यालाही
दिशा मिळाली वहावयाची

मंद शमा तू मैफिलीतली
तुझे तेवणे बहार असते
विरह भाव गझलेत गुंफता
तान मखमली उरी काचते
परवान्यांना झडप मारुनी
उर्मी येते जळावयाची
तू आल्याने वार्‍यालाही
दिशा मिळाली वहावयाची

तू रंभा अन् तूच मेनका
उतरलीस तू धरतीवरती
भान विसरुनी सारे आशिक
तुला बघाया मान वळवती
पुण्य न कमवी कुणीच, स्वर्गी
नुरली इच्छा रहावयाची
तू आल्याने वार्‍यालाही
दिशा मिळाली वहावयाची

टपटप मोती गळतिल खाली
नकोस ना तू हसू एवढे!
मंद स्मीतही मला पुरेसे
विरहाचे मज नसे वावडे
स्वप्नामध्ये भागवेन मी
भूक तुझ्याशी कुजबुजायची
तू आल्याने वार्‍यालाही
दिशा मिळाली वहावयाची


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३